इमरान खान आणि अवंतिका मलिकच्या नात्यात दुरावा

इमरान खान आणि अवंतिका मलिकच्या नात्यात दुरावा

बॉलीवूडमध्ये आपल्या पहिल्याच चित्रपट ‘जाने तू या जाने ना’ मधून दणक्यात पदार्पण करणारा इमराम खान फिल्मी दुनियेपासून दूरच आहे. पण आता इमरानच्या खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. इमरान खान आणि अवंतिका मलिका यांच्या नात्यात दुरावा आला असून दोघेही वेगळे राहात असल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्रानं सांगितलं आहे. अवंतिका आणि इमरान यांच्या नात्यात दुरावा आला असून अवंतिकाने इमरान खानचं मुंबईतील पाली हिलमधील घर सोडलं आहे. आपली मुलगी इमाराला घेऊन अवंतिका आपल्या आईवडिलांकडे निघून गेल्याचं वृत्त आहे.


नक्की काय बिघडलं?


अवंतिकाने इमरानचं घर सोडलं असून ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे. पण दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं आहे याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. तसंच हा वाद काही काळापुरताच आहे की, या वादामुळे दोघं वेगळे होण्याचा निर्णय घेत आहेत का? याबद्दलही अजून कोणताही खुलासा झालेला नाही. यासंदर्भात इमरानशी संपर्क साधला असता त्याने कोणताही रिप्लाय दिलेला नाही असंही या इंग्रजी वृत्तपत्राने सांगितलं आहे. दरम्यान अवंतिका मलिकशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.


imran FI


इमरान आणि अवंतिका गेले 16 वर्ष एकत्र


इमरान खान आणि अवंतिका मलिक हे गेल्या 16 वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून त्याचं प्रेम नेहमीच चर्चेच राहिलं होतं. आधी 8 वर्ष हे दोघेही नात्यात होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नालाही आता 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2011 मध्ये कुटुंब आणि काही जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केलं. त्यानंतर देण्यात आलेल्या रिसेप्शनमध्ये बॉलीवूडमधील बऱ्याच प्रसिद्ध व्यक्ती आल्या होत्या. या दोघांनी एक मुलगी असून तिचं नाव इमारा आहे. इमारा सध्या 5 वर्षांची आहे. इमरान, अवंतिका आणि इमाराबरोबर नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असतो. त्यामुळे अशा तऱ्हेची बातमी समोर आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. इमरान खान नेहमीच आपलं नातं जपत आला असल्यामुळे या बातमीने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. दरम्यान अवंतिकाने आपल्या इन्स्टाग्रामवरून अवंतिका मलिक खान या नावातील खान हे आडनाव काढून टाकलं आहे.


imran with imara


इमरानचं करिअर घडलं नाही


इमरानने बॉलीवूडमध्ये दणक्यात प्रवेश केला. त्याचा ‘जाने तू जाने ना’ हा जेनेलिया डिसुझाबरोबरचा चित्रपट तुफान चालला. पण त्यानंतर त्याला जास्त चित्रपट मिळाले नाहीत. ‘दिल्ली बेली’ आणि कंगना रणौतबरोबरचा ‘कट्टी बट्टी’ सोडल्यास, इमरानचं करिअर बॉलीवूडमध्ये घडलं नाही. त्यामुळेच अवंतिका आणि इमरानमध्ये काही बिघडलं नाही ना अशी आता चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र सध्या त्यांचं कुटुंब त्यांच्याशी बोलून त्यांच्यामधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं जात आहे. बॉलीवूडमधील चर्चित जोडीपैकी ही जोडी असल्यामुळे या दोघांनी वेगळं होऊ नये असं नक्कीच त्यांच्या चाहत्यांनाही वाटत आहे. तर सध्या इमरान नक्की काय करतो याची कोणालाच कल्पना नाही. केवळ आमिर खानचा भाचा हीच त्याची ओळख राहिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इमरान त्याच्या आईचं आडनाव लावतो. त्याच्या आईवडिलांचाही इमरान लहान असताच घटस्फोट झाला आहे. त्यानंतर त्याच्या आईनेच त्याचा सांभाळ केला.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


घटस्फोटाची बातमी दिल्याबद्दल प्रियांका आणि निक करणार मासिकाविरूद्ध कारवाई


रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या पुन्हा अडकणार लग्नबेडीत


हो...आम्ही आता वेगळे झालोय