ADVERTISEMENT
home / Recipes
Palak Recipes in Marathi

Palak Recipes In Marathi | पौष्टीक आणि चविष्ट पालक भाजी रेसिपीज

पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे सगळेच डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ वारंवार सांगत असतात. पालकात भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे अन्नपचन तर चांगले होतेच शिवाय पालकातून शरीराला अत्यंत आवश्यक असलेली पोषणमूल्ये देखील मिळतात. पण बरीच माणसे पालेभाजी, त्यातल्या त्यात पालकाची भाजी म्हटली की नाक मुरडतात. बरीच लहान मुले जेवणात भाज्या खायचाच कंटाळा करतात. अश्या वेळी आपल्या घरातील लहान मुलांच्या तसेच मोठ्यांच्याही पोटात पालक जावा यासाठी गृहिणी अनेक क्लृप्त्या लढवतात. पण प्रत्येक वेळेला काय नवीन आयडिया करणार म्हणून घराघरांतील अन्नपूर्णांना आता यावेळी पालकाची भाजी कशी बनवायची (How To Make Palak Bhaji) असा प्रश्न पडतो.

पालकाच्या भाजीचे पारंपारिक प्रकार तर बहुतांश मराठी अन्नपूर्णेला ठाऊक असतात. पण हल्लीची पिढी कॉन्टिनेन्टल आणि फ्युजन फूडची शौकीन असल्याने स्वयंपाक करताना घरातल्या स्त्रियांना स्वतःमधील क्रिएटिव्ह मास्टरशेफ जागवावी लागते. मग फोनवर आपण ‘पालक भाजी रेसिपी मराठी’ (Recipe Of Palak In Marathi) असे टाईप करून काही वेगळ्या चवीची पालक भाजी कशी बनवतात हे शोधू लागतो.  आज आम्ही तुमच्यासाठी पौष्टीक व चविष्ट पालक रेसिपीज घेऊन आलो आहोत. हे पदार्थ केले तर घरातील सगळेच लोक अगदी आवडीने पालक खाऊ लागतील. 

Breakfast Palak Recipe In Marathi | नाश्त्यासाठीचे पालकाचे पदार्थ

पालकापासून आपण केवळ भाजीच नव्हे तर अनेक चविष्ट पण पौष्टिक पदार्थ करू शकतो (Recipe of  Palak in Marathi) सकाळच्या नाष्ट्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत असे अनेक पदार्थ आहेत ज्यात आपण पालक घालून त्यातील पोषणमूल्ये वाढवू शकतो. चला तर बघूया आपण सकाळच्या न्याहारीसाठी पालकापासून कुठले प्रकार अगदी झटपट बनवू शकतो.  

पालकाचे घावन / धिरडे

साहित्य – 3-4 कप बारीक चिरलेला पालक, ⅔ कप चणा डाळीचे पीठ/ बेसन, ½  कप तांदळाचे पीठ, 1 टीस्पून जिरे, ½ टीस्पून ओवा, ½ टीस्पून लाल तिखट, ½ टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1-2 टीस्पून साखर, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 1 टीस्पून आमचूर पावडर, ¼ टीस्पून काळी मिरी पावडर, आवडीनुसार किसलेलं आलं , चवीनुसार हिरव्या मिरच्या बारीक चिरून, आवश्यकतेनुसार पाणी 

ADVERTISEMENT

कृती- एका भांड्यात बेसन, तांदूळ पीठ घेऊन ते एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ, हळद, तिखट, आमचूर पावडर, ओवा. जिरं, काळीमिरी पूड व हिरवी मिरची बारीक चिरून किंवा ठेचून घाला. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मिश्रण एकत्र करून घ्या. पालकाची पाने धुवून बारीक चिरून घ्या. किंवा अगदी थोड्या पाण्यात पालकाच्या पानांची पेस्ट करून घ्या. आता हे मिश्रण बेसनाच्या मिश्रणात घाला आणि ढवळून घ्या. ह्यात किसलेलं आलं घाला. मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर त्यात आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी घाला व चांगले ढवळून घ्या. आपल्या नेहमीच्या घावनाच्या किंवा डोश्याच्या मिश्रणाप्रमाणे हे मिश्रण असायला हवे. हे मिश्रण 10 –15 मिनिटे झाकून ठेवा. गॅसवर तवा तापत ठेवा आणि तवा चांगला गरम झाला की त्यावर थोडेसे तेल पसरून त्यावर हे मिश्रण घाला व घावनाप्रमाणे पसरवून घ्या. बाजूने थोडे तेल सोडा व तव्यावर झाकण ठेवा. गॅसची आच मध्यम ठेवा. घावन एका बाजूने शिजले की ते उलटवून घ्या व दुसऱ्या बाजूने चांगले खरपूस भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी घावन खरपूस भाजले की त्याचा गरमागरम असतानाच चटणीबरोबर आस्वाद घ्या.  

पालक पराठे

Palak Paratha Recipe In Marathi
Palak Paratha Recipe In Marathi

साहित्य – 1 ½  कप बारीक चिरून घेतलेला पालक, 1 कप कणिक /गव्हाचे पीठ, ½  कप मैदा, ½ टीस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून हिरव्या मिरचीचा ठेचा, आवश्यकतेनुसार तूप, चवीनुसार मीठ

कृती-  पालकाचे पराठे बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेली व बारीक चिरून घेतलेली पालकाची पाने, लिंबाचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये प्युरे करून घ्या. परातीत किंवा भांड्यात सगळी पीठे व इतर सगळे साहित्य घेऊन ते एकत्र करा व त्यात पालकाची प्युरे घालून आवश्यकतेनुसार कणिक मळून घ्या. कणकीचे मध्यम आकाराचे उंडे करून घ्या व पोळपाटावर घेऊन लाटून घ्या. गरम तव्यावर तूप घालून पराठा दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस भाजून घ्या. दही किंवा चटणीबरोबर गरमागरम पराठ्यांचा आस्वाद घ्या. 

पालक पुरी

Palak Puri Recipe In Marathi
Palak Puri Recipe In Marathi

साहित्य – 2.5-3 कप बारीक चिरलेला पालक, 3 कप गरम पाणी, 2 कप थंड पाणी, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची, 2 कप कणिक/ गव्हाचे पीठ, ½ टीस्पून ओवा, 1 चिमूट हिंग, आवश्यकतेनुसार पाणी, आवश्यकतेनुसार तेल

ADVERTISEMENT

कृती – पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा. पाणी उकळले की गॅस बंद करा आणि त्यात पालकाची पाने घाला. 1 मिनिटे पालक त्यात ब्लांच करून घ्या. नंतर पालकाची पाने थंड पाण्यात घाला.नंतर मिक्सरमध्ये पालकाची पाने, आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची घालून पाणी न घालता प्युरे करून घ्या. परातीत किंवा भांड्यात कणिक , ओवा, हिंग व चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्या. यात पालकाची प्युरे घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्या. कणिकेचे लहान आकाराचे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या. कढईत तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात पुऱ्या तळून घ्या. बटाट्याची भाजी किंवा व्हेज कोरमा किंवा छोले याबरोबर पालक पुऱ्यांचा बेत करा.

पालक डोसा

साहित्य –  4 कप डोसा बॅटर, 2 कप पालक , 2 इंच आल्याचा तुकडा, ¼ टीस्पून हळद, 4 टेबलस्पून तूप, आवश्यकतेनुसार तेल, चवीनुसार मीठ  

कृती- नेहमीच्या पद्धतीने उडदाची डाळ व तांदूळ भिजत घालून ते वाटून घेऊन ,आंबवून घेऊन डोश्याचे पीठ तयार करून घ्या. पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हळद घालून पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळले की त्यात पालकाची पाने, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा घाला व तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या. पालक शिजला की पाणी काढून टाका आणि पालक गार होऊ द्या. पालक, मिरची व आले यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. हे मिश्रण डोश्याच्या बॅटर मध्ये घाला व नीट एकत्र करून घ्या. यात चवीनुसार मीठ घाला व ढवळून घ्या. तवा गरम करा व त्यावर पाणी शिंपडून त्यावर हे मिश्रण घालून चांगले पसरवून घ्या. आवडीनुसार जाड किंवा पातळ डोसा करून घ्या. त्यावर बाजूने तूप सोडा व डोसा खरपूस भाजून घ्या. तुमचा पालक डोसा खाण्यासाठी तयार आहे. हा डोसा ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर छान लागतो.  

Lunch Palak Recipes In Marathi | दुपारच्या जेवणासाठी पालकाचे पदार्थ

जेवताना पालकाची भाजी करायची असेल तर ती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते. पालक पनीर, पालकाची आमटी, मटार पालक भाजी असे पदार्थ खूप चविष्ट लागतात. चला तर बघूया दुपारच्या जेवणात कुठले पालकाचे पदार्थ करता येतील. जेवणात टेस्टी पालक भाजी असली की मग आमटीचे वेगवेगळे प्रकार करता येतात. जेवायला असा बेत असला की मग घरचे सगळे खुश!

ADVERTISEMENT

पालक पनीर

साहित्य-  50 ग्रॅम पालक किंवा 5 ते 6 कप अंदाजे चिरलेला पालक, 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून  1  ते 2 लहान ते मध्यम लसूण पाकळ्या, 1 इंच आले , पालक ब्लँच करण्यासाठी 3 कप पाणी, 2 टेबलस्पून तेल किंवा तूप किंवा लोणी, ½ टीस्पून जिरे, 1 तमालपत्र, ⅓ कप बारीक चिरलेला कांदा, 1 चमचे बारीक चिरलेला लसूण, ⅓ कप बारीक चिरलेला टोमॅटो ,¼ टीस्पून हळद पावडर ,½ चमचे लाल मिरची पावडर, 1 चिमूट हिंग ,½ आवश्यकतेनुसार पाणी, ¼ किंवा ½ टीस्पून गरम मसाला पावडर , 200 ते 250 ग्रॅम पनीर किंवा टोफू, 2 टेबलस्पून लो फॅट क्रीम, 1 चमचे कसुरी मेथी,आवश्यकतेनुसार मीठ.

कृती- पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात पाव चमचा मीठ घाला. पाणी उकळले की गॅस बंद करा आणि त्यात पालकाची पाने घालून पालक एक मिनिट ब्लांच करून घ्या. पालकाची पाने काढून घेऊन ती थंड पाण्यात घाला. एका मिनिटाने पालक काढून घ्या. हिरवी मिरची, आल्याचा तुकडा व लसूण घालून पालकाची प्युरे करून घ्या. जेवणात लसूण खाल्ल्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. कढईत तेल किंवा तूप किंवा बटर घ्या आणि ते गरम झाले की त्यात जिरं घाला. नंतर त्यात तमालपत्र घालून परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. नंतर यात बारीक चिरलेला लसूण घालून परतून घ्या. यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला व टोमॅटो चांगला  शिजवून घ्या.

टोमॅटो शिजला की त्यात हळद, तिखट आणि हिंग घाला व मिश्रण चांगले परतून घ्या. नंतर त्यात पालकाची प्युरे घाला व आवश्यकतेनुसार पाणी घाला. सहा ते सात मिनिटे मिश्रण शिजवून घ्या आणि मग त्यात चवीनुसार मीठ घाला. पालकाचे मिश्रण घट्ट झाले की त्यात गरम मसाला पावडर घाला व ढवळून घ्या. मग त्यात पनीरचे किंवा टोफूचे तुकडे घाला. मिश्रण ढवळून गॅस बंद करा. गॅस बंद केला की त्यावर लो फॅट क्रीम किंवा घरची घट्ट साय चांगली फेटून घालून गार्निश करा. जिरा राईस किंवा गरमागरम पराठ्यांबरोबर पालक पनीर एन्जॉय करा. तश्या तर पनीरच्या विविध रिसीपीज करता येतात, पण पालक पनीर हे हेल्दी आणि टेस्टी असे कॉम्बिनेशन आहे.

आलू पालक भाजी

साहित्य – 200 ग्रॅम पालक/ 1 जुडी, 3 मध्यम आकाराचे बटाटे , ½ कप बारीक चिरलेला कांदा ,½ कप चिरलेला टोमॅटो , 1 चमचे आले-लसूण पेस्ट , 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या,3 लवंगा, 1 इंच दालचिनी,1 तमालपत्र ,¼ टीस्पून हळद, 1 चिमूट हिंग ,¼  टीस्पून गरम मसाला पावडर,  1.5 चमचे बेसन,आवश्यकतेनुसार पाणी, 2 चमचे तूप किंवा तेल , ½ टीस्पून कसुरी मेथी,आवश्यकतेनुसार मीठ

ADVERTISEMENT

कृती- कुकरमध्ये बटाटे शिजवून घ्या व साले काढून त्याचे तुकडे करून घ्या व झाकून ठेवा. वर सांगितल्याप्रमाणेच पालक स्वच्छ धुवून ब्लांच करून त्याची प्युरे करून घ्या. कढईत तेल / तूप घ्या. ते गरम झाले की मध्यम आचेवर तमालपत्र, लवंग आणि दालचिनी परतून घ्या.  त्यात कांदा घालून हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घाला आणि काही सेकंद परतून घ्या. मग त्यात टोमॅटो घाला व शिजवून घ्या. मिश्रणाला तेल सुटू लागले की त्यात हळद व हिंग घाला आणि पाच ते दहा सेकंद परता.नंतर त्यात पालकाची प्युरे घाला व नंतर बेसन घालून मिश्रण चांगले ढवळा. आवश्यक असेल तर मिश्रणात पाणी घाला व चवीनुसार मीठ घाला.

पालक शिजेपर्यंत मिश्रण उकळा. तुम्हाला आवडत असेल तर त्यात थोडेसे क्रीम किंवा साय फेटून घाला. नंतर त्यात बटाट्याचे तुकडे घालून दोन ते तीन मिनिटे भाजीला उकळी काढा. शेवटी त्यात गरम मसाला पावडर व कसुरी मेथी घाला व फुलक्यांबरोबर किंवा मऊसूत पोळीबरोबर आलू पालकाची मजा चाखा. बटाटा ही लहान मुलांची अत्यंत आवडीची भाजी आहे. त्यामुळे यात बटाटा घातला की मुले बटाट्याचे इतर पदार्थ जसे आवडीने खातात तशीच आलू पालक भाजी देखील आवडीने खातील.

पालक सूप

Palak Soup Recipe In Marathi
Palak Soup Recipe In Marathi

साहित्य- 2 कप चिरलेला पालक , ¼ कप चिरलेला कांदा, ¼ चमचे चिरलेला लसूण, 1 चमचे कॉर्नमील ,¼ टीस्पून जिरेपूड,1 तमालपत्र ,2 कप पाणी ,1 किंवा 1.5 चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा बटर ,¼ टीस्पून काळीमिरी पावडर  ,आवश्यकतेनुसार मीठ

कृती – पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्या व कोरडी करून बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करा आणि त्यात तमालपत्र घालून दोन ते तीन सेकंद परतून घ्या. त्यात बारीक चिरलेला लसूण घालून परता. नंतर  त्यात बारीक चिरलेला कांदा घाला व गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर यात चिरलेला पालक घाला आणि त्यात काळीमिरी पूड व मीठ घालून परतून घ्या. मग त्यात कॉर्नमील घालून ढवळून घ्या. मिश्रणात दोन कप पाणी घालून उकळी काढा व ५ मिनिटे शिजवून घ्या. नंतर त्यात जिरेपूड घाला व गॅस बंद करा. हे मिश्रण थंड झाले की त्यातून तमालपत्र काढून घ्या व मिश्रण मिक्सरमधून काढून त्याची प्युरे करून घ्या. जर मिश्रण फार घट्ट झाले असेल तर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला व परत दोन ते तीन मिनिटे उकळून घ्या. गरमागरम पौष्टिक चविष्ट पालक सूप पिताना त्यावर काळीमिरीपूड घालून प्या. 

ADVERTISEMENT

गरमागरम कढी रेसिपीज

Dinner Palak Recipe In Marathi | रात्रीच्या जेवणासाठी पालकाचे पदार्थ

रात्रीचे जेवण कायम हलकेच असावे असे आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पुढील पालक रेसिपी तर रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट आहेत. हे पदार्थ पचायला हलके तर आहेतच शिवाय पौष्टीक व चविष्ट देखील आहेत. 

दाल पालक

साहित्य-  2 टेबलस्पून तेल किंवा तूप किंवा बटर ,½ टीस्पून जिरे, ⅓ कप चिरलेला कांदा , 1 इंच आले, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या , 1 ते 2 हिरव्या मिरच्या ,¼ टीस्पून हळद पावडर, ¼ चमचे लाल तिखट ,1 चिमूट हिंग ,⅓ कप चिरलेला टोमॅटो, ½ कप तूरडाळ, 1.5 कप पाणी, 1.5 कप बारीक चिरलेला पालक, ½ टीस्पून कसुरी मेथी , ¼ चमचे गरम मसाला ,आवश्यकतेनुसार मीठ

कृती –  तूरडाळ चांगली धुवून घ्या. छोट्या कुकरमध्ये तेल किंवा तूप घाला आणि ते गरम झाल्यावर त्यात जिरे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला कांदा परतून घ्या. मग त्यात आले लसूणाची पेस्ट व हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा ठेचा घालून चांगले  परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घाला व शिजवून घ्या. मग त्यात हिंग, हळद, तिखट व धणेपूड घाला व मिश्रण परतून घ्या. मग यात धुवून घेतलेली तूरडाळ घाला आणि दीड कप पाणी घाला. कुकरचे झाकण लावून डाळ चांगली शिजवून घ्या. डाळ शिजत असतानाच पालकाची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून मग चिरून घ्या. डाळ शिजली की ती रवीने घुसळून घ्या. त्यात चिरलेला पालक, गरम मसाला व कसुरी मेथी घाला. नंतर त्यात चवीनुसार मीठ घाला व ढवळून घ्या. कुकर परत गॅसवर ठेवून डाळ पालक शिजेपर्यंत शिजवून घ्या. डाळ घट्ट झाली असल्यास त्यात पाणी घाला व उकळी काढा. चविष्ट दाल पालक तयार आहे.  

ADVERTISEMENT

पालक खिचडी  

Palak Khichdi Recipe in Marathi
Palak Khichdi Recipe in Marathi

साहित्य – 2  कप चिरलेला पालक ,½ कप मूग डाळ ,½ कप  बासमती तांदूळ, 1 बारीक चिरलेला कांदा,1 चिरलेला टोमॅटो, 1 इंच दालचिनी, 1 तमालपत्र, 2 लवंगा, 2  वेलची, ½ चमेचा जिरे, 1  चमचे आले लसूण पेस्ट,1 हिरवी मिरची, ¼ टीस्पून हळद ,1 चिमूटभर हिंग, आवश्यकतेनुसार मीठ,2 टेबलस्पून तूप किंवा तेल, 3.5 ते 4 कप पाणी 

कृती –  तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून घ्या व तीस मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. पालक स्वच्छ धुवून त्याची प्युरे करून घ्या. छोट्या कुकरमध्ये तेल किंवा तूप घाला आणि त्यात जिरे, तमालपत्र, लवंग,दालचिनी व वेलची घालून परतून घ्या. नंतर त्यात क्रमशः कांदा, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा ठेचा व टोमॅटो घालून चांगले परतून घ्या. मग त्यात हिंग, हळद घाला व पालक प्युरे घालून मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या.  डाळ व तांदुळातले पाणी काढून घ्या व ते कुकरमध्ये घाला. त्यात आवश्यक तेवढे पाणी व मीठ घालून ढवळून घ्या. कुकरचे झाकण लावून चार शिट्ट्या करा. खिचडी शिजल्यावर ती खूप घट्ट झाली असेल तर त्यात थोडे पाणी घालून ती ढवळून थोड्यावेळ उकळून घ्या. पौष्टिक पालक खिचडी खाताना त्यावर तुपाची धार घाला व कोशिंबीर किंवा रायत्याबरोबर पालक खिचडीचा आनंद घ्या. 

मग आता वरील पालक रेसिपीज वापरून तुम्ही छान आणि पौष्टिक असा स्वयंपाक करू शकता.

09 Feb 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT