27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस. या दिवशी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने मराठी भाषा दिन शुभेच्छा दिल्या जातात. खरं तर मराठी भाषा समृद्ध आहे आणि हल्ली मराठी भाषा दिन की दीन असा प्रश्न बरेचदा विचारण्यात येतो. पण खरं तर आपल्या भाषेला समृद्ध करण्याचे काम हे आपलेच आहे. आपण जोपर्यंत आपल्या भाषेत बोलत नाही तोपर्यंत आपली भाषा समृद्ध होणार तरी कशी हादेखील मुद्दा आहेच. आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवतोय आणि सर्रास घरांमधूनही आपल्या मातृभाषेपेक्षा इंग्रजी भाषेला अधिक महत्व देण्यात येते. त्यामुळे दैनंदिन वापरातील काही मराठी शब्द हरवलेले दिसून येतात. आपल्यालाही आता एका वाक्यात सर्व मराठी शब्द वापरण्याची सवय राहिली आहे का असा प्रश्न स्वतःला विचारून पाहा बरं. तर याचं उत्तर बऱ्याच जणांकडून नाही असंच येईल. सततच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या वापरामुळे आपल्याला मराठी भाषेतील काही शब्द आता आठवतच नाही अथवा बऱ्याचदा असं जाणवतं की अरे हे मराठी शब्द आता वापरातच नाहीत. अशाच काही मराठी शब्दांविषयी जाणून घेऊया.
दैनंदिन वापरातील म्हणी आणि वाक्प्रचार लोप पावत आहेत का
पूर्वपरंपरागत अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आपल्याकडे आहेत. पण आपल्या नव्या पिढीला याबाबत फारच कमी माहीत आहे. कारण आता दैनंदिन वापरातील म्हणी आणि वाक्प्रचार वापरले जात नाहीत असं दिसून येतंय. अर्थात हे लोप पावत चालले आहे का असा प्रश्न नक्की पडतो. पण नक्कीच लोप पावलेले नाहीत हे अनेक घरांमधूनही दिसून येते. पण असे नक्कीच काही मराठी शब्द आहेत जे आता वापरात नाहीत. त्याची कारणं काहीही असोत. मराठी भाषा दिनानिमित्त काही शुभेच्छा संदेश देखील असतात. यामध्ये आपण मराठीचा वापर करतोच. पण यातून असेच काही शब्द आपण यातून पाहणार आहोत जे आता वापरात नाही.
भ्रमणध्वनी – मोबाईलचा वापर करायला लागल्यापासूनच आपण भ्रमणध्वनी कधीच म्हटलेले आठवत नाही. मराठीतील हा शब्द केवळ कागदावरच लिहिलेला दिसून आला आहे. पण आता तर हा शब्द कागदावरही फारसा दिसून येत नाही. मराठी भाषेचा प्रवास खूपच मोठा आहे. पण त्यातील बरेचसे शब्द आता लोप पावले आहेत.
महाविद्यालय – महाविद्यालय हा शब्द आता केवळ कधीतरी वृत्तपत्रातून दिसून येतो. पण त्यातूनही हा शब्द हरवला गेला आहे असं दिसून येत आहे. सर्वांना समजावं म्हणून हल्ली कॉलेज हा शब्दच वापरण्यात येतो. त्यामुळे हा शब्दही केवळ कागदावरच आता राहिला आहे.
अडकित्ता – पूर्वी अडकित्ता हा शब्द अनेकदा आपण ऐकला असेल. पण आता सुपारी, पान यासाठी अडकित्तादेखील जास्त वापरला जात नाही. त्यामुळे अडकित्ता हा शब्द हद्दपार तर झाला नाही ना असं वाटतंय. खलबत्ता आणि अडकित्ता या दोन्ही वस्तू तसं तर आता अडगळीतल्याच झाल्या आहेत. मिक्सर आल्यापासून खलबत्त्याचा वापर कमी झाला आहे आणि अडकित्ता तर आता जवळपास नाहीसाच झाला आहे.
उपहारगृह – गिरगाव, डोंबिवली यासारख्या ठिकाणी किमान फलकांवर तरी उपहारगृह हा मराठी शब्द दिसून येतो. मात्र हॉटेल अथवा रेस्टॉरंट असे शब्द सर्रास वापरले जातात. उपहारगृह हा शब्द अजिबातच वापरला जात नाही. पुढच्या पिढीला हॉटेलला उपहारगृह असे म्हटले जाते हेदेखील माहीत नसावे असे वाटते. पण जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत त्यांनाही तो शब्द कळणार नाही.
छत – छतावर जाऊन आराम करूया असं वाक्य आता ऐकू येत नाही. टेरेस अथवा गच्ची हेच दोन शब्द आपल्याला ऐकिवात येतात. छत हा शब्द जवळपास ऐकू येणे बंदच झाले आहे.
यंत्रे – उपकरणे – आपल्याकडे आता सर्रास मशीन हा शब्द वापरण्यात येतो. यंत्रे आणि उपकरणे हा शब्द सहसा ऐकू येत नाही. वापरातही येत नाही. प्रशासकीय कामात तुम्हाला यंत्रे आणि उपकरणे हा शब्द नक्की दिसून येतो.
छायाचित्र – पिक्चर अथवा फोटो हा शब्द आपण रोजच्या वापरात आपण वापरतो. छायाचित्र हा शब्द आपण सहसा कागदावर पाहतो. पण दैनंदिन मराठीमध्ये हा शब्द कुठेतरी मागे पडला आहे. छायाचित्र काढण्यात येत आहे अथवा हे छायाचित्र छान आहे असं जुन्या मराठी चित्रपटांमध्ये नक्की ऐकू येतो. पण आता दैनंदिन बोलण्यात मात्र हा शब्द येत नाही.
वही – ही माझी डायरी अथवा मला डायरीत लिहून ठेवायचं आहे असं बऱ्याचदा ऐकू येतं. डायरी हा शब्द मराठी वाटावा इतका वापरला जातो. पण वही हवी आहे हा आपल्या लहानपणीच्या आठवणीतला शब्द झाला आहे असं म्हणावं लागेल. वही अथवा चोपडी हे शब्द आता कालबाह्य झाल्यासारखे वाटत आहेत.
दूरध्वनी – केवळ प्रशासकीय कार्यालय अथवा कागदोपत्री बऱ्याचदा हा शब्द वापरण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. मी कोणाला तरी दूरध्वनी करत आहे, असं आपण कधीच म्हणत नाही.
कार्यालय – मी कार्यालायत भेट देऊन येते अथवा कार्यालयातून दूरध्वनी आला आहे अशा पद्धतीचं मराठी आता अजिबातच ऐकू येत नाही. कार्यालय म्हणून ऑफिस आणि आता ऑफिस हाच शब्द वापरात आहे. कार्यालय हा शब्द कुठेही दैनंदिन व्यवहारात ऐकू येत नाही.
स्थानक – स्थानक हा शब्दही आपण दैनंदिन व्यवहारात वापरत नाही. स्थानक अर्थात स्टेशन हा शब्द आपण आपल्या शब्दकोशात सामावून घेतल्यासारखं झालं आहे. स्थानक हा शब्द त्यामुळे हद्दपारच झाला आहे.
दिवे – घरातील दिवेलागणीची वेळ झाली असो अथवा कोणालाही दिवे लावायला सांगायचे असो तोंडातून लाईट्स ऑन कर असाच शब्द येतो. दिवे लाव असा शब्द अजिबात येत नाही. दिवेलागणीची वेळ साधारण घरात आजी असेल तर ऐकायला आला तर आला. अन्यथा लाईट्स हा शब्दानेच आपली जागा व्यापली आहे.
असे अनेक मराठी शब्द आहेत जे आपण आपल्या आयुष्यातून हद्दपार केले आहेत. काही शब्द आपल्या आयुष्यातून हरवून गेले आहेत.
वाचा – मराठी भाषेचा प्रवास
परत मिळविण्यासाठी काय करावे
सर्व क्षेत्रात मराठीचा वापर वाढविण्यासाठी काही कडक कायदे होण्याची गरज आहे असं कधीतरी वाटते. किमान आपल्या घरात तरी आपण व्यवस्थित आणि शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करायला हवा. कुठेही न लाजता अगदी अभिमानाने मराठी भाषा वापरायला हवी. शिक्षण, राजकीय पक्ष, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था यांनी आपली भूमिका लक्षात घेऊन त्यावर अंमलबजावणी करावी. मराठी भाषिकांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपणच आपली मराठी बोलीभाषा कशी परत मिळवायची याचा प्रयत्न करायला हवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक