‘इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता, ज्यादा प्यार हो जाता, तो दिल सह नहीं पाता’ हे गाणं सध्या बरंच गाजतं आहे. अगदी नेहा कक्करनेदेखील आपलं ब्रेकअप झाल्यानंतर याच गाण्याचा आधार घेतला होता. तिने हे गाणं अर्थातच तिचा एक्स बॉयफ्रेंड हिमांशला उद्देशून गायलं होतं, हे सर्वांनाच कळलं आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी एका गाण्याच्या शो मध्ये आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. पण अचानक दोघांचं ब्रेकअप झाल्याचं नेहाने सोशल मीडियावर सांगितलं. अनेकदा काहींचं ब्रेकअप स्टेटस पाहूनही आपल्याला चुकचुकल्यासारखं होतं. खरं तर नेहमी आपण एकमेकांच्या प्रेमात असलेल्या व्यक्तींना अचानक वेगळं होताना पाहतो तेव्हा आपल्याही प्रश्न पडतो की, अरे इतकी प्रेमात असणारी माणसं अचानक ब्रेकअप का करतात? असं काय घडतं की लोक वेगळे होतात, ब्रेकअप करतात. हा प्रश्न जितका त्यांना सतावणारा असतो त्यापेक्षा जास्त त्यांच्या चाहत्यांना आणि अगदी सामान्य माणसांमध्ये त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना जास्त सतावत असतो.
खरंतर ब्रेकअप होण्याची अनेक कारणं असतात. अनेक ठिकाणी या गोष्टींचा अभ्यासही करण्यात आला आहे. स्टँडफोर्ट सोशिओलॉजिस्ट मायकल रोजेनफेल्डने आपल्या अभ्यासातून सांगितलं आहे की, कोणत्याही नात्याला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नातं तुटण्याची शक्यता केवळ 20 टक्के राहते. मात्र अशाही काही जोड्या असतात ज्या पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतरदेखील आपलं नातं तोडतात अर्थात ब्रेकअप करतात. पण हेदेखील तितकंच खरं आहे की, पहिल्या दोन वर्षांंमध्ये ब्रेकअप होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
वाचा – प्रेमात त्याने / तिने ‘गृहीत’ धरणं कितपत योग्य
प्रेमात पडणं असतं सोपं
पहिल्याच नजरेत प्रेम होणं, सतत बघून बघून प्रेम होणं हे सर्व शब्द अगदीच पुस्तकी वाटतात ना…पण असं बऱ्याच जणांच्या आयुष्यात होत असतं. प्रेमामुळे आपल्या भावना जागृत होतात आणि आपल्या शरीरातही हार्मोनल बदल होतात. कोणतीही व्यक्ती आपल्याला आवडायला लागल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीबरोबर जास्त राहावं वाटतं. त्या व्यक्तीला निदान दिवसातून एकदा तरी पाहावं अशी भावना असते. वास्तविक प्रेमात पडणं सोपं असतं.
प्रेम निभावणं अत्यंत कठीण
जितकं सोपं आहे प्रेमात पडणं तितकंच प्रेम निभावणं कठीण आहे. प्रेमाचं नातं हे अतिशय नाजूक असतं. एकमेकांसाठी नेहमी तयार राहणं, एकमेकांच्या भावना समजून घेणं, दुःखाच्या वेळेला एकत्र आणि खंबीरपणे उभं राहणं आणि आर्थिक गोष्टींमध्येही व्यवस्थित पाठिंबा देणं हे सर्व करणं अजिबात सोपं नाही. हे अतिशय कठीण काम आहे. खरं तर आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण पुढे जात आहोत आणि नाती मागे राहून जात आहेत. यामुळेच सध्या ब्रेकअप जास्त प्रमाणात वाढले आहेत. एकमेकांना पुरेसा वेळ न दिल्यामुळे ब्रेकअपचं प्रमाण वाढू लागलंय. अशामध्ये तुम्हाला पैसा आणि इतर गोष्टी तर सहज मिळतात पण प्रेम करायला आणि ते निभावायला कोणाकडे सध्या वेळ नसतो. प्रेम हवं असतं पण ते निभावायची ताकद नसते. ब्रेकअप हे खरंतर अतीव दुःख देणारी भावना आहे. ब्रेकअपमुळे बऱ्याचदा मानसिक आजारालाही बऱ्याच जणांना सामोरं जावं लागतं. नेहमी हसतमुख असणाऱ्या व्यक्तीदेखील यामुळे प्रचंड उदास आणि मानसिक तणावाखाली येतात.
ब्रेकअप होण्याचे नक्की कारण
ब्रेकअप होण्याची एकच नाही तर अनेक कारणं आहेत. यापैकी काही कारणं आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत.
पहिलं वर्ष हे आव्हानाचं
नात्याचं पहिलं वर्ष हे बऱ्याच आव्हानांचं असतं. या दरम्यान ब्रेकअप होण्याची शक्यता जास्त असते. वास्तविक पहिलं वर्ष हे एकमेकांसाठी तडजोड करण्यात जातं. कोणत्याही नात्याचे पहिल्या वर्षात साधारणतः तीन भाग असतात असं म्हणावं लागेल – त्यापैकी एक भाग प्रोजेक्शन, अपेक्षाभंग आणि संघर्ष. सुरुवातीला तुम्ही या सर्व गोष्टी खऱ्या स्वरूपात पाहू शकत नाही. तुम्हाला तुमचा पार्टनर जसा तुमच्या नजरेतून बघायचा असतो त्याचप्रमाणे तुम्ही बघता. त्यानंतर काही महिन्यांनंतर तुम्हाला सर्व काही वेगळं जाणवायला लागतं. खरे रंग दिसायला लागतात आणि मग तुमचा अपेक्षा भंग होतो. हेदेखील ब्रेकअपचं कारण ठरू शकतं. प्रेमाचा रंग उतरल्यानंतर खरा चेहरा दिसायला लागतो आणि अपेक्षाभंग होतो. त्यानंतर सुरु होतो तो संघर्ष. तुम्ही या सर्वातून तावूनसुलाखून निघाल्यानंतर टिकतं ते तुमचं नातं. या सगळ्यातून तडजोड करत एकमेकांना समजून घेत जेव्हा तुम्ही एकमेकांसाठी जगता तेव्हाच तुमचं प्रेम सफल होऊ शकतं.
खास वेळी तुटतात नाती
तुम्हाला माहीत आहे का ख्रिसमस आणि व्हॅलेंटाईन डे अशा खास दिवशी बरेचसे ब्रेकअप होत असतात. एका अभ्यासातून ही गोष्टी सिद्ध झाली आहे. अशा दिवशी आपल्या पार्टनरकडून जास्त अपेक्षा असते आणि त्याचवेळी अपेक्षाभंग होत असतो. त्यामुळे दुसरी व्यक्ती अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि ब्रेकअप होण्याची शक्यता जास्त असते.
वाचा – Valentines Day: नातं प्रेमाचं
खरा चेहरा दिसू लागतो
प्रेमात असताना सर्व काही छान असतं. त्यामुळे एक वर्षानंतर खरा चेहरा समोर यायला लागतो. मग एकमेकांमधील दोषही दिसू लागतात. तुम्हाला एका वर्षात तुमच्या पार्टनरचा स्वभाव नीट माहीत नसतो. पण एक वर्षात तुम्ही इतका वेळ एकत्र घालवल्यानंतर खरा चेहरा आणि खरा स्वभाव तुमच्या लक्षात यायला लागतो. त्यामुळे तुम्हाला वाटायला लागतं की, समोरची व्यक्ती ती नाही ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं. तुमच्यामधील या गोष्टींवरून वाद वाढायला लागतात. त्यामुळे अशा वादाचं रूपांतर हे ब्रेकअपमध्ये होतं.
