कोरोनाच्या या काळात खूप जण अनेक अघोरी उपाय करु लागले आहेत. घसा शेकण्यासाठी आणि कोरोनाचा विषाणू मरावा म्हणून खूप जणांनी जणू रोजच्य रोज काढा पिण्याची सवय अंगाला लावून घेतली आहे. पण कारण नसताना काढे पिणे हे आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही. रोज काढा प्यायल्यानंतर जर तुम्हाला काही त्रास जाणवू लागले असतील तर तुम्ही आताच काढे पिणे टाळा. जाणून घ्या सतत काढे पिण्याचे शरीरावर नेमके काय दुष्परिणाम होतात ते.
पिंपल्स येणे
काढा बनवण्यासाठी आलं, सुंठ, काळीमिरी, लवंग, गूळ असे काही घटक घातले जातात. शरीरासाठी हे घटक चांगले असतात. पण याच्या अति सेवनामुळे शरीरावर त्याचे काही परिणाम जाणवू लागतात. जर तुमच्या शरीरालाा आयुर्वेदिक घटकांची मुळीच सवय नसेल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढू शकते. या उष्णतेचे पर्यावसन तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स होण्यापासून होते. चेहऱ्यावर खूप मोठे पिंपल्स येण्यास सुरुवात होते. जर अचानक तुमच्या गालावर असे पिंपल्स येऊ लागले असतील तर तुम्ही काढा त्वरीत थांबवावा कारण असे पिंपल्स हे फार मोठे आणि त्रासदायक असतात.
बद्धकोष्ठता
सतत गरम मसाले खाऊ नका असा देखील अनेकदका सल्ला दिला जातो. याचे कारण हेच असते की, शरीरात जास्त उष्णता वाढली की, शरीराची आग होऊ लागते काहीही काण्याची इच्छा होत नाही. अशावेळी पोटाची आग झाल्यामुळे आणि शरीराची उष्णता वाढल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. अनेकदा बद्धकोष्ठता झाल्यानंतर शौचाला जाताना गुदद्वाराकडे खूप जळजळ होऊ लागते. जर तुम्ही काही कारणासाठी रोज काढ्याचे सेवन करत असाल तर असा त्रास होऊ लागतो.
भूक मरणे
खूप वेळा काढ्यांमध्ये असलेले उष्णता वाढवणारे घटक इतके घातकी आणि त्रासदायक असतात की,त्यामुळे काहीही खाण्याची इच्छा मुळीच होत नाही. पोटात आग पडलेली असूनही भूक अशी लागत नाही. भूक मंदावली की, तुमची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी काढा घेऊन त्याचा आरोग्याला कोणताही फायदा होत नाही. घशासाठी किंवा चांगल्या आरोग्यासाठी जर तुम्ही काढा पित असाल आणि तुम्हाला भुकेची समस्या जाणवत असेल तर तुम्ही आताच काढा घेणे बंद करा.
जीभ फुटणे किंवा तोंड येणे
ज्यावेळी आपण खूप मसालेदार किंवा चटपटीत खातो अशावेळी जीभ फुटणे किंवा तोंड येणे अशा समस्या निर्माण होतात. जर तुम्हाला असा त्रास होऊ लागला असेल आणि तुमचा काढा घेणे सुरु असेल तर तुम्ही काढ्याचे सेवन त्वरीत थांबवा. असे केले नाही तर हा त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते.
आता काढा प्यायल्यानंतर जर तुम्हाला असे काही त्रास जाणवत असतील तर तुम्ही आताच त्याचे सेवन करणे टाळा नाहीतर हे काही त्रास वाढून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.