आजकाल नवनवीन डिझाईनचे आणि ट्रेंडिग टॅटू गोंदवण्याची जणू फॅशनच आली आहे. अंगावर गोंदण गोंदवणे ही खरंतर पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे. मात्र आता या गोष्टीला ‘टॅटू’ या गोंडस नावामुळे ‘फॅशन आयकॉन’चं रुप प्राप्त झालं आहे. सध्या सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुषांमध्ये टॅटू गोंदवून घेण्याचं क्रेझ निर्माण झालं असलं तरी तरुणाईत हे प्रमाण जरा जास्त आहे.
Table of Contents
#inked असं टॅग करुन टॅटू इन्स्टावर शेअर करण्याचं सध्या फॅडच निर्माण झालं आहे. मात्र टॅटू काढण्यापूर्वी टॅटूबाबत काही गोष्टी आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण टॅटू काढण्याची फॅशन जितकी लोकप्रिय आहे तितकेच टॅटूबाबत गैरसमजदेखील आहेत.
माणसाच्या त्वचेवर साधारणपणे सात त्वचेचे थर असतात त्यापैकी वरील तीन थरांवर टॅटू काढला जातो. काळा रंगापासून ते अगदी विविध रंगाचा वापर टॅटू काढले जातात. अगदी लहान चिन्हांपासून ते अगदी मोठमोठ्या आकाराचे टॅटू काढता येतात. टॅटूची किंमत टॅटूच्या आकारावर अवलंबून आहे. त्यामुळे अगदी पाचशे रुपयांपासून ते कितीही रुपयांचे टॅटू काढले जातात. चांगल्या परिणांमासाठी आणि निरोगी आरोग्याच्या दृष्टीने टॅटू शक्यतो चांगल्या स्टुडिओमध्ये प्रोफेशनल टॅटू आर्टिस्टकडूनच काढून घ्यावेत. स्टुडिओमध्ये पहिल्या टप्प्यात मशीनने टॅटू ड्रॉ केला जातो दुसऱ्या टप्प्यात त्यात रंग भरले जातात आणि तिसऱ्या टप्प्यात टॅटूचं फिनिशिंग केलं जातं.
हातावर, दंडावर, मानेवर, पाठीवर, छातीवर, खांद्यावर आणि शरीराच्या विविध नाजूक भागांवरदेखील टॅटू गोंदवले जातात. थोडक्यात संपूर्ण शरीरावर कुठेही टॅटू काढता येतात. काहीजण तर अगदी डोळ्याच्या बुब्बुळावरदेखील टॅटू गोंदवतात. मात्र नाजूक अवयवांवर टॅटू काढल्यामुळे कालांतरांने त्या अवयवाचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे टॅटू कुठे काढावा आणि कोणत्या डिझाईनचा तो असावा हे त्या व्यक्तीच्या आवडी-निवडीवर अवलंबून आहे. आम्ही काही ट्रेंडिग टॅटूच्या डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करत आहोत. सेलिब्रेटी टॅटू, इनिशिअल टॅटू, ट्रेडिशनल टॅटू, ट्रॅव्हल टॅटू ,थ्रीडी टॅटू, फिंगर टॅटू असे टॅटूचे विविध प्रकार सध्या लोकप्रिय आहेत. तुमच्या आवडीचं कोणतंही डिझाईन तुम्ही काढू शकता.
सेलिब्रेटींमध्येही टॅटूची क्रेझ (Bollywood Celebrity Tattoos)
प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra Tattoo)
बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने हातावर ‘डॅडीज लील (लिटील) गर्ल’ हा टॅटू काढून घेतला होता. वडिलांच्या प्रेमाचं प्रतिक म्हणून तिने हा टॅटू काढला होता.
दीपिका पदुकोन (Deepika Padukone Tattoo)
दीपिकाने मानेवर काढलेल्या टॅटूचीदेखील बरीच चर्चा झाली होती. तिने त्यावेळचा प्रियकर रणबीर कपूरचे इनिशियल गोंदवून घेतले होते. मात्र त्याच्याशी नातं तुटल्यानंतरही बराच काळ तिने हा टॅटू ठेवला होता. रणवीर सिंगशी लग्न करण्यापूर्वी तिने हा टॅटू बदलून घेतला. त्यावर सर्जरी करण्यात आली होती.
अक्षय कुमार (Akshay Kumar Tattoo)
अभिनेता अक्षयकुमारच्या पाठीवर त्याच्या मुलाचं नाव आरव तर मानेवर टीना अर्थात त्याच्या बायकोच्या नावाचा टॅटू आहे.
सैफ अली खान (Saif Ali Khan Tattoo)
अभिनेता सैफ अली खान याने करीना कपूरला प्रपोज करण्यासाठी हातावर ‘सैफीना’ हा टॅटू काढून घेतला होता. हा टॅटू बराच गाजला होता आणि यानंतरच टॅटू काढून घेण्यात जास्त वाढ झाली.
आलिया भट (Alia Bhatt Tattoo)
अभिनेत्री आलिया भटने मानेवर ‘पटाका’ असा टॅटू काढून घेतला होता.
काही मराठी सेलिब्रेटीजचे हे टॅटू (Tattoo of Some Marathi Celebrities)
बॉलीवूडप्रमाणे अनेक मराठी सेलिब्रेटींमध्येही टॅटूची प्रचंड क्रेझ आहे. काही मराठी सेलिब्रेटीजचे हे टॅटू चर्चेचा विषय ठरले होते.
श्रेया बुगडे (Shreya Bugde Tattoo)
काही महिन्यांपूर्वी चला हवा येऊ द्या फेम श्रेयाने हातावर गोंदवलेल्या एका टॅटूची फार चर्चा झाली होती. श्रेयाने इक्विलिब्रियम टॅटू हातावर गोंदवला आहे. हा टॅटू तिच्या जीवनातील उत्तम समतोल दर्शवतो तर मानेवरील दुर्गा मातेचा टॅटू तिच्यातील सळसळत्या उर्जेचं प्रतिनिधित्व करतो. शिवाय तिच्या भाच्याच्या प्रेमाखातर तिने हातावर ‘आराध्य’ असाही एक टॅटू काढला आहे.
सई ताम्हणकर (Sai Tamhankar Tattoo)
मराठीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर हिने अंगावर तीन टॅटू काढले होता. एक टॅटू तिने खांद्यावर काढला आहे जो रोमन लिपीत आहे. या टॅटूमध्ये तिने तिच्या लग्नाची आणि पती अमेय गोसावीने प्रपोज केल्याची तारीख गोंदवली होती. शिवाय हातावर एक स्टार आणि पतीचं नाव हिब्रुत गोंदवून घेतलं होतं.
अमृता खानविलकर (Amrita Khanvilkar Tattoo)
अभिनेत्री अमृता खानविलकरने ती तिची बहिण अदिती अशा दोघींच्या नावाचा टॅटू हातावर काढला आहे. यावरुन बहिणीवरील तिचं प्रेम दिसून येतं.
सखी गोखले (Sakhi Gokhale Tattoo)
अभिनेत्री सखी गोखलेने तिच्या हातावर आईचे शुंभागी असे नाव गोंदले आहे. शिवाय दंडावर फुलपाखरू, मानेवर पक्षी आणि शाळेतील दिवसांना उजाळा देणारा एक टॅटू मैत्रिणींसह काढला आहे.शिवाय तिनं “ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातील एक विराणी , गगनात विसर्जित होता डोळ्यात कशाला पाणी” या कवितांच्या ओळीही गोंदवून घेतल्या आहेत.
प्राजक्ता माळी (Prajakta Mali Tattoo)
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या हातावर ओशो नावाचा फोटो काढला आहे. ओशोच्या पुस्तकांचे वाचन केल्यानंतर प्रेरित होऊन हा टॅटू काढला आहे.
मानसी नाईक (Mansi Naik Tattoo)
अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या कंबरेवर काळ्या रंगाच्या मांजरेचा टॅटू काढला आहे.
हृता दुर्गुळे (Hruta Durgule Tattoo)
फुलपाखरू फेम ह्रताने हातावर ‘एचडीपी’ असा टॅटू काढला आहे. ती आणि तिच्या दोन मैत्रिणींनी हृताच्या वाढदिवशी त्या तिघींच्या आद्याक्षरांचा हा टॅटू गोंदवून घेतला होता.
आदिनाथ कोठारे (Adinath Kothare Tattoo)
आदिनाथने त्याच्या गळ्याजवळ ‘ओम’ नावाचा टॅटू काढला आहे.
