मनोरंजन

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ कॉलेज डायरी चित्रपटात पाच वेगवेगळ्या भाषेतील गाणी

Trupti Paradkar  |  Jan 8, 2019
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ कॉलेज डायरी चित्रपटात पाच वेगवेगळ्या भाषेतील गाणी

प्रत्येकाच्या आयुष्यात ‘कॉलेजचे दिवस’ अविस्मरणीय असतात. कारण कॉलेजच्या या सोनेरी दिवसांमुळे अनेकांच्या जीवनाला कलाटणी मिळते. कॉलेज जीवनातील ही धमाल मस्ती लवकरच सर्वांना पुन्हा अनुभवता येणार आहे. कारण लवकरच भावेश काशियानी फिल्म्स, आयड्रिम्स फिल्मक्राफ्ट्स प्रस्तुत आणि अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित ‘कॉलेज डायरी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉलेज डायरी चित्रपट 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. कॉलेज जीवनात धमाल मस्ती करणाऱ्या मित्रांच्या जीवनात अचानक घडणाऱ्या अनपेक्षित घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेणारी ही कथा आहे.  नुकतच या चित्रपटाचं म्युझिक लॉंच करण्यात आलं. प्रसिद्ध गायक ‘बेन्नी दयाल’ यांच्या हस्ते या चित्रपटाचं संगीत अनावरण करण्यात आलं. विशेष म्हणजे या चित्रपटात पाच निरनिराळ्या भाषेतील गाणी असणार आहेत. या गाण्यांमध्ये मराठी, हिंदी, इंग्लीश, संस्कृत, तामिळ अशा पाच भाषांमधील गाण्यांचा समावेश आहे. लोकप्रिय गायक पियुष मिश्रा, बेन्नी दयाल, शान, शाल्मली खोडगडे, आनंदी जोशी, निरंजन पेडगावकर यांनी ही गाणी गायली आहेत. या चित्रपटाची कथा अनिकेत जगन्नाथ घाडगे आणि विजय सांगले यांनी लिहिली आहे. तसंच या चित्रपटात अनेक नवीन कलाकारांच्या भूमिकादेखील असणार आहेत.

तमिळ गाणं बेन्नी दयालच्या आवाजात…

बत्तमीज दिल, बॅंग बॅंग,  पप्पू कान्ट डांस अशा ‘पार्टी सॉंग’साठी प्रसिद्ध बेन्नी दयाल यांनी या चित्रपटाचं एक गाणं गायलं आहेत. कॉलेज डायरीतील तमिळ गाणं बेन्नीने गायलं आहे. या गाण्याचे शब्द अश्विन यांचे असून रेवा यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.

हिंदी गाणं पियुष मिश्राच्या आवाजात…

पियुष मिश्रा यांचं ब्लॅक फ्रायडे चित्रपटातील ‘अरे रुक जा रे बंदे…’ असो किंवा गुलाल मधलं ‘आरंभ है प्रचंड है’ हे गाणं असो पियुष यांची अनेक गाणी रसिकांना वेगळ्याच ट्रान्समध्ये घेऊन जातात. त्यांच्या गीतातील प्रत्येक शब्द भावनाप्रधान असतात. लेखक, गीतकार, संगीतकार, गायक आणि अभिनेता अशा अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या पियुष मिश्रा यांना आता मराठी चित्रपटाची  भुरळ पडली आहे. मराठी चित्रपटातील नाविण्य त्यांना मराठीकडे आकर्षित करत आहे.या चित्रपटासाठी एक हिंदी गाणं पियुष मिश्रा यांनी गायलं आहे.

कॉलेज डायरीतील गाणी तरुणाईमध्ये लोकप्रिय

कॉलेज डायरी चित्रपटातील इतर गाणी गणेश-सुरेश आणि गणेश साबळे यांनी लिहीली आहेत. तर या गाण्यांना डॅनियल स्मिथ-सुहित, निरंजन पेडगावकर आणि रेवा यांनी संगीत दिलं आहे. ’पलके’, ‘राईज अॅन्ड फॉल’, ‘हे मन माझे’, ‘लहरे’, ‘त्वं हि त्वं सर्वशक्तिमान्’ असे या गाण्यांचे बोल असून ही गाणी  सध्या तरुणाईची मनं जिंकत आहेत. मराठी चित्रपटात पहिल्यांच ‘एकाच चित्रपटात पाच निरनिराळ्या भाषांमधील गाणी’ हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे हा मराठी चित्रपटातील वर्ल्ड रेकॉर्ड ठरणार आहे.

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

Read More From मनोरंजन