मासिक पाळीवर संवाद साधणारा बाप, वडील - मुलीचे नाते अधिक घट्ट

मासिक पाळीवर संवाद साधणारा बाप, वडील - मुलीचे नाते अधिक घट्ट

वडील आणि मुलगी हे मुळातच अनोखं नातं असतं. मुलगी साहजिकच आपल्या वडिलांची लाडकी असते. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे सुपरहिरो असतात आणि का नसावेत? एक आदर्श व्यक्ती म्हणून प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांकडे पाहात असते. ‘पहिली मुलगी धनाची पेटी’ अशा म्हणी आपण नेहमीच ऐकतो आणि अगदी बऱ्याच घरांमध्ये याचा प्रत्यय आलेलाही आपल्याला पाहायला मिळतो. मुलगी शिकल्यावर प्रगती तर होतेच. पण त्याचबरोबर मुलीच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये वडिलांचा सहभाग असतो आणि वडील हक्काने त्यामध्ये सहभागी होत असतात. मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘मासिक पाळी’. हा असा विषय आहे जो कित्येक घरामध्ये वडिलांसह बोललाही जात नाही आणि बऱ्याचदा वडिलांपासून लपवला जातो. बऱ्याचदा लाजेने किंवा वडिलांशी कसं बोलू असंही बऱ्याचशा मुलींचा स्वभाव असतो अथवा त्यांच्या घरातील वातावरण असतं. पण सोनी मराठीवरील ‘ह.म. बने तु.म. बने’ या मालिकेने हा विषय घेत नेहमीचा मालिकेचा साचा मोडला आहे. वडील आणि मुलीच्या नात्यामधील बंध अधिक घट्ट करण्यासाठी हा खास विषय मालिकेमध्ये हाताळण्यात आलेला आहे. मासिक पाळी हा महत्त्वाचा विषय असून त्यावर न लाजता व्यक्त व्हायला हवं आणि वडिलांनीदेखील तो योग्य तऱ्हेने हाताळायला हवा असा महत्त्वपूर्ण संदेशच या मालिकेतून देण्यात आला आहे.


cf3be825-f9c2-445a-930c-88b2e1fb6f15 %281%29
रेहाला वडिलांचा आधार


फार कमी कालावधीमध्ये ‘ह.म. बने तु.म. बने’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले आहे. कुटुंबामध्ये बरेच विषय असतात आणि ते कशाप्रकारे हाताळायला हवेत या मालिकेतून चांगल्या तऱ्हेने दाखवले जात असल्यामुळेच या मालिकेला पसंती मिळत आहे. सध्या ‘ह.म. बने तु.म. बने’ या मालिकेमध्ये रेहाला पहिली मासिक पाळी सुरु झाली आहे आणि तिची आई - काकू आणि आजी घरात नसल्यामुळे नक्की या परिस्थितीत काय करावं ते तिला सुचत नाही. अशावेळी तिला तिच्या वडिलांचा आधार मिळतो आणि हेच सर्वात महत्त्वाचं आहे. या मालिकेतून वडील आणि मुलगी यांच्या नात्यातील एक बंध, त्यांचे प्रेम तर व्यक्त होणारच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अशा नाजूक परिस्थितीमध्ये कशा तऱ्हेने मुलीचं मन जपायचं हे वडिलांनाही कळणार आहे. मासिक पाळी हा अतिशय नाजूक विषय असून तो योग्य तऱ्हेने हाताळायला लागतो. कारण मुलीचं वयदेखील तितकं लहान असतं. तिच्या मनाला समजून घेणं अतिशय गरजेचं असतं.


मासिक पाळीवर जागरूकता


आईनंतर मुलीला जर जास्त कोणी समजून घेत असेल तर ते वडील असतात. हाच विचार लक्षात घेऊन ‘ह.म. बने तु.म. बने’ या मालिकेमध्ये हा विचार मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या विषयावर हलक्या-फुलक्या पद्धतीने भाष्य करून आणि याविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचं वाहिनीकडून सांगण्यात आलं आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये नेहमीच काहीतरी वेगळं करण्यात येतं आणि अशा जीवनाशी निगडीत विषयावर भाष्य सहजरित्या करण्यात आल्यामुळे साहजिकच प्रेक्षक पटकन मालिकेशी जोडला जातो. शिवाय जनजागृतीदेखील होते. असे विषय फार कमी हाताळले जातात. मात्र अशा तऱ्हेचे विषय हाताळणे गरजेचे आहे. ‘ह.म. बने तु.म. बने’ या मालिकेचे कौतुक करावे तितकं थोडं आहे. त्यामुळे आता या मालिकेकडून अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.