बॉलीवूड

आरजे ते बॉलीवूड – वाचा प्रसिद्ध युट्युबर प्राजक्ता कोळीने कसा केला हा प्रवास 

Vaidehi Raje  |  Jun 27, 2022
Prajakta Koli

Mostlysane म्हणून डिजिटल जगात प्रसिद्ध असलेली, तिच्या कोपरखळ्या आणि विनोदी व्हिडीओज साठी प्रसिद्ध असलेली, युट्युबच्या जगातली ठाण्याची मराठी मुलगी प्राजक्ता कोळी सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे. नुकतेच तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. जुग जुग जियो या चित्रपटात दिसणारी प्राजक्ता कोळी आज 27 जून 2022 रोजी तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्राजक्ता कोळी हे चित्रपटसृष्टीतील एक नवीन नाव असेल, पण सोशल मीडियाच्या दुनियेत ती सुपरहिट आहे. तिचे अनेक व्हिडीओज, रील्स तुम्हीही बघितले असतील. तिचे यूट्यूबवर 6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण तुम्हाला माहितेय का प्राजक्ताने तिच्या करियरचा हा प्रवास रेडिओपासून सुरू केला होता! तिने आरजे म्हणून कामास सुरुवात केली होती, नंतर युट्युबवर लोकांचे प्रेम मिळवल्यानंतर आता ती बॉलिवूडमध्येही स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सज्ज झाली आहे.  चला तर मग तिच्या वाढदिवशी जाणून घेऊया की प्राजक्ताने रेडिओपासून सुरुवात करून मग यूट्यूब आणि नंतर चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी कशी पटकावली. 

आरजे बनण्याचे स्वप्न पाहिले

जुग जुग जियो या चित्रपटात प्राजक्ता अनिल कपूर आणि नीतू यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. YouTuber-अभिनेत्री प्राजक्ता बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिने लहानपणापासूनच तिचे ध्येय निश्चित केले होते आणि ती सहाव्या इयत्तेत असतानाच तिने आरजे बनण्याचे ठरवले होते. पहिला शो मिळताच तिने आरजे म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण काही काळानंतर त्याने राजीनामा दिला कारण तिच्या मनात काहीतरी वेगळे काम करण्याची इच्छा होती. तिला असे वाटत होते की आरजेचे काम केल्यानंतर आपण आणखी काहीतरी वेगळे करायला हवे. 

नोकरी सोडून झाली युट्युबर 

प्राजक्ताने आरजेची नोकरी सोडली आणि एके दिवशी मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या तिच्या परिचयातील सुदीपने तिला स्वतःचे YouTube चॅनल सुरू करण्याचा सल्ला दिला. प्राजक्ताने काही काळ याचा विचार केला आणि 2015 मध्ये तिचे यूट्यूब चॅनल सुरू केले, त्या वेळी तिच्याकडे दुसरा पर्याय नसला तरी प्राजक्ता हा तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय मानते.

अशा प्रकारे तिला ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाची ऑफर आली.

प्राजक्ता ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. याआधी तिला Netfilx च्या Mismatched या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि हा प्रोजेक्ट रिलीज होण्याच्या एक महिना आधी तिला धर्मा प्रोडक्शनच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटात प्राजक्ता कोळी वरुण धवन म्हणजेच कुकू सैनीची धाकटी बहीण गिन्नी सैनीच्या भूमिकेत दिसत आहे.

प्राजक्ता आहे भारताची पहिली UNDP युथ क्लायमेट चॅम्पियन

प्राजक्ता भारताची पहिली UNDP युथ क्लायमेट चॅम्पियन बनली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) ही 1965 मध्ये स्थापन झालेली संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय न्यूयॉर्क शहरात आहे. ही संस्था देशांना दारिद्रय निर्मूलन आणि शाश्वत आर्थिक विकास तसेच मानवी विकास साधण्यास मदत करते. ही संयुक्त राष्ट्रांची सर्वात मोठी विकास मदत एजन्सी आहे, ज्याची कार्यालये 170 देशांमध्ये आहेत. UNDP सोबतच्या भागीदारीचा भाग म्हणून प्राजक्ताने हा किताब मिळवला.  विविध जागतिक सामाजिक मोहिमांद्वारे मानसिक आरोग्य, मुलींचे शिक्षण आणि महिलांच्या हक्कांसाठी तिने दिलेल्या योगदानाबद्दल तिला ही पदवी प्रदान करण्यात आली. यानंतर प्राजक्ताला ग्लोबल वॉर्मिंग, हवामान संकट, जैवविविधतेची हानी आणि त्यांचे परिणाम यांसारख्या मुद्द्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी तरुणांशी संवाद साधण्याचे काम दिले जाणार आहे. ती मनोरंजनाबरोबरच महत्वाच्या मुद्द्यांवर जागृती करण्याचेही काम करते आहे. 

प्राजक्ताला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड