हिवाळा सुरु झाला की बाजारात संत्री सगळीकडे दिसू लागतात. नागपूर संत्री ही दिसायला थोडी वेगळी असतात. त्याचे साल हे थोडे खडबडीत असते. हल्ली बारमाही मिळणारी संत्री देखील असतात. पण तरीदेखील नागपुरात मिळणाऱ्या संत्र्यांची चव ही त्या संत्र्यांच्या तुलनेत थोडी वेगळीच असते. संत्री हे सिट्रस फळामधील एक फळ असून यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन C असते. जे केस आणि त्वचेसाठी फारच फायद्याचे असते. थंडीत संत्री आवर्जून खायला हवीत यामगेही काही कारणे आहेत. जाणून घेऊया थंडीत संत्री खाण्याचे फायदे
किडनी स्टोन प्रतिबंधक
जी लोकं पाण्याचे सेवन फारच कमी प्रमाणात करतात. अशांना किडनी स्टोन होण्याचा खूपच त्रास असतो. थंडीच्या दिवसात पाण्याचे सेवन आपण फारच कमी करतो. त्यामुळे स्टोन होण्याची शक्यता असते.संत्र्याचे सेवन केल्यामुळे किडनी स्टोनचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. किडनी रोगापासून आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी संत्री खाल्ली तर त्यामध्ये असलेले पोटॅशिअम सायट्रेसचे गूण असतात जे आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात.
अशक्तपणा होईल दूर
कोव्हिडच्या काळात लिंबूवर्गातील फळं जास्तीत जास्त खाण्याचा सल्ला दिला जात होता. यामध्ये त्यामधील असलेले घटक आहेत. संत्रीमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि सायट्रिक ॲसिड असते ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. दीर्घ आजारपण आले असेल किंवा तुमच्या तोंडाची चव निघून गेली असेल तर अशावेळी तुम्ही संत्री खायला हवी. संत्री खाल्ली तर तुम्हाला आलेला अशक्तपणा दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
त्वचा ठेवते मॉश्चराईज
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन C असते. ज्यामुळे त्वचा मॉश्चराईज ठेवण्यास मदत मिळते. थंडीमध्ये त्वचा ही सुकते. त्यामधील मॉईश्चर कमी झालेले असते. चेहऱ्यावर मॉईश्चर टिकवून ठेवायचे असेल तर तुम्ही अगदी हमखास संत्री खायला हवी. चांगल्या त्वचेसाठी तुम्ही बारा महिनेही संत्री खाल्ली तरी चालू शकतील. या शिवाय संत्र्यामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात. जे त्वचेसाठी फारच फायद्याचे असतात. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास थंडीत संत्री खा. तुम्हाला त्वचेत झालेला बदल जाणवेल.
ह्रदयविकाराचा धोका करते कमी
खूप जणांना ह्रदयविकाराचा धोका अधिक असतो. ज्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते अशांना हा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही जर संत्री खाल्ली तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होऊ शकेल. निरोगी ह्रदय हवे असेल तर तुम्ही संत्री ही खायलाच हवी. संत्र्यामध्ये फ्लेव्हनॉईड्स नावाचा घटक असतो. ज्यामुळे तुम्हाला चांगले ह्रदय मिळण्यास मदत मिळते.
आता बाजारात संत्री दिसली की त्याचे हमखास सेवन करा.
अधिक वाचा
थंडीमुळे सुकलं असेल नाक तर करा हे उपाय