हेपेटायटिस (Hepatitis) हा यकृताचा एक दाह असून तो हेपेटायटिस विषाणूमुळे होतो. त्यामुळे शरीरातील ऊतींना दुखापत किंवा संसर्ग झाल्यास सूज येते. यामुळे शरीरातील इतर अवयवांचेही नुकसान होते. विविध अभ्यासांनुसार, हेपेटायटिस ए, बी,सी,डी आणि ई यासह अनेक प्रकारचे विषाणू हेपेटायटिसला कारणीभूत आहेत. शिवाय, एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेव्दारे, दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस ई संसर्ग होऊ शकतो. डॉ. मृदुल धरोड, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले.
कमी शिजवलेले डुकराचे मांस, हरण किंवा शेलफिश खाल्ल्यानेही हेपेटायटिस ई होऊ शकतो. एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात आल्यावर देखील हेपेटायटिस बी, सी आणि डी पसरतो. हेपेटायटिस बी आणि डी इतर शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्कात येण्याद्वारे देखील पसरू शकतात किंवा असुरक्षित लैंगिक संबंधाद्वारेही संक्रमण होऊ शकते. हेपेटायटिस बी, सी आणि डी विषाणू तीव्र आणि जुनाट, किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या संसर्गांना आमंत्रित करू शकतात.
हेपेटायटिसची लक्षणे:
हेपेटायटिसची काही महत्त्वाची लक्षणे आहेत. हेपेटायटिस असलेल्या अनेक लोकांमध्ये गडद लघवी, असह्य पोटदुखी, कावीळ, ताप, भूक न लागणे, अशक्तपणा वाटणे आणि सांधेदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांची नोंद घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
हेपेटायटिस होण्याचा धोका कोणाला:
काही जणांना याबाबत अधिक माहिती नसते. पण ज्या व्यक्ती ड्रग्स घेण्यासाठी सारख्याच सुया वाटून घेतात, असुरक्षित संभोग करतात, ज्यांचे एकापेक्षा अधिक लैंगिक साथीदार असतात, मद्यपान करणे, अपुरे पोषण, हॉस्पिटल किंवा नर्सिंग होममध्ये काम करणारे लोक आणि दीर्घकाळ किडनी डायलिसिसवर राहिल्याने ही स्थिती उद्भवू शकते.
उपचार:
उपचार करणारा डॉक्टर शारीरिक तपासणी करेल आणि हेपेटायटिसच्या संभाव्य संपर्काबद्दल जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारेल. हेपेटायटिस ए आणि ई (Hepatitis A And E) साठी अद्याप कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. एखाद्याला बरे होण्यासाठी काही आठवडेही लागू शकतात. स्वतःच्या मनाने औषध घेणे टाळावे. परंतु, तुम्हाला हेपेटायटिस बी, सी आणि डी असल्यास डॉक्टर औषधे देतील. त्यामुळे कोणतीही औषधे वगळू नका. तुम्हाला या आजाराचा त्रास असेल तर तुम्ही औषधे वेळच्या वेळी घ्यायला हवीत हे नेहमी लक्षात ठेवा.
व्हायरल हेपेटायटिस टाळण्यासाठी टिप्स:
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हेपेटायटिस ए (Hepatitis A) आणि हेपेटायटिस बी (Hepatitis B) साठी लसीकरण करा. संभोग करताना संरक्षण वापरण्याचा प्रयत्न करा, वापरलेल्या सुया पुन्हा वापरु नका, चांगली वैयक्तिक स्वच्छता राखा, तुमचे हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोणतेही टॅटू किंवा शरीरावर गोंदताना सावधगिरी बाळगा. तसेच, अस्वच्छ भागात प्रवास करताना सतर्क रहा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. अत्यंत काळजी घेतल्यास हेपेटायटिसपासून दूर राहण्यास (How to Take Care Regarding Hepatitis) मदत होऊ शकते. या सर्व सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित रहा. स्वतःची काळजी घेण्याचे आणि निरोगी जीवन जगण्याचे प्रयत्न करा. दरवर्षी नियमित तपासणीसाठी तुम्ही जाणे आवश्यक आहे. वर्षातून एकदा तरी संपूर्ण शरीराची तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक