home / फॅशन
kanchipuram-silk-sarees

खरी कांजीवरम साडी कशी ओळखायची, सोपी युक्ती

कांजीवरम साड्या (Kanjivaram Sarees) म्हटलं की प्रत्येक महिलेच्या डोळ्यात चमक येते. लग्नासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघत असतो. अत्यंत सुंदर, आकर्षक आणि दिसायला रॉयल असणाऱ्या या साड्या आपल्याही वॉर्डरोबमध्ये असाव्या हे प्रत्येक महिलेला वाटत असते. दक्षिण भारतातील (साऊथ इंडियन साड्या) या साड्या अत्यंत लोकप्रिय आहेत. तामिळनाडूतील कांचीपुरम (Kanchipuram) या गावातील ही मूळ साडी. मुघल प्रेरित डिझाईनपासून अत्यंत सुंदर आणि अप्रतिम रंगाच्या या साड्या मिळतात. साधारण एक कांजीवरम साडी बनवायला 15 दिवस ते एक महिना इतका कालावधी लागतो. अत्यंत कलाकुसरीचे काम असेल तर सहा महिनेदेखील लागतात. याच्या दर्जा, धाग्याच्या डिझाईननुसार याची किंमत ठरत असते. सहसा या साड्या महागच असतात. त्यामुळे कांजीवरम घेताना जर किंमत कमी ऐकली तर ही साडी खरी कांजीवरम नाही आणि खोटीच आहे असा समज होतो. काही जणींना खरी कांजीवरम ओळखायची कशी हेच माहीत नसते. तर काही जणांना कांजीवरम आणि बनारसीमधील फरकही कळत नाही. शिवाय बाजारातही खऱ्याच्या नावाखाली खोटी कांजीवरम विकण्यात येते. त्यामुळे तुम्हीही कांजीवरम साडीची खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला खरी साडी कशी ओळखायची हे माहीत असायला हवं. जाणून घ्या सोप्या युक्ती. 

कपड्यावरून घ्या जाणून 

कांजीवरम साडी खरी आणि की खोटी आहे याबाबत तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा त्याचा कपडा बघायला हवा. कांजीवरम साडी ही दिसायला अत्यंत चमकदार असते. तुम्हाला याबाबत शंका असेल तर साडी न्याहाळताना ही साडी थोडीशी खरवडून पाहा. या साडीच्या आता लाल सिल्क दिसत असेल तर ही खरी कांजीवरम आहे याची तुम्हाला खात्री होईल. कारण कांजीवरम साडीमध्ये लाल सिल्कचे धागे हे असतातच. त्याशिवाय ही साडी पूर्ण होत नाही. 

वजनाने तपासा

बऱ्याच महिलांना असं वाटतं की, कांजीवरम साडी ही त्यावरील डिझाईन्समुळे वजनाला जड असते. पण असं अजिबात नाही. कांजीवरम साडी ही अत्यंत हलकी असते. याचे वजन अजिबात जास्त नसते. याचे डिझाईन हे अत्यंत योग्य आणि चांगल्या मालापासून तयार होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा कांजीवरम साडीची खरेदी करायला जाल, तेव्हा साडीच्या वजनावर विशेष लक्ष द्या. अधिक वजन लागत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा साडीची पडताळणी करा. 

जरी तपासून घ्या

कांजीवरम साडीची सर्वात महत्त्वाची शोभा म्हणजे यावरील भरलेली जर. कांजीवरम साडी खरी आहे की खोटी आहे हे तपासण्यासाठी तुम्ही जरी तपासू शकता. तुम्ही साडीची जर जरा खेचून बघा. याचा धागा लाल न दिसता पांढरा दिसला अथवा अन्य कोणताही रंग दिसला तर ही साडी खरी कांजीवरम साडी नाही हे समजून जा. कांजीवरम साडीचा धागा हा लालच असतो. कारण ही साडी शुद्ध लाल रेशमी धाग्यांपासून तयार करण्यात येते. जो धागा चांदीच्या धाग्यासह गुंफला जातो आणि नंतर 22 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये हा धागा बुडविण्यात येतो. 

धागा जाळून पाहा

याशिवाय तुम्ही साडीचा धागा जाळूनही कांजीवरमची ओळख पटवून घेऊ शकता. पण हा सर्वात शेवटचा पर्याय आहे. तुम्ही साडीचे धागे काढून त्याला पेटवा. जेव्हा ही आग संपेल तेव्हा राखेचा गोळा तयार होईल. पण त्या राखेचा गोळ्यात तुम्हाला एक लहानसा गोळा मिळेल तो रगडून तुम्ही त्याचा वास घ्या. या राखेचा वास चामड्यासारखा आल्यास अथवा जळलेल्या केसांसारखा आल्यास, समजावे की, तुम्ही योग्य कांजीवरम साडी खरेदी करत आहात. कृत्रिम रेशीम धाग्यांची साडी असेल तर हे धागे जळल्यानंतर राख तयार होत नाही. कृत्रिम धागे असल्यास कोणताही गंध जळल्यानंतर येत नाही. 

या सोप्या पद्धतीने तुम्ही खऱ्या कांजीवरम साडीची ओळख करून घेऊ शकता. तुम्हाला फसण्याची शक्यता वाटत असल्यास, यापैकी कोणतीही युक्ती वापरून तुम्ही साडीची ओळख करून घेऊ शकता.

06 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text