देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी आता जवळ आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा काळ खूप खास असतो कारण याच काळात हजारो वारकरी मनात विठूमाऊलीच्या दर्शनाचा ध्यास घेऊन आणि तोंडी माउलींच्या नावाचा गजर करत उन्हातान्हाची, कोसळणाऱ्या पावसाची, वाटेतील काट्याकुट्यांची पर्वा न करता वारीला जातात.वारी ही आपली प्राचीन सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आहे. वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे. संतपरंपरेच्या बाबतीत महाराष्ट्र फारच नशीबवान आहे कारण या मराठी मातीत सर्व जातीपातीच्या भोळ्याभाबड्या भक्तांना आईच्या मायेने बोट धरून भक्तिमार्गावर आणणारे अनेक थोर संत होऊन गेले. या संतांनी समाजाला फक्त योग्य शिकवणच दिली नाही तर भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात उंचावली. भागवत धर्माच्या झेंड्याखाली त्यांनी सर्व समाजाला एकत्र आणले व जनजागृती केली. त्यांनी निर्माण केलेले संतवाङ्मय म्हणजे खूप अनमोल खजिना आहे. याच संतांच्या मांदियाळीतील एक म्हणजे संत कान्होपात्रा होत. संत कान्होपात्रांची ‘नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे’ ही रचना सर्वश्रुतच आहे. या अभंगात संत कान्होपात्रांनी विठूमाऊलीला कळवळून हाक मारली आहे. संत कान्होपात्रांचे चरित्र अनेकांना ठाऊक आहे. पण ज्यांनी ते वाचलेले किंवा ऐकलेले नाही त्यांना आता जाणून घेता येणार आहे.
ज्ञानेश्वर माउली मालिकेत दाखवण्यात येणार संत कान्होपात्रा यांचे चरित्र
सध्या सोनी मराठी या वाहिनीवर प्रसारित होणारी ‘ज्ञानेश्वर माउली’ ही मालिका घराघरांत बघितली जाते. या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात न्हाऊ घातले आहे. महाराष्ट्राची थोर संतपरंपरा या मालिकेत दाखण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वरांचे चरित्र उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ज्ञानेश्वर माउली व त्यांच्या भावंडांनी किती हालअपेष्टा सोसल्या, त्यांना साक्षात्कार कसा झाला, माउलींनी ज्ञानेश्वरी कशी रचली, रेड्याच्या मुखातून वेद कसे वदवून घेतले, विश्वरूप दर्शन, पसायदानाची रचना, माउली व त्यांच्या भावंडांचे चमत्कार हे सगळे या मालिकेत दाखवले जात आहेत. हे सगळे बघण्यास प्रेक्षक अगदी इमानेइतबारे टीव्हीसमोर बसतात आणि माउलींनी दिलेले ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात. माउली व त्यांच्या भावंडांच्या विठ्ठलभक्तीच्या या प्रवासात प्रेक्षक देखील साक्षीदार झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर व ते पात्र साकारणाऱ्या अभिनेत्यांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आता आषाढी वारीच्या निमित्ताने या मालिकेतून विविध थोर संतांची मांदियाळी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संतपरंपरेची होणार प्रेक्षकांना माहिती
आषाढी वारीच्या निमित्ताने या मालिकेत संतांचा चरित्रपरिचय करून दिला जाणार आहे. याची सुरुवात संत कान्होपात्रांच्या चरित्रापासून केली जाणार आहे. आता मालिकेत संत कान्होपात्रा यांचा प्रवेश होणार आहे. संत कान्होपात्रा यांची भूमिका साकारण्याची संधी अभिनेत्री तितिक्षा तावडेला मिळाली आहे.
यापूर्वी देखील तितिक्षाने सरस्वती आणि असे हे कन्यादान अशा मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता या मालिकेत तितिक्षा अगदी वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एक साधीशी साडी, हातात चिपळ्या व वीणा अशा साध्या सोज्वळ रूपात तितिक्षा दिसणार आहे. अशा प्रकारची आध्यात्मिक भूमिका साकारण्याची तितिक्षाची ही पहिलीच वेळ असल्याने या भूमिकेसाठी तितिक्षाने खूप मेहनत घेतली आहे. संत कान्होपात्रा व संत ज्ञानेश्वर हे दोघेही विठुरायाचे निस्सीम भक्त! या दोघांची प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा काय चमत्कार घडेल हे बघण्याची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक