विवेक ओबेरॉयला बॉलीवूडमध्ये येऊन अनेक वर्ष झाली. मात्र तो बॉलीवूडमध्ये काही चित्रपट वगळता आपला जम बसवू शकला नाही. आता विवेक ओबेरॉयला सर्वात मोठी भूमिका मिळाली आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचं पहिलं पोस्टर सोमवारी लाँच करण्यात आलं. यामध्ये विवेक ओबेरॉय ओळखताही येत नाही. पंतप्रधान मोदी यांची भूमिका विवेक साकारणार आहे. विवेकने पोस्टर लाँचच्या वेळी खऱ्या आयुष्यातही आपण मोदींचे चाहते असल्याचं सांगितलं आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर 23 भाषांमध्ये हे पोस्टर अनावरण करण्यात आलं. या चित्रपटाची टीम गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाच्या तयारीमध्ये गुंतली आहे. हा चित्रपट दिग्दर्शक उमंग कुमार दिग्दर्शित करत आहे. निवडणुकांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल अशी लोकांची अपेक्षा आहे.
काय म्हणाला विवेक?
या पोस्टर लाँचच्या वेळी अभिनेता विवेक ओबेरॉयनेही आपलं मत व्यक्त केलं. चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत आपण आयुष्यात एक चांगली व्यक्ती होऊ असा विश्वास विवेकने यावेळी व्यक्त केला. आपण खूपच भाग्यवान असून सोळा वर्षापूर्वी ‘कंपनी’ चित्रपटात काम करताना ज्या भावना होत्या त्याच आजही आहेत असं विवेकने भावूक होऊन यावेळी सांगितलं. त्यावेळी अभिनयाची भूक होती तीच भूक यावेळीदेखील मला जाणवली असंही विवेकने म्हटलं. रोजच्या रोज काहीतरी नवं आणि चांगलं शिकायला मिळत आहे असंही विवेक म्हणाला. एका अभिनेत्यासाठी ही आयुष्यभर लक्षात राहील अशी भूमिका असल्याचं मतही विवेकने यावेळी व्यक्त केलं. ‘या चित्रपटानंतर मी एक चांगला अभिनेता आणि चांगला माणूस होऊ शकेन अशीच देवाजवळ प्रार्थना आहे. नरेंद्र मोदी हे जगभरातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांच्यातील कलागुणांना मोठ्या पडद्यावर मांडणं हे माझ्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. तुमच्या सर्वांना आशिर्वाद यासाठी हवा आहे,’ असंही विवेकने यावेळी मीडियासमोर म्हटलं.
कसं आहे पोस्टर
या पोस्टरवर विवेक ओबेरॉय भगव्या कपड्यामध्ये नरेंद्र मोदींच्या वेशभूषेत दिसत आहे. विवेक ओबेरॉयला करण्यात आलेल्या मेकअपवरून त्याला ओळखताही येत नाही. त्याच्या मागे तिरंगा झेंडा असून त्यावर ‘देशभक्ती ही मेरी शक्ती है’ असं लिहिण्यात आलं आहे. विवेकने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरदेखील हे पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर लाँच करण्यात आल्यानंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. विवेकने राम गोपाल वर्माच्या ‘कंपनी’मधून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपटातून भूमिका केल्या. काही भूमिका लोकांच्या आजही लक्षात आहेत. मात्र त्यानंतर विवेक जणू काही गायबच झाला. राणी मुखर्जीबरोबर आलेल्या ‘साथिया’मधूनही विवेकने अभिनयाची चुणूक दाखवली होती. बॉलीवूडमध्ये जम बसवेल असा विवेकचा अभिनय होता. काही चुकीच्या गोष्टीमध्ये विवेक अडकला आणि त्यानंतर बॉलीवूडमधून गायब झाला. पण आता पुन्हा उमंग कुमारच्या या चित्रपटातून विवेक एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या भूमिकेत प्रेक्षक विवेकला कसा प्रतिसाद देतील हे लवकरच कळेल. सध्या तरी याच पोस्टरची चर्चा आहे.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade