बऱ्याचदा आपण पाहिलं आहे की, कार अथवा बसने प्रवास करताना बऱ्याच लोकांची तब्बेत खराब होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्या लोकांनाही त्रास सहन करावा लागतो. प्रवास करताना वाटणारी भीती, बेचैनी, चक्कर येणं आणि उलट्या होणं या सर्व गोष्टींना मोशन सिकनेस असं म्हटलं जातं. ही समस्या अनुवंशिक असते. तुमच्या आईवडिलांना जर मोशन सिकनेस असेल तर तुम्हालाही मोशन सिकनेस असण्याची शक्यता वाढते. वास्तविक हे का होतं हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. तर आपला मेंदू वेग, इमेज आणि आवाज या तिन्ही गोष्टींचा ताळमेळ नीट बसवू शकत नाही. या सगळ्याचा परिणाम शरीरावर अर्थात भीती निर्माण होणं, चक्कर येणं आणि उलटी होणं अशा प्रकारे होतो. बस अथवा कार जास्त वरखाली होत असेल अथवा सतत थांबत थांबत धक्के देत जात असेल तर त्याचा प्रभाव अधिक वाढतो. खाण्यापिण्याचं सामान अथवा त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलचा वास यामुळे मोशन सिकनेस अधिक वाढतो. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल आणि त्याचा त्रास होत असेल शिवाय तुमच्या आजूबाजूच्यांनाही तुमच्यामुळे त्रास होत असेल तर या 5 टिप्स नक्की तुम्ही ट्राय करा.
1 – रिकाम्या पोटी प्रवास करू नका
जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही रिकाम्या पोटी प्रवास केलात तर तुम्हाला उलटी होणार नाही. तर असं अजिबात नाही. तुम्ही नक्कीच चुकीचा विचार करत आहात. कारण रिकाम्या पोटी डोकं अजून गरगरतं आणि मोशन सिकनेसदेखील जास्त असतो. त्यामुळे तुम्ही नेहमी प्रवासाला निघताना काही ना काहीतरी खाणं आवश्यक आहे. पण हे लक्षात ठेवा की, प्रवासाला निघताना तळलेल्या पदार्थांचं सेवन करू नका. अशावेळी थंड ज्यूस अथवा गारेगार फळांचा आस्वाद घेणं तुमच्यासाठी केव्हाही चांगलं. ज्यूस अथवा फळं पोटामध्ये थंडावा निर्माण करतात, त्यामुळे प्रवासामध्ये तुम्हाला उलटी होत नाही आणि तुम्हाला खाणं फायदेशीर ठरतं.
2 – गाडीमध्ये शेवटच्या सीटवर बसू नका
तुम्ही जर मोशन सिकनेसने बेजार असाल तर हे नेहमी लक्षात ठेवा की, प्रवासामध्ये गाडी ज्या दिशेला जात आहे त्याच्या विरूद्ध दिशेला तोंड करून अथाव शेवटच्या सीटवर कधीही बसू नका. नेहमी मध्यभागी अथवा पहिल्या सीटवर बसा. त्यातही जर शक्य असेल तर खिडकीजवळ बसा. कारण येणाऱ्या हवेमुळे तुम्हाला बरं वाटेल आणि उलटीचा त्रास होणार नाही. शिवाय गाडीला बसणारे धक्के वारंवार जाणवणार नाहीत.
3 – स्वतःजवळ नेहमी आल्याचा तुकडा ठेवा
प्रवास करत असताना नेहमी तुमच्याजवळ आल्याचा छोटा तुकडा ठेवा. तुम्हाला भीती वाटायला लागल्यावर थोडं थोडं आलं खात राहा. यामुळे मोशन सिकनेस कमी होतो. वास्तविक आल्यामध्ये अँटीएमेटिक गुण असतात जे उलटी होण्यापासून आणि चक्कर येण्यापासून वाचवतात. प्रवास करण्यापूर्वी तुम्ही आल्याचा चहा पिऊन निघाल्यास जास्त फायदेशीर ठरतं.
4 – गाणी ऐका
गाण्यामध्ये प्रचंड ताकद असते. गाणी तुम्हाला एका वेगळ्याच जगामध्ये घेऊन जातात. तुम्हाला जर गाणी ऐकणं आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यांचं कलेक्शन मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि प्रवासादरम्यान तुम्हाला तुमची तब्बेत बिघडत आहे असं वाटेल तेव्हा डोळे बंद करून ही गाणी ऐका. विश्वास ठेवा हा उपाय सर्वात चांगला आणि फायदेशीर आहे. त्याशिवाय तुमची आवडती गाणी ऐकल्यामुळे तुम्हाला अधिक चांगलं वाटतं.
5 – लिंबू आहे फायदेशीर
प्रवासामध्ये कसल्याही वासाने जीव घाबराघुबरा होतो. अशावेळी लिंबाने नक्कीच आराम मिळतो. वास्तविक लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असतं जे गॅस, बद्धकोष्ठ आणि उलटी या सगळ्यापासून सुटका मिळवून देतं. तुम्हाला प्रवास करताना उलटी आल्यासारखं होत असेल तर त्वरीत लिंबू पाणी वा लेमन सोडा प्या त्यामुळे तुम्हाला लगेचच आराम मिळतो.
#कामाची गोष्ट
तुम्ही जर लांबचा प्रवास करत असाल आणि तुम्हाला मोशन सिकनेसचा जास्त त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधंसुद्धा जवळ ठेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्हाला अगदीच स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर एकदा तुम्ही उलटी करा. त्यामुळे तुम्हालाही हलकं वाटेल. त्यानंतर तुम्ही चूळ भरून तोंडामध्ये वेलची अथवा आल्याचा तुकडा ठेऊन द्या आणि थोडा वेळ झोपा. यामुळे तुम्हाला नक्कीच बरं वाटेल.
हेदेखील वाचा
पंच प्रवीण तरडे करणार ‘सूर सपाटा’चा निवाडा
पुन्हा एकदा माधुरी दीक्षित आणि संजय दत्त एकत्र
प्रियांकाचा पायगुण, नीक जोनासला मिळाली खुशखबर