वेगळा विचार
बऱ्याचदा नात्यात आल्यानंतर व्यक्तीला जाणवतं की, त्यांचे विचार हे एकमेकांशी जुळतच नाही. त्याचे विचार एकदम भिन्न असतात. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही अतिशय वेगळा असतो. त्यामुळे एकमेकांमध्ये खटके उडण्याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचदा असं असूनही बरेच लोक प्रेमामुळे एकत्र राहतात पण अगदीच भिन्न विचार असल्यास, तुम्हाला एकत्र राहणं शक्य नसतं आणि त्यांचं ब्रेकअप होतं.
समानतेची भावना नसणं
असं बऱ्याचदा होतं की, नात्यामध्ये समानतेची भावना नसते. अर्थात सांगण्याचं तात्पर्य असं की, एक पार्टनर नेहमीच दुसऱ्यावर दादागिरी गाजवत असतो. त्यामुळे त्याच्या दबावाखाली राहणं दुसऱ्याला काही काळानंतर असह्य होतं. अशा परिस्थितीत नात्यामधील प्रेम संपतं आणि मग दूर जाणं एखाद्याला योग्य वाटतं. ब्रेकअपच्या बऱ्याच कारणांपैकी हेदेखील एक महत्त्वाचं आणि योग्य कारण आहे.
जबाबदारीची जाणीव नसणं
पहिल्यांदा नात्यामध्ये सर्व काही चांगलं वाटत असतं. एकमेकांची काळजी घेणं आणि जबाबदारी घेणं हादेखील त्यातलाच एक भाग. नातं जसजं जुनं होत जातं, तशी एकमेकांबद्दल अपेक्षाही वाढते आणि जबाबदारीदेखील. असं असताना जर एक जोडीदार आपली जबाबदारी नीट निभावत नसेल तर समोरच्याला या गोष्टीचा नक्कीच त्रास होतो. हा त्रास नंतर भांडणात रूपांतरित होतो आणि मग वाद वाढत जातात आणि नात्यातील प्रेम संपून ब्रेकअप होतो. त्यामुळे एकमेकांवर प्रेम असेल तर जबाबदारीची जाणीव ही असायलाच हवी.
प्रेमातील पॅशन संपणं
एक वर्ष झाल्यानंतर नव्या नात्यातील उत्साह कमी व्हायला लागतो. दोन्ही जोडीदार अगदी रिलॅक्स होतात आणि आता आपल्याला समोरचा माणूस कधीच सोडून जाणार नाही असं त्यांना वाटू लागतं. सुरुवातीला नात्यात असणारी मस्करी आणि एकमेकांना मजेशीर आव्हान देणं हे सर्व हळूहळू कमी होतं. खरंतर इथेच मोठी चूक होते. नातं कितीही जुनं असो त्यातील रोमँटिकपणा आणि उत्साह जपून ठेवणं गरजेचं असतं. प्रेमातील पॅशन संपून सेक्स करणंही कमी होत आणि त्यामुळे भाडंणं अजून वाढतात आणि यातूनच सुरु होते दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रेम आणि काळजी शोधण्याची भावना. हे समजून घ्यायला जोडीदार कमी पडत असेल तर त्याला या गोष्टी स्पष्टपणे सांगायला हव्यात.
बोलणं कमी होणं
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतकं थकायला होतं की, तुमचा जोडीदार भेटल्यानंतरही तुम्ही तुमच्याच काळजी आणि चिंतेमध्ये अडकून पडता. दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी राहात असतील तर एकमेकांशी कमी बोलणं होणं हे साहजिकच आहे. एकमेकांशी कमी बोलणं हे ब्रेकअपचं कारण असतं.
वाचा – १० गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी
विश्वासघात
एका प्रेमाच्या नात्यात पारदर्शकता असणं खूपच गरजेचं आहे. ही पारदर्शकता नात्यामध्ये विश्वास आणि प्रामाणिकता आणते. मात्र जेव्हा हा विश्वास काही कारणाने संपतो तेव्हा त्याचं रूपांतर अर्थातच ब्रेकअपमध्ये होणं साहजिक आहे. अशा धावपळीच्या जीवनात आपल्या जोडीदाराऐवजी दुसऱ्या कोणाही व्यक्तीकडे बऱ्याचदा काही व्यक्ती आकर्षित होत असतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराचा विश्वासघात करता का हे तुम्ही स्वतःला विचारायला हवं आणि त्यापासून स्वतःला आवरायला हवं. कारण विश्वासघातासारखं दुसरं वाईट कारण ब्रेकअपच असून शकत नाही.
