महाराष्ट्रामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जी अप्रतिम आहेत. विशेषतः ट्रेकिंग आणि हायकिंग (Hiking) साठी. पण बरेचदा या ठिकाणांची माहिती व्यवस्थित मिळत नसते. म्हणजे या ठिकाणी कसं जायचं अथवा या ठिकाणची वैशिष्ट्य काय आहेत हे सर्व माहीत करून देण्यासाठी आम्ही हा लेख तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. तुम्हालाही महाराष्ट्रामध्ये हायकिंग करायेच असेल तर तुम्ही या ठिकाणांना भेट द्यायलाच हवी. अशा अनेक ऐतिहासिक आणि अप्रतिम जागा आहेत जिथे जाऊन तुमचं मन प्रसन्न होतं आणि तुम्हाला जर साहसाची आवड असेल तर तुमच्यासाठी हायकिंग हा उत्तम पर्याय आहे. मात्र हायकिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणंही गरजेचं आहे. तुम्ही नेहमी ग्रुपमध्येच राहावं. व्यवस्थित सूचना पाळत हायकिंग करावं. पहिल्यांदाच हायकिंग करणार असाल तर काळजीपूर्वक सूचना पाळाव्यात. हे सर्व केल्यास, तुम्हाला खूपच मजा येईल. जाणून घेऊया महाराष्ट्रातील उत्तम हायकिंगची ठिकाणं.
लोहगड किल्ला (Lohagad Fort)
लोहगड किल्ला हा पुण्याजवळी सर्वात जास्त प्रसिद्ध असणारा आणि सर्वात जास्त भेट दिला जाणारा किल्ला आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. लोणावळ्यापासून साधारण 11 किमी असणारा हा किल्ला सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसला आहे. ट्रेकिंग आणि हायकिंग करण्यासाठी हा महाराष्ट्रातील किल्ला प्रसिद्ध आहे. सन 1564 मध्ये गुरू गोविंद सिंह यांनी बांधलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये काबीज केला होता. तर नंतर नाना फडणवीस यांनी या किल्ल्याचा वापर राहण्यासाठी केला आणि त्यामध्ये बदल केले. आता हा किल्ली शासनाची संपत्ती आहे. मात्र तुम्ही या किल्ल्यावर फिरायला बिनधास्त जाऊ शकता. विंचूच्या आकाराचा हा किल्ला बांधण्यात आला असून याचे चार प्रवेशद्वार आहेत, ज्यांची नाव आहेत, महादरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि नारायण दरवाजा. हे चारही द्वार अजूनही तसेच असून तुम्ही कोणत्याही दरवाजाने आत जाऊ शकता.
इथे पोहचणं सोपं असून हायकिंगसाठी हा पहिली पसंती आहे. तसंच इथे हिरवळही असल्याने प्रसन्न वातावरण असतं. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात इथे जास्त प्रमाणात वर्दळ दिसून येते. लोहगड दोन तासात चढून पार करता येतो.
हायकिंगची वेळ – सकाळी 9 ते संध्याकाळी 6
महिना – कोणत्याही महिन्यात जाऊ शकता
कळसूबाई (Kalsubai)
भंडारदऱ्यापासून 12 किमी दूर असणारे कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातील डोंगर आहे. 5400 फूट उंची असणारे कळसूबाई शिखर सर करणे हे सर्वांचे स्वप्न असते. महाराष्ट्रातील हे सर्वात उंच शिखर आहे. हायकिंगसाठी खूप लोक इथे जातात. कळसूबाईच्या डोंगरावर असलेल्या मंदिराला हायकिंग करून भेट देणं हे बऱ्याच हायकर्सकडून केले जाते. इथे अशी विहीर आहे ज्याचे पाणी 3 फूटाखाली कधीही कमी होत नाही. इथे नवरात्रीला खूप कार्यक्रम केले जातात. ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी अनेक मार्गानी तुम्ही जाऊ शकता. बारी गावातून जाणे अनेक जण पसंत करतात. हनुमान मंंदिरामध्ये अनेक हायकर्स राहतात. हा डोंगर चढणं मध्यम स्वरूपाचे आहे. कारण यावर अनेक घसरती ठिकाणं आहेत. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक हायकिंग करावे लागते. बारी गावातून हा शिखर सर करण्यासाठी साधारण 3 तास लागतात. कळसूबाईवरून सूर्योदय पाहण्यासाठी अनेक जण नाईट ट्रेकही करतात.
हायकिंगची वेळ – कधीही (पण सकाळी लवकर आणि रात्रीही करू शकता)
महिना – सप्टेंबर ते फेब्रुवारी महिना
वाचा – महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे
सिंहगड (Sinhgad)
सिंहगड अर्थात लायन फोर्ट. पुण्यातील सर्वात प्रसिद्ध किल्ला. सर्वात जास्त फिरण्याचे ठिकाण म्हणून सिंहगड ओळखण्यात येतो. सिंहगडावर हायकिंग करण्यासाठी अनेक जण जातात. पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी हा एक किल्ला आहे. कोंढाणा म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला तान्हाजी मालुसरेमुळे सिंहगड म्हणून प्रसिद्ध झाला. इथली लढाई आणि तान्हाजीचा इतिहास हा अंगावर काटा आणणारा आहे. हा किल्लादेखील सह्याद्रीच्या कुशीत आहे. हा किल्ला नैसर्गिकरित्या खूपच सुरक्षित असून यावर हायकिंग करणे इतर किल्ल्यांच्या तुलनेत सोपे आहे. कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाजा असे दोन दरवाजे असून दोन्ही सुरक्षित आहेत. येथे कौंडिण्येश्वर मदिर असून अनेक पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. सिंहगडावर तुम्ही ट्रेकिंग हायकिंग करू शकता. नाहीतर तुम्ही तुमची गाडी घेऊनही अगदी वरपर्यंत जाऊ शकता. साधारण 1 तास हा गड सर करण्यासाठी लागतात. कोकणात प्रसिद्ध असलेल्या स्थळांविषयी जाणून घ्या
हायकिंगची वेळ – सकाळी 9 ते संध्याकाळी 6
महिना – जून ते सप्टेंबर (पावसाळा)
रत्नागड (Ratangad)
भंडारदऱ्यातील रत्नावाडीपासून 6 किमी अंतरावर असणारा रत्नागड हा अतिशय जुना गड आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रत्नावाडी गावात हा गड स्थित आहे. मुंबई आणि पुणेकरांसाठी हे उत्कृष्ट हायकिंग ठिकाण आहे. भंडारदऱ्यातील फिरण्यासाठी हे प्रसिद्ध ठिकाण असून हा ऐतिहासिक गड पाहण्यासाठी अनेक जण भेट देतात. 4250 फूट वर असणारा गड हा 400 वर्ष जुना आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता. या गडाला चार प्रवेशद्वार असून गणेश, हनुमान, कोकण आणि त्रिंबक अशी त्याची नावे आहेत. रत्नगडावर दोन लेण्या असून इथे अनेक जण त्याचा अभ्यास करण्यासाठीही येतात. तर प्रवरा नदीचे मूळ रत्नगड किल्ला आहे. त्यामुळे हा किल्ला अत्यंत सुंदर असून इथे अनेक जण हायकिंग करण्यास उत्सुक असतात. या गडावरून सह्याद्रीच्या रांगा खूपच सुंदर दिसतात. मात्र हा गड चढण्यासाठी 3-4 तास लागतात. त्यामुळे हा गड सर करताना मजा येते.
हायकिंगची वेळ – सकाळी 9 ते संध्याकाळी 6
महिना – ऑक्टोबर ते डिसेंबर
प्रतापगड (Pratapgad)
अतिशय मोठा आणि प्रसिद्ध असा हा प्रतापगड इतिहासामध्ये नावाजलेला गड आहे. सातारा जिल्ह्यातील हा गड सर्वात मोठा गड समजण्यात येतो. महाबळेश्वरमधील सर्वात सुंदर ठिकाण असे प्रतापगडला म्हटले जाते. महाबळेश्वरला गेल्यानंतर प्रतापगडला न जाणं नक्कीच तुम्ही टाळू शकत नाही. 1656 मध्ये हा गड बांधण्यात आला. शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील प्रसिद्ध लढाई तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे या गडाला वेगळे महत्त्व आहे. हा गड दोन भागांमध्ये विभागला गेला असून वरची बाजू ही डोंगराचा भाग आहे. इथे आई भवानीचे देऊळ आहे. इथेच महाराजांना त्यांची तलवार भेट मिळाली होती अशी कथा आहे. अजूनही चांगल्या परिस्थितीत असणारा हा गड चढणं तसं बऱ्यापैकी सोपं आहे. तसंच इथे अनेक जण फिरायला येतात.
