परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर दुबई हा एक उत्तम पर्याय आहे. सिटी ऑफ गोल्ड अशी ओळख असलेल्या या देशात दरवर्षी अनेक लोक पर्यटनासाठी जातात. दुबई हे शहर यु.ए.ई अर्थात संयुक्त अरब एमिरेट्समध्ये वसलेलं आहे. संयुक्त अरब एमिरेट्स हा देश दुबई, शारजाह, अबुधाबी, अजमन, फुजैराह, रास अल खैमाह, उम अल कुवैन अशा एकुण सात एमिरेट्स मिळून तयार झाला आहे. इथले स्थानिक लोक अरब असून इथे अनेक भारतीय, पाकिस्तानी, बांग्लादेशी, आफ्रिकन, सिरियन, ब्रिटीश, फिलिपिन्स असे इतर देशातील लोक कामानिमित्त वास्तव्य करून आहेत. या देशातील दुबई, शारजाह आणि अबुधाबी ही शहरं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही इथे चार ते आठ दिवस पर्यटन नक्कीच करू शकता. हिवाळ्यात नोव्हेंबर ते एप्रिल या पाच महिन्यामध्ये इथलं वातावरण फिरण्यासाठी उत्तम असतं. मात्र त्यानंतर मे ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये इथे अती उन्हाळा असल्याने तापमान फार जास्त असते. जर तुम्हाला या फिरण्याचा खरा आनंद लुटायचा असेल तर डिसेंबर ते मार्च या चार महिन्यात तुमची ट्रीप प्लॅन करा. इतर देशांच्या तुलनेत युएई हा पर्यटनासाठी अतिशय सुरक्षित देश आहे. इथे गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य आहे त्यामुळे महिलादेखील इथे ग्रुपने अथवा सोलो ट्रिपसाठी बिनधास्त जाऊ शकतात. दुबई हे शॉपिंगसाठी प्रसिद्ध असल्यामुळे मनसोक्त शॉपिंग करण्यासाठी हे ठिकाण अगदी बेस्ट आहे.
दुबईत फिरताना या ठिकाणांना जरूर भेट द्या –
दुबई शहर म्हणजे मानवनिर्मित स्वर्गच. म्हणूनच जर यंदा सुट्टीत दुबईला जायचा प्लॅन असेल तर या ठिकाणांना जरूर भेट द्या.
बुर्ज खलिफा –
दुबईमध्ये अतिशय उंच आणि भव्य दिव्य इमारती आहेत. ज्यामध्ये बुर्ज खलिफा ही उंच इमारत पर्यटनाचे आकर्षण आहे. बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारत आहे. या इमारतीमध्ये 124, 125 आणि 148 या मजल्यांवरून तुम्हाला संपूर्ण दुबईचा नजारा पाहता येतो. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळी या ठिकाणी जाऊ शकता. मात्र संध्याकाळी 4 ते 5 या वेळेचं तुमचं बुकींग असेल तर तुम्हाला दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळेची विहंगम दृश्य पाहता येतात. बुर्ज खलिफा ऑन दी टॉपचं संध्याकाळचं तिकीट थोडं खर्चिक आहे. मात्र तुमचा हा नक्कीच खर्च सत्कारणी लागू शकतो. कारण जेव्हा तुम्ही टॉपवरून संपूर्ण दुबईचं दर्शन घेता तुम्हाला एक विलक्षण अनुभव मिळतो. बुर्ज खलिफा, दुबई मॉल या मेट्रो स्टेशनवरून तुम्हाला बुर्ज खलिफाला जाता येतं. जाण्याचा मार्ग दुबई मॉलमधून जातो. मेट्रो स्थानकावरून बुर्ज खलिफा ऑन टॉपपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला कमीत 45 मिनीटे दुबई मॉलमधून चालत जावं लागतं. यासाठी भरपूर चालण्याची तयारी आणि पायात आरामदायक फुटवेअर घाला. या ठिकाणी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत निरनिराळ्या दरात तिकीटे मिळतात. सकाळ आणि दुपारचे दर कमी असून संध्याकाळ ते रात्रीचे दर जास्त असतात या ठिकाणी जाण्यासाठी अंदाजे एका व्यक्तीचे तिकीट 3 ते 5 हजार इतकं असू शकतं. तिकीटाचे दर सिझन आणि वेळेनुसार बदलत राहतात. म्हणून आधीच बुकींग करून ठेवा.