कव्हर अप टॅटू (Cover Up Tattoo)
प्रेम व्यक्त करण्याची अनेकांची निरनिराळी स्टाईल असते. एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी बऱ्याचदा प्रेमीयुगुल एकमेंकांच्या नावाचे टॅटू काढून घेतात. लग्नसराईत तर अनेक भावी जोडपी एकच टॅटू दोघांच्याही हातावर काढून घेतात. अशा टॅटूजनां कपल्स टॅटू असं म्हणतात. पण आजकाल प्रेमासोबत ब्रेकअपदेखील तितक्याच पटकन होत असतात. प्रेमात पडल्यावर जितक्या उत्साहात हे टॅटू काढले जातात तितक्याच तीव्रतेने ब्रेकअपनंतर ते काढून टाकावे असं त्यांना वाटत असतं. शिवाय दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडल्यावर पूर्वीचा टॅटू नको असलेल्या आठवणींना उजाळा देऊ लागतो. कायमस्वरूपी टॅटू काढल्याने हे टॅटू काढून टाकणं शक्य नसतं शिवाय ते काढण्यासाठी बराच खर्चही करावा लागतो. मग यावर उपाय म्हणून ‘कव्हर अप’ टॅटूची फॅशन जन्माला आली. आजकाल कव्हर अप टॅटूची फॅशनदेखील फारच ट्रेंडमध्ये आहे.
सेलिब्रेटी टॅटू आर्टिस्ट सनी भानुशाली यांच्या मते, “ ब्रेकअपचं दुःख लपवणं हे सोपं नसतं पण ब्रेकअपनंतर काढलेल्या या हटके आणि युनिक टॅटूजमुळे अनेकांना विरहाचं दुःख विसरण्यास मदत होते. शिवाय या आणि अशा अनेक अर्थपूर्ण टॅटू डिझाईन्समुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात संपूर्ण कायापालट होऊ शकतो.
यासाठी आम्ही तुम्हाला सनीने काढलेल्या अशाच काही कव्हरअप टॅटूच्या डिझाईन देत आहोत. (Cover Up Tattoo By Sunny Bhanushali)
या टॅटूमध्ये आधी लिहीलेलं गर्लफ्रेन्डचं नाव पुसून सिम्बॉलिक डिझाईन कोरण्यात आलं आहे.
या टॅटूमध्ये आधी नाव कोरलं होतं पण ते कव्हर करुन छान गुलाबाची डिझाईन कोरण्यात आली आहे.
पुढील या सर्व डिझाईन्समध्येदेखील आधीची डिझाईन लपवून एक हटके आणि युनिक डिझाईन काढण्यात आली आहे.
FAQs
एकदा टॅटू काढल्यावर कालांतरांने तो काढून टाकण्यासाठी काही पर्याय आहे का?
टॅटू बऱ्याचदा कायमस्वरुपी काढले जातात. जर तुम्हाला टॅटू तात्पुरत्या काळासाठी हवा असेल तर तुम्ही तात्पुरता टॅटू काढू शकता. कारण कायमस्वरुपी टॅटू नष्ट करण्यासाठी फार खर्च करावा लागतो शिवाय त्यामुळे त्वचेेचे नुकसानदेखील होऊ शकते. अगदीच पर्याय नसेल तर तुम्ही कव्हरटॅटूने त्यावर पुन्हा एखादा टॅटू काढू शकता.
टॅटू काढणं सुरक्षित आहे का?
नेहमी मान्यताप्राप्त टॅटू आर्टिस्टकडून टॅटू काढावा. कारण अशा ठिकाणी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची संपूर्ण काळजी घेण्यात येते. त्यामुळे टॅटू काढणं हे नक्कीच सुरक्षित आहे. मात्र मॉल अथवा इतर ठिकाणी स्वस्तात काढले जाणारे टॅटू सुरक्षित असतीलच असे नाही.
टॅटू काढल्यावर रक्तदान करता येतं का?
टॅटू नेहमी प्रशिक्षित टॅटू आर्टिस्टकडून काढून घ्यावेत ज्यामुळे इनफेक्शन होत नाही. कारण अशा ठिकाणी वापरण्यात येणारं साहित्य हे निर्जंतूक केलेलं असतं. तसंच डॉक्टरांच्या मते टॅटू काढल्यानंतर फक्त पहिले सहा महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच तुम्ही तुम्हाला हवा तसा टॅटू काढून घ्यायचा की नाही हे ठरवा.
अधिक वाचाः
ह्या ‘5’ स्कीन केअर प्रोडक्ट्सशिवाय अपूर्ण आहे तुमचं ब्युटी रुटीन
ग्लॅमरस आणि स्टायलिश कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा ‘फॅशन फंडा’
हिवाळ्यामध्ये अशी घ्या त्वचेची काळजी
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम