भारतीयांचे गाजर हलव्याचे प्रेम सर्वश्रुतच आहे. बहुतेक सगळ्या जुन्या हिंदी चित्रपटांतील आया त्यांच्या लाडक्या लेकराने ‘बीए’ ची परीक्षा पास केल्यानंतर त्याला त्याच्या आवडीचे ‘आलू के पराठे आणि गाजर का हलवा’ बनवून खाऊ घालत असत. सिझनल फळे व भाज्या खाण्याचे महत्व प्रत्येकच डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ वेळोवेळी सांगतात. हिवाळ्यात कोवळी, लालचुटुक गाजरे येतात. गाजर खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. गाजरातले बीटा-कॅरोटीन हे डोळ्यांसाठी खूप चांगले असते. तसेच गाजरात असणारे अँटिऑक्सिडेंट्स कॅन्सरची रिस्क कमी करतात तसेच ते आपल्या हृदयासाठी देखील खूप चांगले असतात. गाजरात असणाऱ्या पोटॅशियममुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. गाजरात असणाऱ्या फायबरमुळे अन्नपचन सुधारते तसेच तसेच वजन देखील आटोक्यात राहण्यास मदत होते. म्हणून सॅलडमध्ये, कोशिंबीर बनवून किंवा पराठे बनवून किंवा गाजर हलवा बनवून आपण गाजर आहारात घेऊ शकतो.
प्रत्येक आईची तिची एक स्वतःची गाजर हलवा बनवण्याची एक वेगळी रेसिपी असते. गाजर हलवा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती (Recipe Of Gajar Halwa In Marathi) आहेत. त्यापैकी काही निवडक गाजर हलवा रेसिपी मराठी मध्ये (Gajar Halwa Recipe In Marathi) इथे दिलेल्या आहेत. वेळ नसेल तर झटपट गाजर हलवा रेसिपी (Quick Recipe Of Gajar Ka Halwa) बघून त्याप्रमाणे पटापट गाजर हलवा बनवा. किंवा वेगळे काही ट्राय करायचे असेल तर खव्याऐवजी कंडेस्ड मिल्क (Gajar Halwa Without Khoya Recipe In Marathi) घालून गाजर हलवा बनवा.
1 Kg Gajar Halwa Recipe In Marathi | 1 किलोच्या गाजर हलव्याचे प्रमाण व कृती
साहित्य – 1 किलो गाजर, 1 लिटर दूध (फुल क्रीम मिल्क), 1 टीस्पून वेलचीचे दाणे, 3/4 कप पाणी ,3 टेबलस्पून तूप, 2 टेबलस्पून मनुका, 2 टेबलस्पून बदाम, 2 टेबलस्पून पिस्ता, 450 ग्रॅम साखर , आवडत असल्यास 100 ग्राम ताजा खवा
कृती – गाजर धुवून किसून घ्या. गाजर किसताना त्यांची साले काढून घ्या. मनुका/बेदाणे 30 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. काजू ब्लँच करा आणि उभे बारीक चिरून घ्या.गॅसवर कढईत पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात किसलेले गाजर घाला. 5-7 मिनिटे शिजवून घ्या. मग त्यात दूध घाला. म्हशीचे दूध किंवा फुल क्रीम मिल्क घातल्यास जास्त छान चव येते. अधूनमधून ढवळत १ तास मंद आचेवर शिजवा. आवडत असल्यास हलव्याच्या खवाही घालू शकता. याने गाजर हलव्याची चव आणखी रिच होईल. नंतर त्यात साखर घाला, चांगले मिसळा आणि साखर विरघळली आणि सर्व दूध शोषले जाईपर्यंत गाजर हलवा शिजवा.नंतर त्यात तूप घालून २-३ मिनिटे ढवळून घेत शिजवून घ्या. हलव्यात थोडी ठेचलेली वेलची आणि मनुका घाला व चांगले ढवळून घ्या. मिश्रण पूर्ण आटल्यावर गॅसवरून काढा आणि सर्व्हिंग डिशमध्ये काढा. हलवा सर्व्ह करताना त्यावत बदाम आणि पिस्त्याचे काप घालून सजवा. तुम्हाला जसे खायला आवडते त्याप्रमाणे गरमागरम किंवा थंड करून सर्व्ह करा.
Gajar Halwa Without Khoya Recipe In Marathi | खव्याशिवाय गाजर हलवा
कधी कधी बाजारात ताजा खवा मिळत नाही. अशा वेळी गाजर हलव्यात खव्याऐवजी काय घालता येईल ते या रेसिपीत वाचा.
साहित्य – 500 ग्राम गाजर ,1 कप दूध, ½ कप साखर, 1 टीस्पून वेलची पावडर, 1 टेस्पून तूप, 3 टीस्पून क्रीम, 1 टीस्पून कंडेन्स्ड मिल्क, 1 टीस्पून मनुका, 1 टीस्पून बदामाचे काप
कृती- गाजर स्वच्छ धुवून , सोलून व किसून घ्या.गॅसवर कढई तापत ठेवा. कढई तापली की त्यात गाजराचा कीस घाला व त्यात दूध घाला. 20 मिनिटे मंद आचेवर गाजराचा किस शिजवा. दूध पूर्ण आटले की आता त्यात साखर घालून चांगले ढवळून घ्या. आता त्यात वेलची पूड व तूप घालून मध्यम आचेवर शिजवा. मिश्रण कढईच्या तळाला लागू नये म्हणून मधून मधून ढवळत राहा. मिश्रण पूर्ण आटले की मग त्यात क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क घाला.परत मिश्रण आटवताना ढवळत राहा. हलवा तयार झाला की त्यात बेदाणे आणि बदामाचे काप घाला व गरमागरम सर्व्ह करा. ही रेसिपी थोडी वेळखाऊ आहे. पण खवा घालायचा नसल्याने त्यात रिचनेस आणण्यासाठी आपण त्यात कंडेस्ड मिल्क व क्रीम घालतोय म्हणून ते आटवण्यासाठी आपल्याला त्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. या प्रकारे बनवल्यास तुम्हाला गाजर हलवा खव्याशिवाय देखील बनवता येईल.
Gajar Halwa With Khoya Recipe In Marathi | खवा घालून केलेला गाजर हलवा
साहित्य- 1 किलो गाजर, ¾ कप तूप,¾ टीस्पून वेलची पावडर, ½ कप दूध, ¾-१ कप साखर, 2¼ कप खवा (250 ग्रॅम), 2-3 चमचे मनुका, ¼ कप सुकामेवा सजावटीसाठी (बदाम, पिस्ता व काजूचे काप)
कृती- गाजर स्वच्छ धुवून, साले काढून किसून घ्या. एका जाड बुडाच्या कढईत तूप वितळवून त्यात वेलची पूड घाला. नंतर त्यात किसलेले गाजर घाला. झाकण ठेवून 7 मिनिटे मध्यम आचेवर गाजराचा किस मऊ होईपर्यंत शिजवा. झाकण काढा व जास्तीचे पाणी आटवण्यासाठी 15 ते 20 मिनिटे शिजवा. किस कढईच्या तळाला लागून करपू नये म्हणून मधून मधून मिश्रण चांगले ढवळा. नंतर त्यात साखर आणि दूध घाला. साखर वितळेल आणि मिश्रण पुन्हा पातळ होईल. 10 मिनिटे हलवा शिजवून त्यातील सर्व पाणी आटवून घ्या. थोड्या थोड्या वेळाने मिश्रण ढवळा. नंतर त्यात घेतलाय त्यापैकी अर्धाच खवा घाला आणि 7-10 मिनिटे शिजवा. जेव्हा तव्याच्या बाजूने तूप मोठ्या प्रमाणातसुटू लागले तेव्हा त्यात् सुकामेवा आणि उरलेला खवा घाला. झाकण ठेवून हलवा मंद आचेवर 5 मिनिटे शिजवून घ्या. चविष्ट गाजर हलवा तयार आहे.
Gajar Halwa Recipe In Marathi In Cooker | कुकरमध्ये गाजर हलवा
जेव्हा घरी अचानक पाहुणे येणार असल्याचे कळते आणि इतर तयारी बरोबरच गाजर हलव्याचा बेत ठरतो अशा वेळी कुकरमध्ये गाजर हलवा बनवा म्हणजे तो पटकन होईल आणि बिघडणार देखील नाही.
साहित्य – 1 टेबलस्पून तूप ,1 चमचे काजू, 1 चमचे मनुका, 4 कप गाजर, ½ कप दूध, ½ कप खवा किंवा मिल्क पावडर, ½ कप साखर, ¼ टीस्पून हिरवी वेलची पावडर
कृती- गाजर चांगले धुवून, सोलून किसून घ्या. प्रेशर कुकरमध्ये मध्यम आचेवर तूप गरम करा. गरम झाल्यावर काजू आणि बेदाणे काजू सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. निथळून वेगळ्या भांड्यात काढून बाजूला ठेवा. उरलेल्या तुपात किसलेले गाजर घाला.दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. नंतर दूध घालून मिक्स करा. कुकरचे झाकण लावा, आणि 1 शिट्टी होईपर्यंत शिजवा. कुकर थंड झाला की झाकण उघडा आणि पुन्हा गॅस मध्यम आचेवर ठेवा. मग मिश्रणात दूध पावडर किंवा खवा घाला. चांगले ढवळून घ्या आणि एक मिनिट शिजवा.आता साखर घालून मिश्रण एकत्र करा.साखर वितळली की मिश्रणाला पाणी सुटेल. 5-6 मिनिटे किंवा मिश्रण आटेपर्यंत शिजवा. आता त्यात वेलची पूड आणि तळलेले काजू व मनुका घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा किंवा थंड करून डेझर्टचा आनंद घ्या.
Gajar Halwa Recipe With Condensed Milk | कंडेस्ड मिल्क घालून गाजर हलवा
साहित्य – 1.5 किलो गाजर, 6 टेबलस्पून तूप, 1.5 ते 2 चमचे वेलची पूड , 1 टिन गोड कंडेन्स्ड मिल्क, आवश्यकतेनुसार साखर, ⅓ कप काजू , ⅓ कप मनुका
कृती – गाजर धुवून घ्या. त्यांची साले काढून किसून घ्या. एका जाड बुडाच्या खोल तळाच्या कढईत 6 मोठे चमचे तूप गरम करा. त्यात किसलेले गाजर घाला. मंद आचेवर गाजर तुपात परतून घ्या, ते मऊ होईपर्यंत आणि शिजेपर्यंत ढवळत रहा. 15 ते 20 मिनिटांत गाजराचा किस शिजेल . नंतर त्यातकंडेस्ड मिल्क घाला व ढवळून घ्या. नंतर तुम्हाला हलवा अधिक गोड हवा असेल तर त्यात आवश्यक तेवढी (एखादा कप पुरे होईल) साखर घाला. कंडेस्ड मिल्कच्या गोडपणानुसार साखरेचे प्रमाण बॅलन्स करा. मिश्रण एकत्र कर. मग त्यात 1.5 ते 2 चमचे वेलची पावडर, ⅓ कप मनुका आणि ⅓ कप काजू घाला. चांगले मिक्स करा आणि मंद आचेवर गाजर हलवा शिजवा. मिश्रण आटेस्तोवर ढवळत राहा. कंडेस्ड मिल्क घातलेला गाजर हलवा तयार आहे.
झटपट गाजर हलवा रेसिपी । Quick Recipe Of Gajar Ka Halwa
साहित्य – अर्धा किलो गाजर, 1 कप दूध, 1/2 टीस्पून छोटी वेलची पावडर, 1 कप साखर, 2 चमचे तूप, 2 चमचे किसमिस/मनुका/ बेदाणे, 2 चमचे बदामाचे काप, 1/2 टीस्पून पिस्त्याचे काप, आवडत असल्यास काजू.
कृती – गाजर धुवून सोलून घ्या. त्यांचे मोठे तुकडे करा. कुकरमध्येच शिजवायचे असल्याने तुकडे मोठे असले तरीही चालतील. गाजराचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये घाला आणि आवश्यक तेवढे दूध किंवा पाणी घाला. प्रेशर कुकर मोठ्या आचेवर ठेवा आणि 3-4 शिट्ट्या करा. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा आणि मॅशर किंवा रवीच्या साहाय्याने गाजराचे तुकडे मॅश करून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवून कुकरमध्ये दूध, तूप, मनुका आणि वेलची पावडर घाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता. मिश्रण नीट ढवळून घ्या आणि नंतर आच वाढवा आणि सतत ढवळत असताना गाजर-दुधाचे मिश्रण शिजवा. सतत ढवळत राहा नाहीतर दूध कुकरच्या तळाशी चिकटते आणि त्यामुळे हलव्याला करपल्याचा वास येतो. 10-12 मिनिटानंतर मिश्रण आटले की मग साखर घाला आणि साखर पूर्णपणे शोषली जाईपर्यंत मिश्रण ढवळत राहा. हलवा आटल्यावर त्यात बदामाचे काप घाला व चांगले ढवळून घ्या. हलव्याच्या पिस्त्याचे काप घालून गार्निश करा.
तर अशा विविध प्रकारे तुम्ही गाजर हलवा बनवू शकता. जेवणात गाजर हलवा असेल तर गरमागरम पराठे किंवा समोसे खूप छान लागतात. सध्या पालक सुद्धा छान मिळतोय. त्यामुळे एखादी चविष्ट पालकाची भाजी ,पराठे, पुलाव किंवा बिर्याणी व गोड म्हणून गाजर हलवा असा मस्त बेत काही खास प्रसंगी किंवा सुटीच्या दिवशी करा आणि कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवा.
गाजर हलव्यासंबंधित नेहेमी पडणारे काही प्रश्न- FAQ’s
- गाजर हलवा काळा का पडतो? तो काळा पडू नये यासाठी काय करावे?
गाजराचा किस आपण जेव्हा डायरेक्ट गरम तुपात मोठ्या आचेवर परततो तेव्हा किसाचा रंग पालटून काळा होऊ शकतो. त्यामुळे हलव्याचा देखील रंग काळा होऊ शकतो. म्हणूनच कधीही केवळ गाजराचा किस गरम तुपात परतू नये. पॅनमध्ये नेहमी गाजर आणि दूध एकत्र घाला आणि दूध आटेस्तोवर गाजराचा किस शिजवून घ्या. कधी कधी आपण अल्युमिनियम किंवा लोखंडाच्या कढईत अन्न शिजवतो त्यामुळेही हलव्याचा रंग काळा होऊ शकतो. म्हणूनच शक्यतोवर नॉन स्टिक कढईत किंवा स्टीलच्या कढईत गाजर हलवा शिजवला तर रंग पालटणार नाही.
2. गाजराचा हलवा गरम की थंड सर्व्ह केला जातो?
गाजराच्या हलव्याचा आस्वाद आपण गरमागरम असताना आणि थंड करून अशा दोन्ही प्रकारे घेऊ शकतो. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. त्यामुळे ज्याला गरम हलवा आवडतो त्याने तो गरम करून खावा. खाण्या आधी त्यावर थोडीशी वेलचीपूड घालावी आणि मस्त गरमागरम हलव्याचा आनंद घ्यावा. ज्याला थंडगार हलवा आवडतो त्याने तो थंड खावा. ज्याला एखादा प्रयोग करण्याची आवड असेल त्याने व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर गाजर हलव्याची एक फ्युजन डेझर्ट म्हणून मजा घ्यावी.
3. गाजर हलवा फ्रिजशिवाय किती दिवस टिकतो?
एखाद्या बंद डब्यात ठेवल्यास गाजर हलवा फ्रिजमध्ये दहा दिवस टिकतो. पण जर तुम्ही तो फ्रिजमध्ये ठेवणार नसाल तर तो हिवाळ्याच्या दिवसांत जास्तीतजास्त दोन दिवस चांगला राहील. नंतर तो खराब होऊ लागेल. उन्हाळ्यात तर गाजर हलवा फ्रिजमध्येच ठेवावा.
अधिक वाचा – संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा असा चटपटीत मेन्यू