आपल्याकडची प्रसिद्ध टॅगलाईन मुलगी शिकली प्रगती झाली ही तुम्ही अनेक रिक्षांवर पाहिली असेलच. मुलींचं शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी यासाठी गुंतवणूक केल्यास त्याचे अनेक प्रकारे चांगले परिणाम दिसून येतात. त्याचा फायदा भविष्यातील पिढ्यांना होतो आणि अर्थव्यवस्था व समाज यावरही सकारात्मक परिणाम होतो. भारतातील पितृसत्ताक समाजात मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या उद्देशाने, तसेच मुलीही सर्व बाबतीत मुलांच्या तोडीस तोड असल्याचा संदेश देण्याच्या हेतूने प्राउड फादर्स फॉर डॉटर्स या कार्यक्रमात वडील आणि मुलगी यांच्यातील नात्याचा बंध विचारात घेतो. त्यांना भारतातील काही नामवंत फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यातून फोटोमध्ये टिपले जाण्याची संधी हा कार्यक्रम देतो.
कार्यक्रमात असा घ्या सहभाग
प्राउड फादर्स फॉर डॉटर्सच्या सहाव्या पर्वाचे आयोजन ऑक्टोबर 19 व 20, 2019 रोजी वरळीतील एनएससीआय येथे करण्यात आले आहे. 6,000 रुपये भरून तुम्हालाही इथे स्लॉट बुक करता येऊ शकतो. ज्यामध्ये तुम्ही अतुल कसबेकर, कोल्स्टन ज्युलिअन, प्रसाद नाईक, तरुण खिवल, तरुण विश्वा व तेजल पटनी अशा सेलिब्रेटी फोटोग्राफरकडून फोटो काढून घेऊ शकता. हे सर्वजण कोणतेही शुल्क न आकारता त्यांचा वेळ उपलब्ध करून देणार आहेत. तसंच 5,000 मुलींच्या शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना नोंदणी शुल्कापेक्षा अधिक रक्कमही देता येऊ शकते. या कार्यक्रमातून उभारला जाणारा निधी प्रोजेक्ट नन्ही कलीद्वारे गरजू मुलींच्या शिक्षणासाठी दिला जाणार आहे.
आई आणि वडिलांच्या बदलत्या भूमिका
आई आणि वडील यांच्या भूमिका आता वेगवेगळ्या राहिलेल्या नाहीत. वडील घरी असले की त्यांचे कौतुक केले जाते, तर आई हीच भूमिका निभावत असली किंवा दोन्ही पालकांची भूमिका बजावली असली तरी तिची दखल घेतली जात नाही. यंदा आई-मुलगी यांच्यासाठी विशेष स्लॉट उपलब्ध करून अशा मातांची दखल घेतली जाणार आहे.
नामवंतांचा सहभाग
निर्भया बलात्कार प्रकरणानंतर भारतात मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन व मानसिकता बदलण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्याच्या महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या विचारातून प्राउड फादर्स फॉर डॉटर्स ही संकल्पना साकार झाली. आनंद महिंद्रा व अतुल कसबेकर यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही संकल्पना प्रत्यक्षात आली. या पूर्वी, या उपक्रमाला अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी वडील-मुलगी यांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये शत्रुघ्न सिन्हा व त्यांची कन्या सोनाक्षी सिन्हा, अनिल कपूर व सोनम कपूर, ऋषी कपूर व रिद्धिमा कपूर, जावेद अख्तर व झोया अख्तर, सचिन तेंडुलकर व सारा तेंडुलकर, लिअँडर पेस व ऐयाना पेस, अर्जुन रामपाल व मायरा व माहीका रामपाल, अलेक पदमसी व राईल व शाहझान पदमसी यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाविषयी आणि त्यातील नव्या गोष्टींविषयी मत व्यक्त करत, नामवंत फोटोग्राफर व राष्ट्रीय पुरस्कारविजेते चित्रपट निर्माते अतुल कसबेकर यांनी सांगितले की, “आनंद महिंद्रा आणि मी जेव्हा हे व्यासपीठ निर्माण केले तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे, हे आमचे उद्दिष्ट होते. मूळ उद्देश कायम ठेवून, गेल्या काही वर्षांत या व्यासपीठामध्ये झालेली वाढ थक्क करणारी आहे. वेळ आणि गुणवत्ता उपलब्ध करणाऱ्या या क्षेत्रातील काही नामवंत फोटोग्राफरच्या मदतीने, प्राउड फादर्स फॉर डॉटर्स ही अनेकांसाठी जीवनातील अपूर्व संधी ठरली आहे. #Mission5000 ते #Makeeverydaughtersmile हे लक्ष्य महत्त्वकांक्षी आहे, परंतु तुमच्या पाठिंब्याने आम्ही ते साध्य करू, असा विश्वास आहे.”
या कार्यक्रमाविषयी सांगताना महिंद्रा ग्रुपच्या सीएसआरच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टच्या कार्यकारी संचालक शीतल मेहता यांनी सांगितले की, “या वर्षी प्राउड फादर्स फॉर डॉटर्स यामार्फत, सकारात्मक आणि लक्षणीय बदल साध्य करणे व अधिकाधिक मुलींना त्यांच्या शिक्षणाचा हक्क बजावण्यासाठी पाठिंबा देणे, हे आमचं उद्दिष्ट आहे. आई आणिवडील यांच्या एकमेकाला पूरक असणाऱ्या भूमिका यांचा या पर्वामध्ये प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. मातांनाही त्यांच्या कन्यांशी असणारे घट्ट नाते दर्शवण्याची विशेष संधी दिली जाणार आहे. मुलांइतकाच मुलींचाही अभिमान बाळगण्यासाठी समाजामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या कामाची व्याप्ती अधिक व्यापक करण्यासाठी आम्हाला यामुळे मदत होणार आहे.”