हायकिंगची वेळ – सकाळी 10 ते संध्याकाळी 6
महिना – जून ते ऑक्टोबर (पावसाळ्यात कधीही)
हरिश्चंद्रगड (Harishchandragad)
भंडारदऱ्यातील खिरेश्वरपासून 8 किमीवर असणारा हरिश्चंद्रगडदेखील हायकिंगसाठी उत्तम आहे. आजूबाजूच्या वस्तीने हा उत्तम राखला आहे. महाराष्ट्रातील ट्रेकिंग ठिकाणांपैकी एक प्रसिद्ध ठिकाण मानले जाते. रोहिदास, तारामती आणि हरिश्चंद्र अशी तीन ठिकाणं आहेत. जंगलाने वेढलेल्या या गडाचे सौंदर्य खूपच सुंदर आहे. तसंच आजूबाजूला असणारा माळशेज घाट, जिवधान, नाणेघाट, रत्नागड आणि कळसूबाई हे सगळं या गडाला अधिक सुंदर बनवते. इथे हायकिंग करून मनाचे समाधान मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात रमायला लावते. इथे असणाऱ्या लेण्याही खूपच सुंदर असून पाच फूट उंच शिवलिंगदेखील इथे खूपच सुंदर आहे. हा गड चढायला साधारण 2 ते 2.5 तास लागतात. गढ चढायला सोपा आहे, मात्र हा गड पार करताना सुरक्षा घेणंही तितकंच गरजेचे आहे. हायकर्ससाठी तिसरा रस्ता आहे जो बेलपाडा गावातून साधलेघाटातून जातो. या रस्त्यावरूनही तुम्ही हायकिंगसाठी जाऊ शकता. पण हा रस्ता तुम्हाला पोचायला साधारण 9 तास लावतो.
हायकिंगची वेळ – सकाळी 10 ते संध्याकाळी 6
महिना – जून ते ऑक्टोबर (पावसाळ्यात कधीही)
गार्बेट पॉईंट (Garbett Point)
माथेरानपासून जवळ असणारे गार्बेट पॉईंट हे हायकिंगसाठी चांगले ठिकाण आहे. वेगवेगळ्या डोंगरातून येणारे धबधबे आणि याचे मनोहारी दृष्यं इथे पाहायला मिळतं. आजूबाजूला घनदाट जंगल असून इथून दिसणारा सूर्याेदय आणि सूर्यास्त अप्रतिम असतो. साहसी व्यक्तींना इथे हायकिंग करण्यासाठी नक्कीच मजा येते. मात्र हे हायकिंग पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे बरीच सहनशक्ती असणं गरजेचं आहे. कारणा गार्बेट पॉईंट चढायला वेळ लागतो. तसंच पावसाळ्यात हा ट्रेक करायचा असेल तर तुम्हाला रोपक्रॉसिंग करून जावं लागतं. कारण इथे अनेक पाण्याचे धबधबे दिसून येतात आणि ते पार करावे लागतात. मात्र इतकं सगळं केल्यानंतर गार्बेट पॉईंटवर पोचल्यावर दिसणारा व्ह्यू हा अप्रतिम आहे. रस्ता चिंचोळा असला तरीही इथे गेल्यावर मात्र मजा येते. हायकिंगसाठी साधारण 6 – 8 तास लागतात हेदेखील लक्षात घ्या.
हायकिंगची वेळ – सकाळी 10 ते संध्याकाळी 6
महिना – जून ते ऑक्टोबर (पावसाळ्यात कधीही)
राजमाची (Rachmachi)
राजमाचीबद्दल आपण सर्वांनीच कधी ना कधी ऐकलेले आहे. लोणावळ्यापासून 15 किमी अंतरावर असणारा राजमाची गड हा महाराष्ट्राची शान आहे. ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी हमखास जाण्याचे ठिकाण आहे. विशेषतः पावसाळ्यात यावर चढून जाण्याची मजाच काही और आहे. 2710 फूट उंचीचा हा गड अप्रतिम असून आजूबाजूने डोंगराने वेढलेला आहे. बोर घाट (खोपोली आणि खंडाळ्याच्या मधील रस्ता) ने वेढलेला हा राजमाची गड एकदा तरी हायकिंगसाठी सर करावा असे हायकर्सना नक्कीच वाटते. हा अतिशय प्रसिद्ध गड असून आजूबाजूला अनेक धबधबे आणि सौंदर्याने नटलेला आहे. शिवाय पुरातन काळातील लेण्याही इथे आहेत. इथे हायकिंगसाठी दोन रस्ते आहेत. एक लोणावळ्याच्या बाजूने तर एक कर्जतच्या बाजूने. पहिल्यांदाच हाईक करणार असाल तर लोण्यावळ्याच्या बाजूने करावे. ते जास्त सुरक्षित आहे. 5 तास हायकिंगसाठी लागतात. कर्जतकडून जाणारा रस्ता हा बऱ्यापैकी कठीण असून साधारण 2000 फूट चढावे लागते. राजमाचीवर कँपिंगही करता येते.
हायकिंगची वेळ – सकाळी 10 ते संध्याकाळी 6
महिना – जून ते ऑक्टोबर (पावसाळ्यात कधीही)
रायगड (Raigad)
महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांची शान समजला जाणारा रायगड आजही तितकाच सुंदर दिसतो. महाराष्ट्रातील महाड जिल्ह्यामध्ये रायगड असून मुंबईपासून साधारण 5 तास इथे जाण्यासाठी लागतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गडांपैकी एक असून यावर हायकिंग करणे हे प्रत्येकाला वाटते. 2700 फूट उंच असणारा हा गड शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला होता. तीन बाजूंनी या गडावर हायकिंग करता येते. तर रायगडावर राण्याचे महाल, राजदरबार, दरवाजा इत्यादी पाहण्यासारखे आहे. इथले बुरूज आता ढासळले असले तरीही रायगडाची शोभा अजूनही तशीच आहे. काही ठिकाणी काम करणे गरजेचे असले तरीही हायकर्ससाठी हा गड नक्कीच महत्त्वाचा आहे. इथे महादरवाजाने प्रवेश करता येतो. दोन्ही दरवाजे हे 65-70 फूट इतके उंच आहेत. त्यामुळे इथे हायकिंग केल्यानंतरचा सगळा थकवा इथले सौंदर्य बघून नाहीसा होतो हे निश्चित. गडाला साधारण 1400 – 1450 पायऱ्या आहेत. आता इथे रोपवे देखील आहे. मात्र तुम्हाला हायकिंगची आवड असेल तर निश्चितच इथे यायला हवे. साधारण 2 तास हा गड चढायला लागतात.
हायकिंगची वेळ – सकाळी 8 ते संध्याकाळी 6
महिना – मार्च ते जून (पावसाळ्यात सुद्धा)
विकटगड (Vikatgad)
नेरळ रेल्वे स्टेशनपासून साधारण 13 किमी अंतरावर विकटगड आहे. अतिशय जुना गड असून पावसाळ्यात हायकिंग करण्यासाठी इथे नेहमी लोक येतात. 2100 फूटावर असणारा हा गड नेहमीच सुंदर दिसतो. यालादेखील ऐतिहासिक ओळख असून इथे स्वामी समर्थांचे निवासस्थान होते आणि स्वामी समर्थ इथे ध्यानधारणा करायचे असं म्हटलं जातं. विकटगडचा आकार हा गणपतीबाप्पाप्रमाणे असून हायकिंगसाठी मोठे आकर्षणाचे ठिकाण आहे. माथेरानच्या डोंगराच्या कुशीमध्ये विकटगड असून हा गड सर करायला साधारण 2 तास लागतात. तर उतरण्यासाठी 1 तास लागतो. तुम्ही उतरून डायरेक्ट माथेरानच्या रेल्वे ट्रॅकमधून चालत येऊ शकता.
हायकिंगची वेळ – सकाळी 9 ते संध्याकाळी 6
महिना – मार्च ते जून (पावसाळ्यात सुद्धा)
प्रश्नोत्तरे (FAQs)
डोंगर, दऱ्या, जंगल यातून वाट काढत एखाद्या सुंदरशा किल्ले अथवा विवि ठिकाणाला भेट देणं याला हायकिंग असं म्हणतात. रस्त्यात अनेक दगड आणि दुर्गम वाटांमधून रस्ता काढत आपल्याला हव्या असणाऱ्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठिकाणांना भेट देणं.
हायकिंग करताना तुम्हाला आपल्या बॅगेत सर्व आवश्यक वस्तू ठेवाव्या लागतात. जिथे जायचे आहे त्याचा योग्य पत्ता आणि ठिकाणाचा अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे तुम्हाला वेगळे शूज आणि इतर गोष्टींचीही गरज भासते. खाणं – पाणी या सगळ्यांचा साठा बरोबर ठेवावा लागतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार त्याची सर्व माहिती आणि रस्ते जाणून घ्यावे लागतात.
तुम्हाला माहीत नसणाऱ्या ठिकाणी जाणार असलात तर गाईड अर्थात मार्गदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण स्थानिक ठिकाणांच्या काही आतील बाबी आपल्याला माहीत नसतात. त्याचे योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
मग या मे महिन्यात सुट्टी लागली की, एक मे ला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा एकमेकांना फोनवरून देण्याऐवजी अशा ठिकाणी जाऊन द्या. महाराष्ट्राबद्दलचं तुमचं प्रेम नक्कीच द्विगुणित होईल.