महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती (Mahatma Jyotiba Phule Information In Marathi)

Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि चुलते दरबारात फुले पुरवण्याचे काम करीत असत. त्यामुळे त्यांचे मूळ आडनाव गोरे असूनही त्यांना फुले या आडनावाने ओळखण्यात येऊ लागले. पुढे कालांतराने फुले हीच त्यांची ओळख झाली. जोतिबा फुले समाजसुधारक, समाजप्रबोधक, विचारवंत, लेखक आणि क्रांतिकारी होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला, शेतकरी आणि बहुजन समाजाचे अन्यायाविरूद्ध प्रबोधन केले, जाती व्यवस्थेला विरोध केला. त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी एका मुंबईतील एका सभेत त्यांना समाजाकडून ‘महात्मा’ ही पदवी बहाल करण्यात आली. महात्मा फुले जयंती निमित्त जाणून घेऊ या क्रांतीसूर्याचा जीवनप्रवास.

Table of Contents

  महात्मा फुले यांची माहिती (Mahatma Phule Information In Marathi)

  महात्मा जोतिबा फुलेंची थोडक्यात माहिती 

  • जन्म - 11 एप्रिल 1827
  • मृत्यू - 28 नोव्हेंबर 1890
  • जन्मस्थळ - सातारा, महाराष्ट्र
  • वडील - गोविंदराव फुले
  • आई - चिमणाबाई फुले
  • पत्नी - सावित्रीबाई फुले
  • मुले - यशवंतराव फुले ( दत्तक मुलगा)
  • शिक्षण - स्कॉटिश मिशन हायस्कूल, पुणे
  • संघटना - सत्यशोधक समाज

  वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माहिती

  बालपण आणि तरूणपणीचे ज्योतिबा फुले (Early Life Of Jyotiba Phule In Marathi)

  महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी साताऱ्या जिल्ह्यातील एका लहानशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते. मात्र ज्योतिबांच्या जन्मानंतर ते काही महिन्यांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. प्राथमिक शिक्षण घेत घेत ज्योतिबा फुले आणि भाजी विकण्याचेही कामही करत असत. जोतीरावांना इंग्रजी शिक्षण घेण्याची इच्छा होती. 1842 मध्ये ज्योतिबांनी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. घरात बेताची परिस्थिती असूनही केवळ तल्लख बुद्धिमत्तेमुळे त्यांनी हा अभ्यासक्रम अवघ्या पाच ते सहा वर्षांतच पूर्ण केला. तिथे त्यांची ओळख सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राम्हण मुलाशी झाली जे पुढे त्यांचे आयुष्यभर जिवलग मित्र होते. शैक्षणिक काळात त्यांचे सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर हेही मित्र त्यांना भेटले, या मित्रांनीही जोतिबांच्या सामाजिक सुधारणेच्या चळवळीत त्यांना नेहमीच सहकार्य केले. शिक्षणासोबतच त्यांनी दांडपट्टा, मल्लविद्या देखील संपादन कली होती. महात्मा फुले लहानपणापासूनच हुशार, करारी, शिस्तप्रिय आणि अभ्यासू होते. त्यावेळी पुण्यात कबीरपंती फकीर येत असत. ते ज्योतिबा फुले यांच्याकडून कबीरांचे ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे लहानपणापासून महात्मा फुलेंच्या मनावर कबीरांच्या विचारांची शिकवण बिंबवली गेली होती. तेरा वर्षांचे असताना शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्योतिबांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. 

  समाजसुधारक जोतिबा फुले (Social Reformer Jyotiba Phule)

  महात्मा फुले 1848 साली एका उच्चवर्णीय मित्रांच्या लग्नसोहळ्याला गेले होते. तिथे त्यांचा त्या मंडळींकडून जातीवरून अपमान झाला आणि हीच घटना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.या घटनेमुळे त्यांना भारतातील जाती व्यवस्थेची जाणीव झाली. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अस्वस्थ झाले. जातिभेदाच्या भिंती पाडून टाकण्यासाठी त्यांना स्त्रिया आणि अस्पृश्यांना सुशिक्षित करणं खूप गरजेचं आहे असं वाटू लागलं. महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. बालविवाहास विरोध केला. विधवा पुर्नविवाहाचा पुरस्कार केला. विधवा केशवपन करण्यास विरोध केला. दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. पुस्तके आणि साप्ताहिकांमधून दलित आणि अस्पृश्य समाजाचे प्रबोधन केले. वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था या समाजाचं शोषण करणाऱ्या असून जोपर्यंत त्या पूर्णपणे नामशेष होत नाहीत तोपर्यंत एक समाज निर्मिती होणं अशक्य आहे असं त्यांना वाटू लागलं. असं परखड मत मांडणारे ते त्या काळात पहिले भारतीय होते म्हणूनच जाती व्यवस्था निर्मूलन आंदोलनाचे ते प्रणेते ठरले. यासाठीच जाणून घ्या महात्मा ज्योतिबा फुले विचार  जे सर्वांनाच देतील जगण्याची नवी प्रेरणा  

  स्त्री शिक्षणाचा घेतला वसा (Efforts Towards Women Education)

  आज समाजात स्त्री शिक्षण घेत आहे याचा सर्वस्वी श्रेय जाते ते म्हणजे महात्मा फुले यांना. आपल्या पत्नीला शिक्षण देऊन पहिली शिक्षिका हा मान मिळवून देण्यासाठीही महात्मा फुले अग्रेसर ठरले. 

  महिला आणि मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर कार्य केले. मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी आधी त्यांची पत्नी सावित्रीबाई यांना साक्षर केले. पुढे 1848 मध्ये मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे धर्म भ्रष्ट करणे असं वातावरण असलेल्या समाजात त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील एका वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. समाजातील विरोधामुळे ती बंद पडल्यामुळे पुढे पुन्हा 1851 साली पेठेतच त्यांनी मुलींची दुसरी शाळा सुरू केली. अशा प्रकारे मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. मुलींसोबत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मुलामुलींनाही शिक्षण मिळावे यासाठीही त्यांनी शाळा सुरू केली.  मानवी हक्कावर थॉमस पेन यांनी लिहिलेलं एक पुस्तक महात्मा फुलेंच्या वाचनात आलं होतं. त्यांच्या विचारांनी प्रेरित झाल्यामुळे त्यांच्या मनात सामाजिक न्यायाचे विचार येऊ लागले आणि समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी स्त्री  शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले. 

  धर्म आणि जातीबाबतचा दृष्टीकोण (Views On Religion And Caste)

  महात्मा फुले यांचा धर्म आणि जातीबाबतचा दृष्टीकोन नक्की काय होता ते आपण जाणून घेणं गरजेचे आहे. महात्मा फुले यांनीही कधीही धर्म आणि जात मानली नाही. याबाबतीच एक गोष्ट आम्ही शेअर करत आहोत. 

  एक दिवशी महात्मा फुले यांनी पाहिले की काही महार पुरूष आणि महिला भर उन्हामध्ये पाण्याची भीक मागत फिरत आहेत. ते लोकांच्या हातापाया पडत होते. थेंबभर पाण्यासाठी लोकांची गयावया करत होते. तिथे जवळच लोक अंघोळ करत होते, बायका धुणीभांडी करत होत्या मात्र या लोकांकडे कोणीच लक्ष देत नव्हते. महात्मा फुलेंना या लोकांची दया तर आलीच पण इतर उच्च धर्मीयांचा रागही आला. तेव्हा  त्यांनी त्याच हौदातील पाण्याने भरलेले भांडे त्यांना पाणी पिण्यासाठी दिले. शिवाय त्यानंतर स्वतःच्या घराजवळील पाण्याचा हौद या लोकांसाठी खुला केला. 

  कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केला नाही आणि जातिभेद ही केवळ मानवाची निर्मिती आहे असं रोखठोकपणे मांडताना विश्वाची निर्मिती करणाऱ्या नैसर्गिक शक्तीवरही त्यांचा विश्वास होता. फक्त समाजात माणसाने सर्वांसोबत गुण्यागोविंदाने राहावे असं त्यांना वाटत असे. यासाठी ज्योतिबांना रूढीवादी तत्कालिन समाजावर प्रखर टीका केली. उच्च जातीतील लोकांच्या हुकूमशाहीला त्यांनी वेळोवेळी कडक विरोध केला. असं असलं तरी सर्व जातीच्या लोकांसाठी त्यांनी त्यांच्या घराचे दरवाजे कायम उघडे ठेवले होते. स्त्री पुरूष समानतेसाठी त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांना त्यांच्या सर्व सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले होते. अर्थातच महात्मा फुलेंच्या या वागण्याचा तत्कालिन उच्चवर्णीयांना राग येत असे. त्यामुळे सामाजिक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप महात्मा फुलेंवर सतत केला जात असे. काहींनी तर त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रचार करत असल्याचा आरोपही केला होता. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबियांनीही त्यांना या कार्यासाठी विरोध केला होता. मात्र ज्योतिबा  फुले आपल्या विचारांवर ठाम होते आणि त्यांनी ही चळवळ पुढे चालूच ठेवली. त्यांचे आधूनिक विचार पाहून त्यांना त्यांच्या काही ब्राह्मण मित्रांनी मदतीचा हात पुढे केला. शिवाय आयुष्यभर या आंदोलनासाठी त्यांना पाठिंबा देखील दिला.

  सत्यशोधक समाज (Satyashodhak Samaj)

  सत्यशोधक समाजाची नक्की प्रेरणा कशी मिळाली आणि त्याचा  पुढे कसा काय विकास झाला याबाबतील काही माहिती - 

  24 सप्टेंबर 1873 साली महात्मा फुले यांनी महिला, शुद्र आणि दलित समाजाच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीतून दलित समाजाची मुक्तता करणे आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणिव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. या माध्यमातून त्यांनी त्याकाळी होत असलेल्या जातीभेद आणि जाती व्यवस्थेचा निषेध केला. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. छत्रपती शाहू महाराजांनीही त्यांच्या या चळवळीस नेहमीच पाठिंबा दिला. सत्यशोधक समाजाने तर्कशुद्ध विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार केला. ज्यात अस्पृश्यतेचा विरोध करणारी, मानवी कल्याण, आनंद, ऐक्य, समानता आणि सुलभ धार्मिक तत्त्वे मांडण्यात आली. पुण्यातील दीनबंधू या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी समाजात जनजागृती केली. फुलेंच्या सत्यशोधक समाजामध्ये दलित समाजासोबतच ब्राम्हण, मुस्लिम आणि काही सरकारी अधिकारीही होते. असं असूनही त्या काळात वर्चस्व असणाऱ्या जातींमुळे फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. महात्मा फुले स्वतः माळी समाजाचे असूनही त्यांनी या संस्थेची आर्थिक जबाबदारी स्वीकारली होती. जोतीराव फुले यांच्या  पत्नी सावित्रीबाई यांचे कार्यही प्रेरणादायी आहे. त्यांनी आयुष्यभर जोतिबांना सहकार्य केले. स्त्रीमुक्ती आंदोलनाची महाराष्ट्रातील पहिली अग्रणी म्हणून त्यांची इतिहासात दखल घेण्यात येत आहे. मुलींना शिकवण्यासाठी जोतिबांकडून आधी सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेतले. जोतीरावांची संपूर्ण विचारसरणी त्यांनी आत्मसात केली. एवढंच नाही तर जोतिबांच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या कार्यांची धुराही सांभाळली. 

  महात्मा फुलेंचे साहित्य (Mahatma Phule Books)

  महात्मा फुले हे एक व्यापारी, नगरपरिषद सदस्य तर होतेच शिवाय उत्कृष्ट लेखकही होते. त्यांनी लेखनाच्या माध्यमातूही समाजप्रबोधन केले. 

  • तृतीय तृतीय रत्न - नाटक
  • छत्रपती शिवाजी राजे भोसले - पोवाडा ( यासोबतच जाणून घ्या शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि गाणी )
  • ब्राम्हणांचे कसब - लेखसंग्रह
  • गुलामगिरी - लेखसंग्रह
  • शेतकऱ्यांचा आसूड - लेखसंग्रह
  • सत्सार अंक १ - लेखसंग्रह
  • सत्सार अंक २ - लेखसंग्रह
  • इशारा - लेखसंग्रह
  • सार्वजनिक सत्यधर्म - लेखसंग्रह

  त्याचप्रमाणे मराठीतील हे दर्जेदार साहित्य तुम्ही आवर्जून वाचायलाच हवे