Advertisement

लाईफस्टाईल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माहिती (Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi)

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Apr 5, 2021
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi

Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार होतेच शिवाय ते महान समाजसुधारक, न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि तत्त्वज्ञ देखील होते. स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री असलेल्या बाबासाहेबांनी आयुष्यभर मागासलेल्या आणि दलितांच्या अन्यायाविरूद्ध आपले आयुष्य वेचले. दलितांचा उध्दारकर्ता असंच त्यांना आजही ओळखलं जातं. महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. अर्थशास्त्रात उच्चविद्याविभूषित असलेल्या आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक विषयांवर संशोधने केली होती. त्यांचे भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते. बाबासाहेबांचा जन्मदिवस १४ एप्रिल १८९१ रोजी असल्यामुळे हा दिवस बाबासाहेबांची जयंती या नावाने ओळखला जातो. या तारखेला भीमजयंती या नावानेही ओळखले जाते. भारत आणि भारताबाहेर हा दिवस समता दिन म्हणूनही साजरा केला जातो. यासाठीच या खास दिनानिमित्त जाणून घेऊ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती (Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती (Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi)

नाव – डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
जन्म – १४ एप्रिल १८९१ (डॉ. आंबेडकर जयंती)
जन्मस्थळ – इंदौर, मध्यप्रदेश
वडीलांचे नाव – रामजी मालोजी सकपाळ
आईचे नाव – भिमाबाई मुबारदकर
पत्नीचे नाव – रमाबाई आंबेडकर आणि सविता आंबेडकर
शिक्षण – 
एम ए. ( अर्थशास्त्र) एलफिस्टन हायस्कूल, मुंबई विद्यापीठ
पीएचडी ( कोलंबिया विद्यापीठ)
मास्टर ऑफ सायन्स  (लंडन विद्यापीठ)
डॉक्टर ऑफ सायन्स (लंडन विद्यापीठ)
पुरस्कार – भारतरत्न (१९९०)
मृत्यू – ६ डिसेंबर १९५६

Information Of Dr Babasaheb Ambedkar In Marathi

instagram

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालपण (Dr. Babasaheb Ambedkar Early Life)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेशमध्ये १४ एप्रिल १८९१ मध्ये झाला. बाबासाहेब त्यांच्या आई वडिलांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते. रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई यांच्या पोटी मध्यप्रदेशमधील इंदौर येथील महू या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म घेतला. बाबासाहेब जन्माला आले तेव्हा त्यांचे वडील रामजी सकपाळ हे भारतीय सैन्यदलात सुभेदार या पदावर कार्यरत होते. वडिलांच्या निवृत्तीनंतर संपूर्ण कुटुंबासह बाबासाहेब महाराष्ट्रात परतले. बाबासाहेबांचे मुळगाव रत्नागिरीतील अंबवडे येथे होते. मात्र महार जातीतील असल्याने त्याच्याबाबत नेहमी भेदभाव केला जात असे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती)

जाणून घेऊया महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती

डॉ. भिमराव आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास (Dr. Babasaheb Ambedkar Education )

प्राथमिक आणि उच्च शिक्षणासाठीही बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला होता. त्या काळी दलित मुलांना शाळेत वर्गात बसण्याची आणि पाणी पिण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळवण्यासाठी बाबासाहेबांना अनेक कष्ट घ्यावे लागले. 

जाणून घेऊया शिवजंयती अर्थात छत्रपती शिवाजी महाराजची माहिती

प्राथमिक शिक्षण –

वडील भारतीय सैन्यदलात असूनही आर्मी स्कूल मध्येही त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत. सैन्यदलातील लोकांच्या मुलांना मिळणाऱ्या सवलतींचा त्यांना फायदा झाला. मात्र शाळेत सतत जातिभेदाला सामोरे जावे लागत असे. बाबासाहेबांनी अशा परिस्थितीतही त्याचे प्राथमिक शिक्षण दापोलीत पूर्ण केले. या शाळेत त्यांना वर्गात बसण्याची परवानगी मिळाली नव्हती. पुढे वडिलांसोबत साताऱ्याला गेल्यावर पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांनी सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. पुर्वी कोकणातील लोकांमध्ये आडनावे गावावरून ठरत असून त्यापुढे कर लावण्याची पद्धत होती. त्यानुसार त्यांचे नाव आंबवडेकर असे ठेवण्यात आले होत. मात्र उच्चारताना त्रास होत असल्यामुळे पुढे त्याची आंबेडकर अशी नोंद करण्यात आली. साताऱ्यामध्ये चौथीची परीक्षा पास झाल्यावर बाबासाहेब सहपरिवार मुंबईला आले. 

लोकमान्य टिळकांची माहिती,सविस्तर माहिती घ्या जाणून

मुंबई विद्यापीठातून पदवीधर –

बाबासाहेब १९१२ साली मुंबईतील एलफिस्टन हायस्कुलमध्ये पदवीधर झाले. बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि बुद्धीमान होते. त्यामुळे ते प्रत्येक परीक्षेत ते नेहमीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असत. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मुंबईत पदवी प्राप्त करणारे बाबासाहेब हे पहिले दलित होते. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थ शास्त्र आणि राजनिती या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली होती. संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने त्यांनी फारसी भाषेतून शिक्षण घेतलं. आंबेडकर मॅट्रिक पास झाल्यावर त्यांच्या ज्ञातिबांधवांनी त्यांच्या कौतुकाचा एक कार्यक्रम केला होता. कारण त्या काळात एका दलित मुलांने एवढे यश मिळवणे ही एक खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या केळुसकर गुरूजींनी त्यांना स्वतः लिहिलेल्या बुद्धचरित्रातची एक प्रत भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांना बुद्धांच्या शिकवणीबद्दल आकर्षण निर्माण झाले. आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेब महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतील असं त्यांच्या गुरूजींना वाटत नव्हतं. यासाठीच त्यांनी बाबासाहेबांची भेट महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी करून दिली. बाबासाहेबांची हुशारी पाहुन महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. ज्यामुळे पुढे बाबासाहेब मुंबईतील एलफिस्टन येथे शिक्षण घेऊन पदवीधर झाले. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती)

अण्णाभाऊ साठे यांची माहिती (Annabhau Sathe Information In Marathi)

कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी –

बाबासाहेबांना त्यांच्या बुद्धीमत्तेमुळे बडोदा संस्थानात राज्य सरकारने रक्षामंत्री बनवलं मात्र तिथेही त्यांना सतत जातिभेदाला सामोरे जावे लागत असे. सतत होणाऱ्या अशा अपमानामुळे बाबासाहेब जास्त काळ या पदावर काम करू शकले नाहीत. पुढे त्यांना न्युयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून उच्चपदवीसाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी निघून गेले. १९१५ साली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानव विज्ञान आणि अर्थशास्त्रातून एम ए ची पदवी प्राप्त केली. प्राचीन भारताचे वाणिज्य या विषयावर संशोधन केले. अमेरिकेतून १९१६ साली त्यांनी यासाठी पीएच डी मिळवली. 

लंडन विद्यापीठातून उच्च शिक्षण –

अमेरिकेतील फेलोशिप संपल्यावर बाबासाहेब पुन्हा भारतात परतले. मात्र येताना ते स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अॅंड पॉलिटिकल सायन्स यात एम.एस.सी. आणि डी.एस.सी. शिवय बार एट. लॉसाठी नोंदणी करून आले होते. भारतात आल्यावर सर्वात आधी त्यांनी प्रथम शिष्यवृत्तीच्या नियमानुसार बडोदा राजदरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची नोकरी केली. राज्याचे रक्षा सचिव हे पद सांभाळले. मात्र जातिभेदामुळे त्यांना नोकरी करताना खूपच त्रास सहन करावा लागत असे. नोकरी करत असूनही शहरात भाड्याने घर मिळाले नाही. या त्रासाला कंटाळून त्यांनी ही नोकरी सोडून खाजगी शिक्षक आणि अकाऊंटटचे काम सुरू केले. सल्लागाराचा व्यवसायही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमुळे तो करता आला नाही. शेवटी ते मुंबईत आले आणि त्यांनी राजनैतिक अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. नोकरी करत असताना ते त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पैसे जमवत होते. ज्यामुळे पुन्हा १९२० साली ते लंडनला पुढील शिक्षणासाठी गेले. १९२१ साली लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अॅंड पोलिटिकल सायन्स मधून त्यांनी मास्टर पदवी प्राप्त केली. पुढे डी. एस. सी. ही पदवीदेखील मिळवली. जर्मनी विद्यापीठीतून डी.एस.सी केले. न्यायशास्त्राचा अभ्यास करून ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टर चे काम पाहिले. पुढे ८ जुन १९२७ ला कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली.  

वाचा – महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती

वैयक्तिक जीवन (Personal Life)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९०६ साली रमाबाई यांच्याशी विवाह झाला होता. रमाबाई आणि बाबासाहेबांच्या यशवंत नावाचा मुलगा झाला. मात्र १९३५ साली रमाबाईंचे एका दुर्धर आजाराने निधन झाले. १९४० साली बाबासाहेबांनाही अनेक आजारांनी ग्रासले होते. मुंबईत या आजारांवर उपचार घेत असताना त्यांची ओळख डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत झाली. सम विचारांमुळे पुढे त्या दोघांनी विवाह केला. डॉ. शारदा यांनी विवाहानंतर स्वतःचे नाव बदलून सविता आंबेडकर असे केले. डॉ. शारदा यांनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेतली. समाजात त्यांना माई या नावाने ओळखले जाऊ लागले. 

वैयक्तिक जीवन

instagram

अस्पृश्यता आणि जातीभेद विरोधी चळवळ (Dalit MoveMent)

डॉक्टरेट मिळवल्यावर भारतात परतून बाबासाहेबांनी जातिभेदाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. समाजकार्य करत अर्थार्जनासाठी त्यांनी वकिली करण्याचे ठरवले. समाजातील अस्पृश्यता आणि जातिभेद कमी करण्यासाठी त्यांनी सक्रिय स्वरूपात काम करण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी पहिली केस नाशिक जिल्ह्यातील महार जातीच्या जाधव बंधूंची स्वीकारली. ही केस त्यांनी यशस्वीपणे जिंकली. वकिलीतून पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते यासाठी त्यानी वकिलीसोबत कायद्याच्या प्राध्यापकाची नोकरीदेखील केली. अस्पृश्यतेचा विरोध करण्यासाठी साऊथबरो कमिटीसमोर त्यांनी आपले प्रखर विचार मांडले आणि दलित आणि इतर मागासलेल्या समाजासाठी स्वतंत्र मतदान विभाग आणि आरक्षणाची मागणी केली. जनजागृती करण्यासाठी मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. शाहू महाराजांनीही यासाठी बाबासाहेबांना नेहमीच सहकार्य केले होते. त्यावेळी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. यासाठीच बाबासाहेबांना महाडमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. सामाजिक आणि राजकीय लोकांना समाजात समान स्थान देणे हे या सभेचे ध्येय होते. अपृश्यता निवारण्यासाठी त्यांनी केलेल्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचेही उदाहरण लक्ष्यवेधी होते. काळाराम सत्याग्रह म्हणजे दलितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजाला केलेले एक आवाहन होते. सामाजिक बदलाची प्रक्रिया हळू हळू होत असते हे माहीत असल्यामुळे बाबासाहेब आयुष्यभर अशा निरनिराळ्या मार्गांनी शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला.

डॉ. आंबेडकरांचा राजकीय प्रवास (Political Journey Of Dr. Babasaheb)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती म्हणजे आंबेडकरांनी १९१९ पासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करण्यास सुरूवात केली होती. कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्यांना १९३० मध्ये लंडन येथील गोलमेज परिषदेत अस्पृशांचा प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पुढे १९३६ साली त्यांनी स्वतंत्र लेबर पार्टी निर्माण केली. केंद्रिय विधानसभेत पंधरा जागा त्यांच्या पार्टीने जिंकल्या होत्या. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी या पार्टीचे भारतीय अनुसूचित जाती संघ मध्ये रूपांतर केले. पुढे कॉंग्रेस  आणि महात्मा गांधी यांनी दलित वर्गाला हरिजन असे नाव दिले. मात्र डॉ. आंबेडकरांना हे नाव आवडले नाही त्यामुळे त्यांनी याचा विरोध केला. अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ भारतीय संविधान सभेसाठी च्या निवडणूकीत उत्तम कामगिरी करू शकला नाही. आंबेडकरांनी मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगालच्या मतदारसंघातून संविधान सभेत निवडून आले. ऑगस्ट १९४७ मध्ये बाबासाहेबांची राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताची राज्यघटना अंमलात आली. भारतीय राज्यघटनेत मोलाचे योगदान असल्यामुळे बाबासाहेबांना पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या नावाने ओळखले जाऊ लागले.  

डॉ. आंबेडकरांचा राजकीय प्रवास

instagram

भारतीय संविधान (Constitution Of India)

डॉ. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचा मुळ उद्देश देशातील जातिभेद आणि अस्पृश्यता नष्ट करणे हा होता. २९ ऑगस्ट १९४७ मध्ये बाबासाहेब संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ दोन वर्षे अकरा महिने आणि सात दिवसांच्या अथक परिश्रमाने भारतीय संविधान सादर करण्यात आले. तत्कालिन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या कडे संविधान सुपूर्त करण्यात आले होते. भारतीय संविधानात भारतातील सर्व नागरिकांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात  आला. अस्पृश्यतेला नष्ट केले गेले आणि दलितांसोबतच महिलांनाही समान अधिकार मिळवून देण्यात आला. 

डॉ. आंबेडकरांनी स्वीकारला बौद्धधर्म (Dr. Babasaheb Ambedkar Accepted Buddhism)

बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झटले. १९५० साली बाबासाहेब एका बौद्ध सम्मेंलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले होते. त्या ठिकाणी सम्मेंलनात झालेल्या बौद्ध धर्माच्या विचारांनी ते इतके प्रेरित झाले ती त्यांनी पुढे स्वतः बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या सम्मेलनानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि मगच ते भारतात परतले. भारतात आल्यावर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अनेक पुस्तके लिहीली. १९५५ साली त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. त्यानंतरच्या सभेत त्यांनी जवळपास एकाच वेळी पाच लाख अनुयायींना बौद्ध धर्माची दिक्षा दिली. पुढे ते काठमांडूमधील आयोजित चौथ्या जागतिक बौद्ध सम्मेलनांत सहभागी झाले आणि २ डिसेंबर १९५६  साली शेवटचे ‘दी बुद्धा ऑर कार्ल मार्क्स’ या पुस्तकाची निर्मिती केली. 

डॉ. आंबेडकर साहित्य (Dr Ambedkar Books)

डॉ. बाबासाहेबांची साहित्य संपदा विपूल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती आणि लिखाण असलेल्या या ग्रंथसंपदेमधून आजही ते विचारांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करत आहेत. त्यापेैकी काही निवडक खालीलप्रमाणे

 • भारतातील जाती त्यांची प्रणाली, उत्पत्ती आणि विकास
 • इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
 • जातीचा विनाश
 • व्हु वेअर दी शुद्राज
 • दी अन्टटचेबल: व्हु वेअर दे अॅंड व्हाय दे बिकेम अनटचेबल
 • थॉट्स ऑन पाकिस्तान
 • दी बुद्ध अॅंड हिज धम्म
 • बुद्ध ऑर कार्ल मार्क्स
 • दी प्रॉब्लेम ऑफ रूपी
 • इस्ट  इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थनिती
 • जातिव्यवस्थेचे निर्मूलन
 • संघराज्य विरूद्ध स्वातंत्र्य
 • व्हिच वे टू इमॉन्सिपेशन
 • रानडे गांधी आणि जिन्ना
 • गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ति
 • जातीय पेच  आणि तो सोडवण्याचा मार्ग

या व्यतिरिक्त बाबासाहेबांचे अनेक लेखही प्रकाशित झालेले आहेत. शिवाय त्यांचे आत्मचरित्र आणि त्यांच्यावर आधारित अनेक ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार आजही मार्गदर्शक ठरत आहेत.  

डॉ. आंबेडकरांचा मृत्यू (Dr. Ambedkar Death)

५ डिसेंबर १९५६च्या रात्री बाबासाहेबांनी त्यांचा शेवटचा ग्रंथ ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचयाच्या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्याची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेबांचे निधन झाले. त्यावेळी बाबासाहेबांचे वय ६४ वर्षांचे होते. महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत अनुयायींच्या दर्शनासाठी आणण्यात आले होते. त्यांच्यावर बौध धर्माप्रमाणेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकक यांनी त्यांच्या ६५ वर्षांच्या कालवधीत देशाच्या निरनिराळ्या क्षेत्रात अनमोल असं योगदान दिलं.१९९० मध्ये बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंबेडकर जयंती निमित्त आजही देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.