आरोग्य

महाराष्ट्रातही आढळले झिका व्हायरसचे रुग्ण, जाणून घ्या लक्षणे 

Vaidehi Raje  |  Jul 15, 2022
zika virus outbreak

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका सात वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती बुधवारी जाहीर केली होती.  प्राणघातक झिका विषाणूची लागण झालेली ही मुलगी मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील आश्रमशाळेत राहते. याआधी जुलै 2021 मध्ये पुणे येथे झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. झिका विषाणू  A. aegypti आणि A. albopictus डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. ताप, अंगदुखी आणि डोळ्यांना संक्रमण होणे ही या संक्रमणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 

असे होऊ शकते संक्रमण 

Zika Virus Symptoms

झिका विषाणू हे एडिस प्रजातीच्या डासाच्या चाव्याव्दारे पसरतात. हे डास दिवसा आणि रात्रीही चावतात. हा संसर्ग गरोदर मातेकडून तिच्या न जन्मलेल्या बाळालाही पसरू शकतो. गरोदरपणात झिका व्हायरसच्या संसर्गामुळे बाळामध्ये अनेक जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात. झिका विषाणू लैंगिक संबंधातूनही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला चावल्यानंतर डास दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास त्याचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. दुर्दैवाने झिका व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. 

ही आहेत झिका व्हायरसची लक्षणे

बऱ्याच लोकांमध्ये झिका विषाणूच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तर काही लोकांमध्ये खूप सौम्य लक्षणे असू शकतात. संसर्गाचा संशय असल्यास, डॉक्टर झिका विषाणू संसर्ग ओळखण्यासाठी रक्त किंवा मूत्र चाचणी सुचवू शकतात.  ज्या लोकांना झिका व्हायरसचा संसर्ग होतो त्यांना ताप, पुरळ, डोकेदुखी, सांधे दुखी, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होणे, डोळे लाल होणे, स्नायू दुखणे अशी लक्षणे जाणवतात. झिका विषाणूची लक्षणे अतिशय सौम्य असतात, जी काही दिवस किंवा काही आठवडे टिकू शकतात. सहसा झिका व्हायरसची रुग्ण रुग्णालयात दाखल करावे लागेल इतके आजारी पडत नाहीत. झिका व्हायरसमुळे क्वचितच मृत्यू होतो. यामुळेच अनेकांना झिका व्हायरसची लागण झाल्याचे लक्षातही येत नाही. झिका विषाणूची लक्षणे डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासांच्या चाव्याव्दारे होणाऱ्या इतर आजारांसारखीच आहेत. झिका विषाणू बाधित व्यक्तीच्या रक्तात सुमारे आठवडाभर राहतो. 

Zika Virus Symptoms

डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज 

जर तुम्हाला वरील कोणतीही लक्षणे जाणवत असतील किंवा तुम्ही अलीकडेच झिका विषाणूचा संसर्ग पसरलेल्या भागाला भेट दिली असेल तर डॉक्टरांना भेटा. जर तुम्ही गरोदर असाल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. झिका विषाणूपासून बचाव करण्याच्या उपायांसह डॉक्टरांच्या सल्ल्याचे पूर्णपणे पालन करावे. झिका विषाणूचा प्रादुर्भाव पहिल्यांदा 2016 मध्ये समोर आला होता. ब्राझीलमधील ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी झिका विषाणूमुळे बरीच चर्चा झाली होती. सुदैवाने 2016 सालापासून झिका व्हायरसची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत आणि आता पूर्वीपेक्षा खूप कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत. 

झिका व्हायरसवर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. तरीही त्याच्या लक्षणांवर उपचार केले जाऊ शकतात. संसर्ग झाल्यास भरपूर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. निर्जलीकरण टाळण्यासाठी भरपूर द्रवपदार्थ पिण्याचा सल्ला दिला जातो. ताप आणि वेदना कमी होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. तुम्ही जर बीपी, मधुमेह किंवा इतर कोणत्याही आजाराशी संबंधित औषधे घेत असाल, तर कोणतेही नवीन औषध घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य