दागदागिने हा प्रत्येक स्त्रीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. सणासुदीला घरातील मुली, सुनांसाठी स्त्रीधन म्हणजेच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी आवर्जून केली जाते. ‘अक्षय्य तृतीया’ हा साडे तीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. शुभ मुहूर्त साधण्यासाठी दरवर्षी अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. मात्र यंदा हा सोने खरदीचा शुभ मुहूर्त सर्वांनाच टाळावा लागणार आहे. कारण जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशीदेखील सोनाराची दुकानेदेखील बंदच असणार आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी यंदा नाही करता येणार. मात्र तुम्ही तुमच्या घरातील सोन्यांच्या दागिन्यांची काळजी नक्कीच घेऊ शकता. या दागिन्यांना स्वच्छ करून त्यांना नवी झळाळी देऊ शकता. सोन्याचे दागिने आपल्या सौंदर्यांमध्ये नक्कीच अधिक भर घालत असतात. पण प्रत्येक दागिन्याला स्वतःचे देखील एक सौंदर्य असते. सोन्याच्या धातूपासून दागिने तयार करताना बारीक कलाकुसर केली जाते. या नाजूक कलाकुसर केलेल्या दागिन्यांचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी त्यांची विशेष काळजी आणि निगा राखणं गरजेचं असतं. सोन्याचे दागिने अंगावर परिधान केल्यावर त्वचेवरील घाम, वातावरणातील धुळ, माती, प्रदूषणाचा संपर्क त्यांना सतत होत असतो. यासाठीच ते वेळच्या वेळी ते स्वच्छदेखील केले पाहिजेत. यासाठीच जाणून घ्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी कशी घ्यावी.
Shutterstock
सोन्याच्या दागिन्यांची निगा राखण्यासाठी सोप्या टिप्स –
- सर्वात महत्वाचं म्हणजे सोन्याचे दागिने नाजूक असल्यामुळे ते परिधान करून कधीच झोपू नये. सणासुदीला अथवा नियमित जरी दागदागिने घातले तरी ते रात्री झोपण्यापूर्वी काढून ठेवावेत.
- सोने हा मौल्यवान धातू आहे त्यापासून तयार केलेले दागिने स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही कृत्रिम अथवा रासायनिक गोष्टींचा वापर करू नये. कारण त्यामुळे दागिन्यातील सोन्याची झीज होऊ शकते.
- दागिने वापरून झाल्यावर ते कापसाच्या मदतीने अथवा पाण्याने स्वच्छ करून दागिन्यांच्या पेटीत ठेवून द्यावे. ज्यामुळे त्यांचा वातावणातील धुळमातीशी संपर्क कमी प्रमाणात येईल.
- दागिने परिधान केल्यावर अंगावर कोणताही सुंगधी स्प्रे, पावडर, क्रीम, मेकअपच्या साहित्याचा वापर करू नये. यासाठी दागिने वापरण्यापूर्वीच मेकअप करून घ्यावा. ज्यामुळे या गोष्टींचा दागिन्यांना केमिकल्सचा संपर्क कमी प्रमाणात होईल.
- जर तुमचे सोन्याचे दागिने सतत वापरून काळवंडले असतील तर ते रिठा भिजत घातलेल्या पाण्याने ते स्वच्छ करा. रिठा ही एक आयुर्वेदिक औषधी असल्याने त्यामुळे सोन्याची झीज होणार नाही.
- उकडलेल्या बटाट्याच्या पाण्यानेदेखील तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने स्वच्छ करू शकता.
- पालक अथवा मेथीसारख्या लोहतत्त्व असलेल्या भाज्या शिजवलेले पाणी वापरून तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने स्वच्छ करू शकता.
- टूथपेस्ट अथवा टूथपावडरनेदेखील सोन्याचे दागिने स्वच्छ केले जातात. मात्र याचा वापर करायचा का नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
- दागिने कधीच जोरात रगडून अथवा घासून स्वच्छ करू नका.
- कोणत्याही नैसर्गिक अथवा अनैसर्गिक गोष्टीचा वापर करून दागिने स्वच्छ केल्यावर ते पुन्हा स्वच्छ आणि थंड पाण्याने धुवून घ्या.
- स्वच्छ केलेले दागिने कोरड्या सुती कापडाने अथवा कापसाने पुसून घ्या.
- कोरडे झाल्यावर ते तुमच्या दागिन्यांच्या डब्यातच ठेवा. दागिने कसेही ठेवल्यामुळे ते तुटण्याची शक्यता जास्त असते.
- जर तुमच्या सोन्याच्या दागिन्यांवर मौल्यवान रत्ने, मोती जडवलेले असतील तर असे दागिने स्वच्छ करताना ते नाजूकपणे हाताळा.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
दसऱ्याला सोन्याचे दागिने विकत घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी
मराठमोळ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स खास तुमच्यासाठी (Mahashtrian Mangalsutra Designs)
अशी घ्या मोत्यांच्या दागिन्यांची काळजी How to take care of Pearl Jewellery