डोक्यावरील केस ही महिलांच्या सौंदर्यात भर घालते असा समज असल्यामुळेच जर एखाद्या महिलेला कमी केस असले की, आपण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहात राहतो. डोक्यावर असलेले कमी केस खूप महिलांमधील आत्मविश्वास कमी करतात. पण मुळात केस कमी असणे आणि अचानक केस गळू लागणे यामध्ये फरक आहे. अचानक काही जणांना ज्यावेळी टक्कल पडू लागते. त्यावेळी अशा महिला कोषात जाऊ लागतात. अचानक केस गळणे हा देखील एक गंभीर आजार आहे. तुमचे केस रोजच्या तुलनेत पुंजक्या पुंजक्याने गळत असेल तर तुम्हाला केसांशी निगडीत ॲलोपेशिया (Alopecia) नावाचा आजार असण्याची शक्यता असू शकते. केशांशी निगडीत हा आजार नेमका आहे तरी काय ते जाणून घेऊया
ॲलोपेशिया (Alopecia) म्हणजे काय रे भाऊ
काहीच दिवसांपूर्वी विल स्मिथने ऑस्कर सोहळ्यात सूत्रसंचालक क्रिसच्या कानाखाली मारली. आपल्या बायकोच्या केसांच्या कंडिशनवरुन तो चुकीचे बोलला यामुळे त्याने ही कानशिलात लगावली होती. विल स्मिथच्या बायकोला ॲलोपेशिया (Alopecia) नावाचा आजार आहे. ज्याची मस्करी केल्यामुळे तो चिडला. त्या दिवसानंतर पुन्हा एकदा हा आजार नेमका काय? या विषयी चर्चा सुरु झाली. आता हा आजार पडद्यावरही दाखवला गेला आहे. हा केसांशी निगडीत असा आजार असून 30 वर्षांच्या आत असलेल्या महिलांना हा आजार होऊ शकतो. यामध्ये महिलांचे केस अचानक मोठ्या प्रमाणात गळू लागतात. काहीही केले तरी केसांची ही गळती थांबवता येत नाही. यामध्ये महिलांना पुरुषांप्रमाणे गुळगुळीत टक्कल पडते.
ॲलोपेशिया (Alopecia) होण्याची कारणे
केसांशी निगडीत असा हा आजार होतो तरी कसा? असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. कारण खूप जणांना या आजाराची भीती वाटू शकते. हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होतो. आजारांपासून रक्षण करण्यासाठी आपल्याकडे असलेली रोगप्रतिकारशक्ती त्याला चांगला लढा देत असते. ही प्रतिकारशक्ती कमी झाली की, त्याचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर आणि आरोग्यावर होऊ लागतो. प्रतिकारशक्ती खूपच जास्त कमी झाली की, त्याचा परिणाम हा केसांच्या मुळांवर होतो. केस हे खूप जास्त कमजोर पडू लागतात. त्यामुळे अचानक केसांची गळती मोठ्याप्रमाणात होण्यास सुरुवात होते. हे असे मोठ्याप्रमाणात केस गळणे याचा अर्थ तुम्हाला ॲलोपेशिया (Alopecia) हा आजार झाला आहे. पण याला घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण तुम्ही योग्य वेळी योग्य इलाज केल तर तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही.
काय घ्यावी काळजी ?
केस गळू लागल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास जाणे अगदी स्वाभाविक आहे. कारण खूप जणांचे केस हे त्यांची ओळख असते. केस गेल्यानंतर किंवा तुम्हाला असा आजार झाल्यानंतर काय करता येईल हे देखील माहीत हवे. असा त्रास कोणालाही झाला तर त्याचा आत्मविश्वार वाढेल याची काळजी घ्या. हा आजार मुळापासून नष्ट होत नाही. पण केसांची होणारी गळती ही कमी करता येते. योग्य गोळ्या आणि औषधे खाऊन तुम्हाला त्यातून थोडासा दिलासा मिळू शकतो.
अचानक केस गळती होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. योग्य वेळी तुम्ही योग्य सल्ला घ्या.