दुबई मॉल –
दुबई मॉल हा दुबईतील एक प्रमुख मॉल आहे. ज्या ठिकाणी तुम्ही एकाच वेळी अनेक मनोरंजक गोष्टींचा आनंद लुटू शकता. त्यामुळे दुबईत गेलात तर दुबई मॉलमध्ये जरूर जा. या मॉलमध्ये दुबई अक्वेरिअम, अंडरवॉटर झू, आईस रिंक , रील सिनेमा, व्हि. आर पार्क, म्युझिकल फांऊटन शो अशा अनेक गोष्टींचा आस्वाद तुम्ही एकाच ठिकाणी घेऊ शकता. शिवाय दुबई हे शॉपिंगचे केंद्रबिंदू असल्यामुळे जगभरातील नानाविध गोष्टी तुम्हाला या मॉलमध्ये खरेदी करता येतात. विविध ब्रॅंडच्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. दुबईमध्ये तुम्ही बस, टॅक्सी अथवा मेट्रोने या मॉलमध्ये जाऊ शकता. या मॉलमध्ये जाण्याचा कोणताच खर्च नाही मात्र यात फिरताना तुम्हाला विविध मनोरंजक ठिकाणी जाण्यासाठी काही प्रमाणात एन्ट्री फी आकारण्यात येते. शिवाय मॉलमधील आकर्षक वस्तू पाहून तुमच्या खिशातील पैसे हळू हळू खर्च नक्कीच होऊ शकतात.
दुबई फ्रेम –
दुबईमधील आणखी उंच इमारत म्हणजे दुबई फ्रेम. दुबई फ्रेम ही शहरातील सर्वात मोठी आणि उंच सोनेरी रंगाची फ्रेम आहे. 493 फूट उंच ही दुबईतील फ्रेम झबील पार्कमध्ये उभारण्यात आली आहे. या फ्रेमच्या एकाबाजूने तुम्ही लिफ्टने या फ्रेमच्या वरच्या भागात जाऊ शकता तसंच परत येण्यासाठी दुसऱ्या बाजूच्या फ्रेमने तुम्हाला लिफ्टने खाली आणण्यात येतं. या फ्रेमसाठी काच, स्टील, अॅल्युमिनियम या धातुंचा वापर करण्यात आला आहे. फ्रेमच्या वरच्या भागात पोहचल्यावर तुम्हाला एकाबाजून जुनी दुबई आणि दुसऱ्या बाजूने नवी दुबई दिसू लागते. या फ्रेमच्या वरच्या भागातील फ्लोरिंग हे काचेपासून तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळे त्यावर उभं राहील्यावर तुमच्या पायाखालील काचेतून जमिनीकडचा भाग सहज दिसू लागतो. इथं उभं राहिल्यावर एका क्षणासाठी खाली पाहिल्यावर तुमच्या ह्रदयाचा ठोका नक्कीच चुकतो. जो अनुभव तुमच्यासाठी खरंच रोमांचक असू शकतो.
जुमेराह बीच –
अथांग समुद्र किनारा आणि वाळूचा वापर करून दुबईमध्ये अक्षरशः मानवी स्वर्ग उभारण्यात आला आहे. या गोष्टींच्या आकर्षणामुळे देशविदेशातील पर्यटक दुबईत पर्यटनासाठी येत असतात. निळसर समुद्रकिनारा, पांढरीशुभ्र वाळू, खजुराच्या आकाराचं भव्य दिव्य पाम बीचचं मनमोहक दृश्य, हॉटेल एमिरेट्स आणि हॉटेल बुर्ज अल अरब, विविध तारांकित हॉटेल्स, मॉल्स, वॉटर पार्क्स, हॅलिकॉप्टरने वेधलेलं विहंगम दृश्य, डिनर क्रुझ अशा विविध गोष्टींचा आनंद तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. दुबईतील सर्वात महागडी आणि आलिशान जीवनशैली तुम्ही इथे नक्कीच अनुभवू शकता.
