योगाचा मानवी मनावर, शरीरावर आणि आत्म्यावर सकारात्मक प्रभाव पडतो हे शतकानुशतके सिद्ध झाले आहे. जे लोक नियमितपणे ध्यान करतात (योगाचा अविभाज्य भाग) त्यांची मने त्यांच्या वास्तविक वयापेक्षा 7 वर्षांनी लहान असतात असे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे. तर दुसर्या अहवालात असे सुचविण्यात आले आहे की, योग एखाद्या व्यक्तीच्या मेंदूच्या न्यूरल पॅटर्नवर कार्य करतो, ज्यामुळे एखाद्याच्या एकाग्रतेचा कालावधी वाढतो. नेहमी स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसाठी योगाचा आधार घ्यावा असं सांगण्यात येतं. निरोगी आरोग्यासाठीही योगाचे प्रकार नेहमी करण्यात येतात. याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली आहे ती कैवल्यधामचे संयुक्त संचालक, रवी दीक्षित यांच्याकडून.
योगा ठरते नेहमीच उत्तम
कैवल्यधाम (Kaivalyadham) येथे नेहमीच योगाचे उत्तम शिक्षण देण्यात येते. योगासनांमुळे आणि ध्यानधारणामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता नक्कीच वाढते. योग हा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. अनुभवी तज्ज्ञांनी शिकवलेल्या योगासनांचे प्रभावी परिणाम हे मनावर होत असतात. योगाभ्यासाच्या दैनंदिन सरावामुळे मनावर नियंत्रण मिळविणे अत्यंत सोपे होते. मानसिक ताणतणाव आणि त्रास असल्यास, नेहमीच योगाचा आधार घेण्याचा सल्ला हा डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. योगामुळे आपल्याला आपल्यातील लपलेल्या क्षमतेची जाणीव होण्यासही मदत मिळते. कोणत्याही व्यक्तीला लक्ष विचलित होण्याची समस्या असेल अथवा तुम्हाला आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी काही उपाय हवा असेल तर तुम्ही योगाचा आधार नक्की घेऊ शकता. यामध्ये करण्यात येणारी ध्यानधारणा (Meditation) आणि योगामुळे तुमच्या मनावर नियंत्रण राहण्यास आणि मनाला अधिकाधिक शांत करण्यासाठी उपयोग होतो. तुमच्या शरीरातील तणाव आणि ताण कमी करण्यास आणि शरीरातील अवयवांना बळ आणि ऊर्जा प्रदान करण्यासाठी योगा उपयुक्त ठरते. दिवसातून किमान 20 मिनिट्स तुम्ही योगासनाचे प्रकार योग्य केल्यास, तुमच्या रोजच्या आयुष्यातही योग्य बदल होताना दिसतो. कोणतीही माहिती आत्मसात करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि मनाची क्षमता वाढविण्यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. त्वचा अधिक चमकदार बनविण्यासाठीही योगाचा फायदा होता.
योग आहे परिणामकारक
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही योगा हे कोणत्याही वयामध्ये करू शकता. योगा शिकण्यासाठी कोणतेही विशिष्ट वय नाही. तुम्ही अगदी 16 वर्षांपासून 40 वयापर्यंत कधीही तुम्ही योगा करू शकता. तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी अधिक योगदान योगाचे राहते. तसंच तुमच्या मानसिक शांततेसाठीही याचा उपयोग होतो. योगामुळे तुम्हाला केवळ लक्ष वेधून घेण्यासाठीच नाही तर तुमचे लक्ष योग्य ठिकाणी वळविण्याचेही काम करते. कोणत्याही संकट काळात अत्यंत शांत राहून तुम्ही योग्य निर्णय घेण्याची क्षमता यामुळे वाढवू शकता. तसंच तुमच्या मनातील गुंतागुंत आणि नकारात्मक विचार योगामुळे दूर राहण्यास मदत मिळते. सर्व निराशावादी विचारांना मागे सारून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम योगा करते. त्यामुळे मनासाठी योगा अत्यंत परिणामकारक आहे. तसंच तुमचे कौशल्य वाढवून माणूस म्हणून घडविण्यासाठीही याचा महत्त्वाचा वाटा असतो. तुम्हाला दिवसातून अजिबातच वेळ मिळत नसेल हे जरी गृहीत धरले तरीही दिवसातून दहा मिनिट्स स्वतःसाठी काढून तुम्ही रोज योगा करणे हे फायदेशीर ठरते. दरम्यान योगसाधना सुरू करण्यापूर्वी तुम्ही योग्य प्रशिक्षित व्यावसायिक योगा टीचर्सची मदत घेत आहात याची खात्री करा. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि तुमचे आयुष्य अधिक सुखकर होईल हे मात्र नक्की!