गहू, तांदूळ, डाळ हे धान्य वर्षभर घरात साठवून ठेवता येते. मात्र जर या धान्याला ओलावा अथवा दमट हवा लागली तर ते लवकर खराब होते. बऱ्याच पावसाळ्याआधी घरामध्ये वर्षभराचा किराणा माल भरून ठेवला जातो. ज्यामुळे पावसाळ्यात वाण सामानाची टंचाई भासत नाही. वर्षभरासाठी गहू, तांदूळ अथवा डाळीची खरेदी केल्यामुळे धान्य खरेदी स्वस्तात पडते. मोठ्या आणि एकत्र कुटुंबात बऱ्याचदा धान्याची अशीच खरेदी केली जाते. मात्र होलसेल भावात धान्य खरेदी केल्यामुळे ते स्वस्त जरी पडत असलं तरी ते वर्षभर टिकवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावीच लागते. कारण योग्य काळजी घेतली नाही तर धान्याला कीड लागू शकते. काही जण मग धान्यावर किटकनाशके लावतात. असं करणं आरोग्यासाठी धोक्याचं आहे. यासाठीच जाणून घ्या नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने वर्षभर गहू, तांदूळ, धाळी कडधान्य कसं टिकवावं.
धान्य कडक उन्हात वाळवा –
धान्याला दमट हवा अथवा पाणी लागलं तर धान्य लवकर खराब होतं. यासाठी पावसाळ्यात धान्य खराब होऊ नये यासाठी उन्हाळयात त्याला चांगलं ऊन दाखवा. तुम्ही गहू, डाळी, कडधान्य उन्हात वाळवू शकता. चांगले तीन चार दिवस चांगलं ऊन दाखवून मगच धान्य भरून ठेवा. ज्यामुळे धान्य लवकर खराब होणार नाही. मात्र असं करताना लक्षात ठेवा तांदूळ मात्र तुम्ही उन्हात वाळवू शकत नाही. तांदळाला उन दाखवलं तर ते खराब होतात. मात्र तुम्ही ते घरातच मोकळ्या जागेत ठेवून हवेशीर जागी मोकळं ठेवून मग ते भरून ठेवू शकता.
धान्य खरेदी करताना सावध राहा –
धान्य भरपूर प्रमाणात खरेदी केलं तर ते स्वस्त मिळतं. मात्र स्वस्त मिळत आहे म्हणून धान्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याचदा अशा खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता असते. यासाठी खात्रीदायक दुकानातूनच होलसेल धान्याची खरेदी करा. कारण धान्य चांगल्या गुणवत्तेचे असेल तरच ते वर्षभर टिकेल. बऱ्याचदा यासाठी नवीन धान्याची खरेदी केली जाते. जे धान्य काही महिने साठवून ठेवल्यानंतर वापरासाठी काढता येते.
धान्य साठवणीसाठी योग्य कोठीचा वापर करा –
वर्षभर साठवण्याचे धान्य तुम्ही नेहमीच्या वापरातील डब्यांमध्ये नाही ठेवू शकत. कारण जर त्याला सतत हाताळलं गेलं तर ओलाव्यामुळे धान्य खराब होऊ शकतं. वर्षभर धान्य साठवण्यासाठी धान्याच्या कोठी बाजारात मिळतात. जर तुमच्याकडे धान्याची कोठी नसेल तर एका मोठ्या डब्यात तुम्ही धान्य साठवू शकता. मात्र या धान्य साठवलेल्या कोठी अथवा डब्याला सतत हाताळू नका. धान्य भरून ठेवण्यापूर्वी कोठी अथवा डबे स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या. ज्यामुळे त्यात ठेवलेलं धान्य जास्त काळ टिकेल. धान्य ज्या ठिकाणी ठेवणात त्या ठिकाणी मुंग्या अथवा कीटकांचा वापर टाळण्यासाठी ती निर्जंतूक करा.
धान्यात कडूलिंबाची पाने टाका –
धान्य जास्त काळ टिकवण्याचा हा एक प्राचीन, नैसर्गिक आणि चांगला मार्ग आहे. यासाठी कडूलिंबाची पाने सुकवा. धान्यात ठेवण्याआधी कमीत कमी पंधरा दिवस आधी पाने सुकवा. कडूलिंबाची पाने चांगली सुकल्यावर ती धान्यामध्ये सर्व ठिकाणी पसरवा. धान्याच्या कोठीच्या खाली, मध्यभागी, आजूबाजूने आणि वरच्या बाजूला पाने ठेवा.
इतर महत्त्वाच्या काही टिप्स –
- धान्य ज्या कपाटात अथवा खोलीत ठेवलं असेल ती जागा सतत वापरू नका. मात्र दर पंधरा दिवसांनी धान्याची तपासणी करायला विसरू नका.
- धान्य साठवण्यासाठी प्लास्टिकचे अथवा इतर डबे वापरणार असाल तर तिथे आजपास थोडा कोळसा ठेवा. कोळशामुळे हवामानातील आर्द्रता खेचून घेतली जाईल आणि धान्याला वास येणार नाही.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
सुकामेवा जास्त दिवस टिकण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स
सोललेला लसूण फ्रेश राहण्यासाठी असा ठेवा साठवून
जाणून घ्या सेंद्रिय शेतीचे फायदे (Benefits of Organic Farming In Marathi)