डेझर्ट सफारी –
दुबईतील डेझर्ट सफारी करणं हा एक थरारक आणि रोमांचक अनुभव आहे. दुबईतील वाळंवटात डुन बॅश करण्यासाठी अनेक प्रेक्षक या ठिकाणी येतात. वाळंवटांच्या वेड्या वाकड्या टेकड्यांवरून वेगाने फिरणाऱ्या आलिशान गाड्या तुमच्या ह्रदयाचा ठोका चुकवतात. एखाद्या रोलर कोस्टरसारखा हा अनुभव असतो. गाडी वाळूत नेण्यापूर्वी गाड्यांची हवा कमी केली आणि पर्यटकांना सीट बेल्ट लावून सुरक्षित केले जाते आणि मग उंच सखल वाळंवटातून हा रोमांचक प्रवास सुरू होतो. संध्याकाळी याच ठिकाणी तुम्हाला वाळंवटातील जीवनशैलीचा सुखद अनुभव मिळू शकतो. हिना पेटिंग म्हणजेच मेंदी, मंद दिव्यांची रोशनाई, बेली डान्स, बार्बेक्यू, पारंपरिक वेषभूषेतील फोटोसेशन, उंटसफारी अशा अनेक गोष्टींचा आनंद तुम्ही डेझर्ट सनसेट टूरमध्ये घेऊ शकता.
मिरॅकल गार्डन –
दुबईमधील वास्तू आणि गार्डन्स म्हणजे मानवनिर्मित कलाकृतींचा अद्भूत नजाराच आहेत. यापैकीच एक आश्चर्य म्हणजे मिरॅकल गार्डन. वाळंवटात विविध प्रकारच्या फुलांची निर्मिती करून मनमोहक गार्डन उभारण्यात आलं आहे. नाचणाऱ्या बाहुल्या, स्वप्नवत बंगले, प्राणी, पक्षी, फुलपाखरे, विमान अशा भव्य दिव्य आकारांमध्ये ही बाग फुलवण्यात आली आहे. कोणताही निसर्गप्रेमी या गार्डनच्या नक्कीच प्रेमात पडेल असं हे ठिकाण आहे. 72 हजार चौ. मीटर आकारात 50 हजार प्रजातीची फुलझाडे इथे फुलवण्यात येतात. मिरॅकल गार्डनला पोहण्यासाठी कोणतंच मेट्रो स्टेशन नाही. ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी अथवा बसनेच तुम्हाला प्रवास करावा लागेल. शिवाय यासाठी मानसी अंदाजे अकराशे रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येतं. या ठिकाणी बाहेरून कोणतेही खाद्यपदार्थ अथवा पाणी नेण्यास परवानगी नाही.
ग्लोबल व्हिलेज –
जर तुम्ही दुबईत जात आहात तर तुम्ही इथल्या ग्लोबल व्हिलेजला भेट द्यायलाच हवी. कारण यामुळे एकाच ठिकाणी तुम्हाला अख्खं जग फिरल्याचा आनंद मिळू शकतो. मात्र लक्षात ठेवा ग्लोबल व्हिलेजला जाताना दिवसभरात इतर कुठल्याच ठिकाणी जाऊ नका. ग्लोबल व्हिलेज इव्हेंट संध्याकाळी चार नंतर सुरू होतं. त्या आधी हॉटेलवर मस्त आराम करा आणि मगच या ठिकाणी जा. एकतर ग्लोबल व्हिलेज शहरापासून फार दूर आहे. शिवाय जगभरातील विविध स्टॉल बघण्यासाठी तुम्हाला फार चालावं लागतं. एकाच ठिकाणी 27 देश आणि त्या देशातील देखावे, लोकप्रिय वस्तूंची खरेदी हा एक समृद्ध अनुभव असतो. म्हणूनच हा नजारा पाहण्यासाठी चालण्याची तयारी आणि पैशांनी भरलेलं पाकीट या दोन गोष्टींची तयारी ठेवा.
दुबईत या व्यतिरिक्त अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही जायलाच हवं. त्यापैकी शॉपिंग सेंटर आणि मार्केट्स विषयी एका वेगळ्या लेखातून मी तुम्हाला माहिती देणार आहे. दुबई क्रिक आणि दुबई मरिनामधून केलेली डिनर क्रूझ, अॅडवेंचर पार्क्स, सिटी वॉक, फ्लेमिगों पार्क, डॉल्फिन शो, विविध म्युझियम्स, अबुधाबी आणि शारजाह टूर अशा अनेक गोष्टी तुम्ही या दरम्यान करू शकता. तेव्हा तयारीला लागा आणि या वेकेशनचा आनंद लुटा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
इंटरनॅशनल टूर स्वतःच प्लॅन करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
कमी बजेटमध्ये परदेशी जायचं आहे, मग ही डेस्टिनेशन आहेत परफेक्ट
कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी ’25’ पर्यटन स्थळं