स्त्रियांच्या जीवनाचा मासिक पाळी हा एक अविभाज्य भाग आहे. वयाच्या बारा-तेराव्या वर्षांपासून सुरु झालेली मासिक पाळी वयाच्या जवळजवळ पन्नाशीपर्यंत येते. या सबंध काळात स्त्रियांना मासिक पाळीशी निगडित अनेक गोष्टींचा त्रास होतो. मासिक पाळी गेल्यावरही स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. आज 2022 मध्येही अनेक स्त्रियांना मेन्स्ट्रुअल हायजिन विषयीची माहिती नाही किंवा त्यांना अशी परिस्थिती मिळत नाही की त्यांना स्वतःचे पर्सनल हायजिन जपता येईल. याच सर्व गोष्टींची जागरूकता व्हावी म्हणून दर वर्षी मासिक पाळी स्वच्छता दिवस 28 मे रोजी जगभरात साजरा केला जातो.
मासिक पाळीबद्दल अजूनही अज्ञान
वॉश युनायटेड या जर्मन एनजीओने 2014 मध्ये याची सुरुवात केली होती. हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश हा आहे की मुलींना व महिलांना मासिक पाळीदरम्यानच्या त्या पाच दिवसांच्या स्वच्छतेच्या महत्त्वाची जाणीव करून देणे. साधारणपणे, स्त्रियांची मासिक पाळी 28 दिवसांत येते आणि तिचा कालावधी पाच दिवसांचा असतो. या कारणास्तव, हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी 28 मे हा पाचवा महिना निवडला गेला. अजूनही या एकविसाव्या शतकातही केवळ खेड्यांमध्येच नाही तर शहरांमध्येही अनेक महिला मासिक पाळीबद्दल बोलण्यास कचरतात. अजूनही हा विषय मोकळेपणाने चर्चिला जात नाही. अजूनही दुकानांमध्ये सॅनिटरी पॅड्स मागण्याची अनेक स्त्रियांना लाज वाटते आणि ते इतर वस्तूंसारखे उघडे आणण्यास स्त्रियांना संकोच वाटतो. अजूनही दुकानदार ड्रग्स सारखी कुठलीतरी इल्लिगल वस्तू असल्यासारखे सॅनिटरी पॅड्स काळ्या पिशवीत गुपचूप गुंडाळून देतात.
समाजात अजूनही उघडपणे चर्चा होत नाही
घरातील पुरुषांना व मुलांना या बाबतीत माहिती असणे तर लांबच राहिले, त्यांना या काळात घरातील स्त्रियांची कशी काळजी घ्यायची याबद्दल जागरूक करणे तर दूरच राहिले, याविषयी घरात उघडपणे बोललेही जात नाही. पुरुषांचे तर सोडाच कित्येक मुली व स्त्रियांनाही या काळात त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी हे माहीत नसते. अशा प्रकारे अनेक महिला स्वतःचे आरोग्य धोक्यात आणतात. स्त्रियांना हे माहित असायला हवे की मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखल्यास या काळात संसर्गापासून स्वतःचे संरक्षण होऊ शकते. अजूनही खेड्यापाड्यातील आणि लहान शहरांतील अनेक स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी टॅम्पून, सॅनिटरी पॅड्स न वापरता कापड वापरतात. हे कापड पुन्हा वापरण्यासाठी, ते धुतल्यानंतर, ते लपवून कोरडे करण्याच्या प्रक्रियेत उघडी हवा किंवा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे ते स्वच्छ होत नाही. त्यावर जंतूंची वाढ झालेली असते आणि त्याचा वापर केल्याने गंभीर संसर्ग होऊ शकतो.
शहरातील स्त्रियाही आहेत अनभिज्ञ
मासिक पाळी दरम्यान कपड्यांऐवजी पॅड वापरणे सुरक्षित आहे. बहुतांश शहरी स्त्रिया हल्ली पॅड वापरणे पसंत करतात. पण एकच पॅड जास्त वेळ घातल्याने घामामुळे ओलसर राहतो. यामुळे योनीमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे महिलांनी दर सहा ते आठ तासांनी पॅड बदलायला हवे. खरं तर पॅड व टॅम्पून वापरण्यापेक्षा मेन्स्ट्रुअल कप वापरणे जास्त सोयीस्कर आहे. आर्थिकदृष्ट्याही ते वापरणे सोयीस्कर पडते कारण एक मेन्स्ट्रुअल कप साधारपणे पाच वर्षे तरी चालतो. पाळीच्या काळात तो स्वच्छ धुवून सॅनिटाईज व निर्जंतुक करून ठेवल्याने त्याचा वापर करणे अधिक सुरक्षित ठरते आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही मेन्स्ट्रुअल कप वापरणे चांगले आहे. तुम्हाला काय वाटते? पॅड वापरणे सोपे की कप? तुम्ही काय वापरता? तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांशी मासिक पाळी या विषयावर चर्चा करता का? तुमच्या मुलांना तुम्ही याविषयी माहिती देता का? घरातले लोक या विषयी चर्चा करण्यास उत्सुक असतात की त्यांना संकोच वाटतो?
सर्व्हेमध्ये मत नोंदवा
सिरोना ही कंपनी स्त्रियांच्या पर्सनल हायजिनशी निगडित अनेक उत्पादने तयार करते. या कंपनीने मासिक पाळीशी निगडित लोकांचे काय विचार आहेत , काय मते आहेत हे जाणून घेण्यासाठी एक सर्व्हे सुरु केला आहे. खालील लिंकवर जाऊन तुम्हीही याविषयी तुमचे मत जरूर नोंदवा जेणे करून समाजामध्ये एकविसाव्या शतकात मासिक पाळीशी निगडित काय मते आहेत हे जाणून घेणे सोपे जाईल व सर्व्हेचा अभ्यास करून स्त्रियांसाठी काही चांगली उत्पादने तयार केली जातील जी त्यांना मासिक पाळीच्या काळात पर्सनल हायजिन जपण्यासाठी फायदेशीर ठरतील.