आरोग्य

दीपिका पदुकोणला त्रास झाला त्या tachycardia या कंडिशनबद्दल जाणून घ्या 

Vaidehi Raje  |  Jun 21, 2022
what is tachycardia

हृदयाच्या समस्या आणि हृदयाचे अनियमित ठोके होणे ही समस्या हल्ली इतकी सामान्य झाली आहे की सतत कुणाला ना कुणाला हार्ट प्रॉब्लेम्स असल्याच्या बातम्या कानांवर येत असतात.  तरुण असो की वृद्ध, फिट असो की आजारी, हल्ली कुणाला हृदयाच्या समस्या भेडसावतील याचा काही नेम राहीला नाही.  सिद्धार्थ शुक्लापासून ते केके अशा प्रसिद्ध व्यक्तींनी हृदयविकारामुळे अकाली व अचानक जगाचा निरोप घेतला. अलीकडे, जेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती, तेव्हा तिला tachycardia चा  त्रास झाला. या चित्रपटात प्रभासच्या बरोबर दीपिकाला कास्ट करण्यात आले आहे. दीपिका फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये ज्युरीचा भाग होती आणि काही काळापासून ती नॉन-स्टॉप काम करत होती. त्याचा परिणाम कुठेतरी तिच्या तब्येतीवर झाला आहे. 

Tachycardia म्हणजे काय 

साधारणपणे, जेव्हा तुम्ही सक्रिय नसता तेव्हा हृदयगती प्रति मिनिट 60 ते 100 बीट्स इतकी असते. जेव्हा तुमचे हृदय एका मिनिटाला 100 पेक्षा जास्त धडधडते, याचा अर्थ असा होतो की तुमच्या हृदयाची गती वाढत आहे, ज्याला tachycardia म्हणतात. जेव्हा तुम्हाला tachycardia होतो, तेव्हा हृदयगती काही सेकंदांपासून काही तासांपर्यंत जास्त प्रमाणात वाढते. 

What Is Tachycardia

निरोगी व्यक्तीला हा त्रास का होतो 

दीपिका केवळ अभिनेत्रीच नाही तर माजी बॅडमिंटनपटू देखील आहे, ती अजिबात लठ्ठ नाही उलट ती फिट आहे. मग तिची हृदयगती वाढण्याचे कारण काय असू शकते? कोणत्याही तरुण आणि तंदुरुस्त व्यक्तीला हृदयाचा त्रास कसा होऊ शकतो? काहीवेळा हृदयगती वाढणे हे विशिष्ट शारीरिक उत्तेजनांना प्रतिक्षेपित प्रतिसाद असू शकते. तुमचा ताण शारीरिक आणि मानसिक दोन्ही असू शकतो. इतकेच नाही तर काही वेळा व्यायाम, कॅफिन किंवा उत्तेजक पदार्थांचा अतिवापर, हार्मोनल कारणे, अशक्तपणा आणि ताप यामुळेही असे होण्याची शक्यता असते.

हृदयाचे ठोके जास्त असल्यास काय करावे 

जर हृदयाचे ठोके अनियमित असतील तर त्यामागचे कारण शोधण्यासाठी तुम्हाला काही चाचण्या कराव्या लागतील. यात ECG, इकोकार्डियोग्राम, होल्टर मॉनिटरिंग, थायरॉईड प्रोफाइल आणि क्लिनिकल स्थितीनुसार इतर मूलभूत चाचण्यांचा समावेश होतो. Tachycardia चे कारण जाणून घेतल्यानंतर आवश्यक ते उपचार केले जातात. वाढलेली हृदयगती कायम राहिल्यास कारण शोधण्यासाठी हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

What Is Tachycardia

हृदयाचे ठोके वाढणे कितपत धोकादायक आहे

तुम्हाला तुमच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत असे वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर चेकअप केले तर ते धोकादायक नाही. परंतु क्वचित काही केसेसमध्ये असा त्रास झाल्यास हृदयाच्या अंतर्निहित गंभीर स्थितीचे निदान केले जाऊ शकते. काहींना कार्डिओमायोपॅथी विथ ऍट्रियल फायब्रिलेशन किंवा वेंट्रिक्युलर टाकीकार्डिया या समस्या असू शकतात. तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा मूर्च्छा येत असेल तर अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टाकीकार्डियामध्ये तुमचे हृदय खूप वेगाने धडधडत असते, त्यामुळे बीट्स दरम्यान रक्त पुन्हा भरण्यास वेळ नसतो. तुमचे हृदय तुमच्या सर्व पेशींना आवश्यक रक्त आणि ऑक्सिजन पुरवू शकत नसल्यास हे धोकादायक ठरू शकते. म्हणून, प्रतिबंधात्मक उपायांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.

Tachycardia चा धोका कसा कमी करायचा? 

टाकीकार्डियाचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. रक्तदाब आणि हाय कोलेस्टेरॉल नियंत्रित करा व धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थ यासारख्या हृदयाला हानी पोहोचवणाऱ्या सवयी टाळा. तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. लठ्ठपणा किंवा जास्त वजनामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच मद्यपान टाळा. जास्त मद्यपान केल्याने कार्डिओमायोपॅथी देखील होऊ शकते. तसेच तणाव, चिंता आणि नैराश्यापासून लांब राहा व तणाव कमी करण्यासाठी काही पावले उचला.

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य