संवेदनशील त्वचा असल्यास अथवा त्वचा अतिशय नाजूक असेल तर बाजारातील केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधने त्वचेसाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे अशा वेळी त्वचेवर साधे आणि सोपे घरगुती उपचार करणं फायद्याचं ठरतं. घरच्या घरी नैसर्गिक घटक असलेल्या वस्तू वापरून तुम्हाला हे उपचार करता येतात. घरी कुंडीत लावलेल्या अनेक वनस्पतींचा वापर तुम्ही या नैसर्गिक उपचारांसाठी करू शकता. यासाठीच जाणून घरात कोणती झाडं लावावी जी तुमच्या सौंदर्यामध्येही भर घालतील.
कोरफड –
कोरफडाचे सौंदर्य फायदे तर तुम्हाला नक्कीच माहीत असतील. घरातील एका छोट्या कुंडीत लावलेल्या कोरफडाच्या झाडाच्या पानांपासून तुम्ही दररोज सौंदर्य उपचार करू शकता. कोरफडामध्ये त्वचेचा दाह कमी करून त्वचेला थंडावा देणारे घटक असतात. सहाजिकच यासाठी कोरफडाचा वापर अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये केला जातो. पण जर तुम्हाला असे प्रॉडक्ट वापरायचे नसतील तर घरच्या घरी कोरफडाच्या पानांचा गर काढून तुम्ही त्वचेवर लावू शकता. कारण त्यामध्ये अॅंटि ऑक्सिडंट, अॅंटि इनफ्लैमटरी, थंडावा देणारे, त्वचा टोन करणारे, त्वचा मॉईस्चराईझ करणारे आणि त्वचेचे संरक्षण करणारे घटक असतात. कोरफड तुमच्या केसांच्या सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते.
कसा कराल वापर –
- कोरफडाचे सर्वात मोठे पान कापून घ्या आणि त्यातील गर काढून एका भांड्यात ठेवा
- गर एकजीव करून त्याची पेस्ट तयार करा
- ही पेस्ट तुम्ही तुमच्या त्वचेवर आणि केसांवर लावू शकता
- वीस ते तीस मिनीटांनी त्वचा आणि केस स्वच्छ धुवा
- त्वचेवरील व्रण आणि काळे डाग कमी करण्यासाठी या जेलमध्ये तुम्ही थोडा लिंबाचा रसही मिसळू शकता
झाडांची कशी काळजी घ्यायची याच्या काही सोप्या टिप्स
तुळस –
तुळसीचे रोप तर जवळजवळ सर्व भारतीय घरात असते. कारण तुळशीला भारतात एक धार्मिक स्थान आहे. मात्र तुळशीमध्ये आर्युवेदिक घटक असल्यामुळे ती तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर ठरते. तुळशीची पाने नियमित चघळल्यास तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते आणि तुमची त्वचा नितळ आणि तुकतुकीत होते. केस आणि त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरगुती सौंदर्य उपचारांमध्ये तुळशीचा वापर नक्कीच करू शकता.
कसा कराल वापर –
- आरोग्य राखण्यासाठी आणि त्वचेचं इनफेक्शन दूर करण्यासाठी तुळशीच्या पानं टाकलेल्या पाण्याची वाफ घ्या
- तुळशीची पाने वाटून त्याचा रस त्वचेवर लावा. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि निर्जंतूक होईल
- तुळशीची पानं सुकवून त्याची पूड करून ठेवा. ही पावडर तुम्ही मुलतानी माती, चंदन पावडर, कडूलिंबाची पावडर अशा कोणत्याही पावडरमध्ये मिसळून त्वचेवर फेसपॅक करून लावू शकता
गुलाब –
गुलाबाच्या झाडाला लटकलेली सुंदर गुलाबाची फुलं तुमच्या घराचं सौंदर्य वाढवतात. मात्र फुलल्यानंतर कोमजून सुकलेली गुलाबाची फुलं जेव्हा झाडावरून गळू लागतात तेव्हा तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तुम्ही गुलाबपाणी, फेसपॅक, लोशन असं कााहिही करू शकता. गुलाबामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी, अॅंटि सेप्टिक आणि अॅंस्ट्रिजंट गुणधर्म असतात. ज्यामळे तुमच्या त्वचेचं जीवजंतूपासून संरक्षण होतं. त्वचेचं पुरळ, लालसरपणा कमी करून स्किन टोन सुधारण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या तुमच्या फायद्याच्या आहेत.
कसा कराल वापर –
- एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी एकत्र गरम करा आणि थंड झाल्यावर त्याचा टोनरप्रमाणे वापर करा
- गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलाबपाणी तयार करा आणि कोणत्याही फेसपॅकमध्ये वापरा
- गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्याची पूड तयार करा आणि तिचा वापर फेसपॅकसाठी करा
- गुलाबपाणी तुम्ही तुमच्या केसांचे आरोग्य वाढवण्यासाठीही वापरू शकता
पुदिना –
पुदिनाची रोपं तुमच्या घरातील छोट्या कुंडीत जोमाने वाढतात. तुम्ही ताज्या पुदिन्याच्या पानांचा वापर जसा स्वयंपाकात करू शकता तसंच तुमच्या सौंदर्यासाठीही करू शकता. पुदिन्यामध्ये क्लिझिंग करणारे घटक असल्यामुळे यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते आणि त्वचेला थंडावा मिळतो. शिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असते ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होतं आणि सैल पडलेल्या त्वचापेशी घट्ट होतात.
कसा कराल वापर –
दहा ते बारा पुदिनाच्या पानांची पेस्ट तयार करा आणि या पेस्टमध्ये कुस्करलेलं केळं टाकून फेसपॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावा
पुदिनाची पानं, गुलाबपाणी आणि मध मिसळून त्वचेसाठी एक परफेक्ट टोनर तयार करा
पायांच्या भेगा कमी करण्यासाठी पाण्यात पुदिन्याची पानं टाकून ते गरम करा आणि कोमट झाल्यावर त्यात पाय टाकून रिलॅक्स व्हा
कोथिंबीर –
पुदिन्याप्रमाणेच कोथिंबीरही तुम्ही घरच्या घरी कुंडीत लावू शकता. ज्यामुळे तुम्हाला स्वयंपाकासाठी ताजी कोथिंबीर मिळेल. कोथिंबीरही तुमच्या त्वचा आणि केसांसाठी फारच उपयुक्त आहे. कोथिंबीरीत अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.
कसा कराल वापर –
- ओठ गुलाबी करण्यासाठी दिवसभरात दोनदा ओठांवर कोथिंबीरीची पेस्ट लावा
- त्वचेवर दाह होत असल्यास कोथिंबीरीची पेस्ट, मध मिसळून त्वचेवर लावा
- आठवड्यातून एकदा केसांमध्ये कोथिंबीरीची पेस्ट लावून छान हेअर स्पा करा
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी नियमित खा मूग डाळ, जाणून घ्या फायदे
थंडीत मुळीच करु नका या स्किन ट्रिटमेंट
चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी शिळ्या पोळीपासून तयार करा फेस स्क्रब