मनोरंजन

Year Ender 2021: यावर्षी हे मराठी कलाकार झाले आई-बाबा

Trupti Paradkar  |  Dec 20, 2021
year ender 2021 Marathi celebrities who became parents this year in Marathi

2021 ला अलविदा करत नव वर्षाची चाहूल कधी लागली हे लक्षात देखील आलं नाही. पाहता पाहता नव्या वर्षाची पहाट उगवेल आणि नव्या उमेदीने पुन्हा नव्या वर्षाचे स्वागत केले जाईल. सर्वांना आधीच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… वर्ष अखेरीस मन नेहमीच गत वर्षाचा मागोवा घेण्यासाठी रुंजी घालू लागतं. या वर्षात काय काय घडलं हे आठवत त्या वर्षाला बाय बाय केलं जातं. 2021 हे वर्ष कोरोनामुळे त्रासदायक ठरलं असलं तरी अनेकांच्या आयुष्यात याच वर्षी आनंदाचा उत्साह ओसडंला होता. कारण आईबाबा होण ही जगातील सर्वात आनंदाची गोष्ट असते. या वर्षी अनेक मराठी कलाकार आईबाबा झाले आणि त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पाहुया कोण कोणत्या मराठी कलाकाराच्या घरी आलेत यंदा चिमुकले पाहुणे

उर्मिला निंबाळकर

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून घरोघरी लोकप्रिय झाली. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती तिच्या युट्यूब चॅलनवमुळे… दर शुक्रवारी ऊर्मिला तिच्या युट्यूब चॅनलवरून प्रेक्षकांच्या भेटीला  येते. ब्युटी, फॅशन, लाईफस्टाईल या विषयांवरील व्हिडिओजमधून प्रेक्षकांशी संवाद साधते. या वर्षी ऑगस्ट महिन्यात उर्मिला आई झाली. उर्मिला गोंडस मुलगा झाला. तिच्या गरोदरपणाचे आणि आता बाळाच्या संगोपनाचे व्हिडिओजदेखील ती चाहत्यांसोबत शेअर करते. तिच्या बाळाचे नाव अथांग असून त्याच्या बारशाचा थाटमाट तिने व्हिडिओजच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केला होता.

खुशबू तावडे

नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी आईबाबा झाले. त्यांनी डोहाळ जेवणापासून बाळाच्या बारशापर्यंत गोड फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. मराठी मालिकांमध्ये खुशबू आणि संग्राम या दोघांनीही स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणारे हे दोघंही कलाकार आता त्यांच्या आयुष्यात आईबाबाची भूमिका साकारत आहेत.

धनश्री काडगावकर

या वर्षी एप्रिल महिन्यात अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने तिला मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. गोड बातमी मिळतातच तिने एका अनोख्या फोटोशूटमधून सोशल मीडियावर ही बातमी जाहीर केली होती. त्यानंतर डोहाळ जेवण आणि बाळाच्या बारशाचे फोटोही शेअर केले होते. तुझ्यात जीव गुंतला या मालिकेत छोट्या पडद्यावर वहिनीसाहेब रंगवणारी धनश्री आता तिच्या आयुष्यात आईसाहेबच्या भूमिकेत चांगलीच गुंतली आहे.

संकर्षण कऱ्हाडे

ऑगस्ट महिन्यात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने तो जुळ्या बाळांचा बाबा झाल्याचं जाहीर केलं होतं. संकर्षणला मुलगा आणि मुलगी अशी दोन जुळी झाली आहेत. मुलाचे नाव त्याने सर्वज्ञ आणि मुलीचे नाव स्रग्वी असं ठेवलं आहे. हटके आणि युनिक नावं मुलांना दिल्यामुळे संकर्षण बाबा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. आता संकर्षण किचन कल्लाकार आणि तुझी माझी रेशीमगाठ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला दररोज येत आहे.

अक्षय वाघमारे

अभिनेता अक्षय वाघमारेने डॅडी म्हणजेच अरूण गवळींची मुलगी योगिता गवळीसोबत विवाह केलेला आहे. मे महिन्यात अक्षय आणि योगिता आईबाबा झाले. अक्षयला गोंडस मुलगी झाली आहे. बाळाच्या आगमनाने दोन्ही कुटुंबात झालेला आनंदाचा उत्साह सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता.

आरोह वेलणकर

‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतील मुख्य अभिनेता आरोह वेलणकरने त्याच्या अभिनयाने अनेक प्रक्षकांना भुरळ घातली होती. अभिनयात बाजी मारलेल्या हा अभिनेता याच वर्षी बाबा देखील झाला. मार्च महिन्यात त्याला गोंडस मुलगा झाला. आरोहने त्याच्या पत्नीसह डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले होते आणि सोशल मीडियावरून त्याने बाबा झाल्याचं जाहीर केलं होतं.

शशांक केतकर

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वतःची स्वतंत्र छाप पाडणारा अभिनेता शशांक केतकर याच वर्षी बाबा झाला. शशांक आणि त्याची पत्नी प्रियंका यांना मुलगा झाला आणि शशांकने सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत हा आनंद शेअर केला होता.शशांकच्या बाळाचे नाव त्याने ऋग्वेद असं ठेवलं आहे.

स्मिता तांबे

स्मिता पराजंपे मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही स्वतःचा ठसा उमटवला आहे. स्मिता तांबेला या वर्षी सप्टेंबर महिन्यात कन्यारत्नाचा लाभ झाला. स्मिता नेहमी मनोभावे गौरीची पूजा करते. त्यामुळे गौरीगणपती आधी तिच्या घरी यंदा गौरीचं आगमन झालं होतं. तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणींनी कोरोनाच्या काळातही तिचं डोहाळ जेवणही साध्या पण खास पद्धतीने साजरं केलं होतं.

Read More From मनोरंजन