मासेप्रेमींसाठी आजचा विषय फारच महत्वाचा आहे. कारण खूप जणांना मासे हे कधीही दिले तरी चालतात. पण पोटाच्या आरोग्यासाठी माशांचे सेवन कधी करायला हवे याचीही योग्य माहिती असायला हवी. उन्हाळ्याच्या या काळात वातावरण खूपच जास्त तापलेले असते. अशावेळात काही मासे न खाणे हेच चांगले. पण नेमके कोणते मासे तुम्ही उन्हाळ्यात खाऊ नये असा विचार करत असाल तर माशांची एक यादी आम्ही केली आहे. हे मासे तुम्ही न खाल्लेले बरे.
मासे आरोग्यासाठी चांगले पण…
मासे हे आरोग्यासाठी चांगले असले तरी देखील माशांमध्ये असलेले काही घटक शरीरात उष्णता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. माशांमध्ये असलेले फिश ऑईल हे त्वचा, केस यासाठी चांगले असले तरी देखील काही मासे असे असतात की, ज्यामुळे शरीरात उष्णता वाढते. मासे खाताना ती प्रमाणात खाणे गरजेेचे असते. शिवाय हल्ली माशांचे इतके वेगवेगळे प्रकार आपण करुन खातो की, ते करताना त्यामध्ये अनेक घटक समाविष्ट होत असतात. त्यामुळे बनवण्याची पद्धत ही देखील त्यामध्ये बदलासाठी कारणीभूत असते.
आता जाणून घेऊया नेमके कोणते मासे आपण टाळायला हवे ते.
खेकडा
एकदा चिंबोरी किंवा खेकडा खाल्ला की, इतर कोणताही पदार्थ त्या दिवशी खाण्याची इच्छा होणार नाही. कारण खेकड्यांची चव ही सगळ्या सी फूडमध्ये अप्रतिम असते. खेकड्याचा रस किंवा खेकड्याचे मांस हे अगदी लहान बाळापासून ते मोठ्यापर्यंत कोणालाही दिले तरी प्रोटीन मिळण्यास फायद्याचे ठरते. पण खेकडा हा उष्ण प्रवृत्तीचा आहे. त्याचे या दिवसात सेवन केले तर शरीरात हिट वाढते. त्यामुळे पोटाचे आरोग्य खराब होऊ शकते. जुलाब,पोटदुखी असा त्रास होऊ लागतो. त्यामुळे शक्य असेल तर या दिवसात खेकडा खाऊ नये. पावसाळा, हिवाळा या वातावरणासाठी खेकडा हा एकदम योग्य आहे.
कोळंबी
कोणताही काटा नसलेला असा मासा म्हणजे कोळंबी. अगदी स्टार्टसपासून ते मेनकोर्सपर्यंत सगळ्या रेसिपीमध्ये कोळंबीही उत्तम असते. पण कोळंबी ही उन्हाळ्यात जास्त न खाणेच चांगले. कोळंबी ही देखील तितकीच उष्ण असते. या दिवसात कोळंबी प्रमाणात खाल्ली नाही तर त्याचा परिणाम पोटावर होतो.अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो. कोळंबीमुळे जुलाबही होऊ शकतात. त्यामुळे कोळंबी खातान थोडा विचार करुन नीट खा. ते खाताना अगदी योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याचा त्रास होणार नाही.
सुरमई
सुरमई हा मासा देखील चवीला चांगला लागतो. त्यातल्या त्यात मोठी सुरमई मिळावी की ही सुरमई अधिक चविष्ट लागते. पण सुरमई ही देखील प्रवृत्तीने उष्ण असते. त्याचाही त्रास होऊ शकतो. सुरमई खाल्ल्यामुळे पोट बिघडू शकते. काही खाण्याची इच्छा होत नाही. बद्धकोष्ठतेचा त्रास देखील यामुळे होऊ शकतो.
आता उन्हाळ्याच्या या दिवसात अशा माशांचे सेवन करणे टाळा.