‘अनाथांची आई’ ‘अनाथांची यशोदा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ हिंदीतील कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर भागात सहभागी होणार आहेत. कौन बनेगा करोडपती हा हिंदीतील सर्वात लोकप्रिय शो आहे. नुकताच या शोच्या 11 वा भागाची सुरूवात झाली आहे. या शोमध्ये कर्मवीर स्पेशल एपिसोड मध्ये भारताच्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई येणार आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर स्पेशल भागात येणाऱ्या ‘या’ विशेष कार्य करणाऱ्या लोकांंमुळे अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळते. जीवनात अतिशय खडतर प्रवास करत सिधुंताईंनी हजारो मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यांच्या जीवनातील हा संघर्षमय प्रवास सर्वसामान्यांच्या अंगावर काटा आणणारा आहे. जीवनातील हा संघर्षमय प्रवास करत असताना त्यांनी समाजकार्य करण्यास सुरूवात केली. त्यांच्या मुळे आज हजारो अनाथ मुलांना आईचं छत्र मिळालं आहे. ज्यामुळे सिधुंताईंना ‘अनाथांची आई’ अथवा ‘महाराष्ट्राची मदर तेरेसा’ या नावाने ओळखलं जातं. केबीसीच्या या शोमध्ये जेव्हा सिंधुताई सहभागी झाल्या तेव्हा खुद्द महानायकाने त्यांच्या पायावर डोकं ठेवत नमस्कार केला. सिंधुताईंचे हे समाजकार्य प्रत्येकाला नक्कीच नतमस्तक करायला लावणारं आहे.
सिंधुताई सकपाळ आहेत 1200 अनाथ मुलांची आई
सिंधुताईंनी आतापर्यंत देशभरातून जवळ जवळ 1200 अनाथ मुलांना दत्तक घेतलं आहे. या अनाथ मुलांची त्यांनी केवळ जबाबदारी स्वीकारली नाही तर त्यांनी त्यांना उत्तम शिक्षण आणि जीवनावश्यक सोयीसुविधादेखील पुरवल्या. या अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताईंनी ‘ममता बाल सदन’ संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. स्वतःची मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केलं आणि स्वतः मात्र देशभरातील अनाथ मुलांना आधार देण्यासाठी कंबर कसली. या संस्थेतील मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीदेखील मदत केली जाते. शिवाय योग्य जोडीदार शोधून त्यांचं लग्न लावून दिलं जातं. ज्यामुळे आज सिंधुताईंना अनेक सुना आणि जावईदेखील मिळाले आहेत. सिंधुताईनी या संस्थेच्या प्रचारासाठी देश-विदेशात अनेक दौरे केले आहेत. ज्यातून त्यांना या सामाजिक कार्यासाठी निधी उभा करता आला. सिंधुताईंचे बोलणे अतिशय प्रभावशाली आहे. ज्यामुळे त्यांनी आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर व्याख्याने दिली आहेत. ज्या माध्यमातून त्या या अनाथ मुलांसाठी या वयातही समाजकार्य करत आहेत. त्यांनी आधार दिलेली मुलंही आज त्यांना त्यांच्या या कार्यात सहकार्य करतात. सिंधुताईना या कार्याबद्दल 500 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये राष्ट्रपती सन्मान, अहिल्याबाई पूरस्कारांचा समावेश आहे.
मी सिंधुताई सकपाळ चित्रपटातून सिंधुताईच्या जीवनावर प्रकाशझोत
2010 साली मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सिंधुताईंची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने साकारली होती. अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित चित्रपटाला चाहत्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद दिला होता. आता सिंधुताई पुन्हा एकदा केबीसीच्या माध्यमातून जगासमोर येत आहेत. ज्यामुळे देश-विदेशातून त्यांच्या या महान कार्याला सलाम केला जात आहे.
अधिक वाचा
अरुंधती भट्टाचार्य यांना उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार
नेटफ्लिक्सवर ‘नया है यह’…आवर्जून पाहावे असे चित्रपट
Sacred Games 2 :धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने अनुराग कश्यपविरोधात पोलीस तक्रार
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम