बॉलीवूड

ज्येष्ठ मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी कालवश

Aaditi Datar  |  Mar 17, 2020
ज्येष्ठ मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी कालवश

मराठी चित्रपटसृष्टीने आज अजून एक दिग्गज अभिनेता गमावला. ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं पुण्यात मंगळवारी पहाटे निधन झालं. त्यांचं वय 88 होतं. पुण्यातच त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनाबाबतची पोस्ट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. मृणाल यांचे ते सासरे होते. मृणाल यांनी ही पोस्ट शेअर करताच अनेक मराठी कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया देत कुलकर्णी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले.

जयराम यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यात निवेदिता यांनी म्हटलं आहे की, ‘जयराम कुलकर्णी माझे बाबा. त्यांना आम्ही सगळे JK म्हणत असू. अतिशय उमदे व्यक्तिमत्व उत्कृष्ट अभिनेता स्पष्ट शब्दोच्चार, माझ्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका केली आणि खरोखरच माझ्यावर वडिलांसारखी माया केली. वेळप्रसंगी माझी काळजी घेतली. मला तुमची खूप उणीव भासेल JK.’

‘भावपूर्ण श्रद्धांजली जे.के.RipJayram Kulkarni मराठी चित्रपटांमधून कधी हिरोईनचे वडील,कधी पोलीस कमिशनर, खाष्ट सासरा अश्या प्रकारच्या रुबाबदार विविध भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी, जे चित्रपट सृष्टीत जे.के. म्हणून परिचित होते.पुणे आकाशवाणी केंद्रावर नोकरी करीत असताना त्यांनी अभिनयाची आवड जपली आणि पुढे पूर्णवेळ ह्या क्षेत्रात स्वतः ला झोकून दिले.अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीचे सासरे असणारे जयराम कुलकर्णी हे चेहरेपट्टी मुळे जेव्हढे कडक दिसायचे तितकेच ते एकदा चांगली ओळख झाली की मग नकळत एखाद्याचे जिवलग मित्र व्हायचे.त्यांचा स्पष्ट स्वभाव मला मात्र आवडायचा.माझ्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात मला सतत प्रोत्साहन आणि मदत करणारे ,माझ्या, टी व्ही मालिका, जाहिराती ते माझा पहिला चित्रपट ’आधार’ मध्ये काम केलेले जे.के.ह्यांच्या अनेक आठवणी आज दाटून येत आहेत. दुनिया करी सलाम ह्या चित्रपटामधून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या जयराम कुलकर्णी यांच्या धूमधडाका,दे दणादण, थरथराट,एका पेक्ष्या एक, आत्मविश्वास, अश्या अनेक चित्रपटात भूमिका होत्या ,’ आमच्या सारखे आम्हीच ह्या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली विनोदी भूमिका मला आजही लक्ष्यात आहे. जे.के.तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली🙏’अशा शब्दात निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी जेके म्हणजेच जयराम कुलकर्णी यांनी श्रद्धांजली दिली. 

नुकताच त्यांनी भूमिका केलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. ज्यामध्ये अशी ही बनवाबनवी, गंमतजंमत, नवरी मिळे नवऱ्याला, झपाटलेला, बाळाचे बाप ब्रम्हचारी. रंगसंगत, थरथराट, माझा पती करोडपती, खट्याळ सासू नाठाळ सून, माहेरची साडी अशा गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. तसंच त्यांनी हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या होत्या. यासोबतच त्यांनी दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे यांच्या अनेक सिनेमात पोलीस अधिकाऱ्याची भूमिकाही केली होती. 

जयराम यांचं बालपण 

दिवंगत अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा जन्म सोलापूरमधल्या बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे गावचा होता. जयराम यांना लहापणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असतानाच त्यांनी मोरूची मावशी या नाटकात मावशीची भूमिकाही केली होती. खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत ओळख होती. त्यांना चित्रपटातली पहिली संधी मिळाली ती सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांच्या चित्रपटात. चित्रपटात येण्याआधी त्यांनी आकाशवाणीतही काम केलं. या नोकरीच्या काळातच त्यांचा संबंध अनेक मोठ्या कलाकारांशी आणि साहित्यिकांशी आला.

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. POPxoMarathi कडून जयराम कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Read More From बॉलीवूड