रिटर्नसची अपेक्षा
लाईफ कोच काली रोजर्सच्या अभ्यासानुसार, बऱ्याचदा मुलींना आपल्या नात्यात इमोशनल रिटर्न हवा असतो. कोणत्याही नात्यात सहा महिने झाल्यानंतर ते नातं मुलींना टिकवून ठेवायचं असतं. कारण या नात्यामध्ये त्यांनी आपलं तन, मन आणि धन या सगळ्या गोष्टी समर्पित केलेल्या असतात. जेव्हा त्यांना काळजी आणि प्रेम नात्यामध्ये मिळत नाहीये याची जाणीव होते तेव्हा मुली दुःखी होतात आणि मग हे ब्रेकअपचं कारण ठरतं.
पहिलं इम्प्रेशन तसंच राहत नाही
आपण एकमेकांना आपण कसे आहोत हे दाखवतो तेव्हाच नातं बनायला सुरूवात होते. पण जास्त काळ आपण कोणताही देखावा करू शकत नाही. तुमचं खरं रूप किंवा स्वभाव हा कधीना कधीतरी कळणार असतोच. पहिलं इम्प्रेशन हे नेहमी तसंच राहत नाही. त्यामध्ये बदल होत जातो आणि माणसाचा खरा स्वभाव समोर येतो. त्यानंतर बऱ्याचदा आपण चूक केली हे जाणवायला लागतं आणि त्यामुळे ब्रेकअपचं कारण ठरतं.
पहिल्यापासून विचार करणं
काही लोक एखाद्या नात्यात काही काळच राहू शकतो असा आधीपासूनच विचार करत असतात. कोणत्याही नात्यात अधिक अटॅच राहणं त्यांना आवडतं असं नाही. पण कोणतंही नातं निभवायचं असेल तर ही सर्वात मोठी चूक आहे. असा बेस असेल तर कधीही नातं टिकत नाही आणि लवकर ब्रेकअप होतं.
सेक्सची कमतरता
दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांवर मनापासून प्रेम करतात तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतीही भिंत नक्कीच आडवी येत नाही. सुरुवातीला नात्यामध्ये दोन्ही जोडीदारांमध्ये सेक्ससाठी उत्सुकता असते. पण काही वर्षांनंतर ही उत्सुकता कमी व्हायला लागते. उत्साह कमी होतो. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा यायला लागतो. शिवाय कामाचा अतिताण असल्यामुळे दमायला होतं आणि त्याचादेखील सेक्स करण्यावर परिणाम होत असतो. सध्या टेक्नोसॅव्ही युगात सतत दोन्ही लोक मोबाईलवर व्यस्त राहतात आणि एकमेकांबरोबर वेळ घालवण्यापेक्षा त्यांना मोबाईल जास्त महत्त्वाचा वाटत असतो. त्यामुळेदेखील सेक्सवर परिणाम होत असून एखादा पार्टनर आपल्या सुंदर आणि काळजी करणाऱ्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करत राहतो आणि सेक्सची मजाही घेऊ शकत नाही. त्यामुळे वाद वाढतात आणि सेक्स हेदेखील ब्रेकअपच्या कारणांपैकी एक कारण आहे.
ब्रेकअपचं दुःख कसं सांभाळायचं – How to Manage breakup Pain
ब्रेकअप हा आयुष्यातला सर्वात कठीण काळ असतो. बऱ्याच जणांना यातून बाहेर येणं खूपच कठीण होऊन बसतं. यातून बाहेर येण्यासाठी बरीच वर्षही लागतात. आयुष्य काही कामाचं नाही आणि सगळं जग मतलबी असल्यासारखं वाटायला लागतं. पण यातून बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्ही योग्य प्रकारे श्वास घेऊ शकाल. चित्रपट- “ऐ दिल है मुश्किल” मधील मेरे सैंया जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया… अशा गाण्यावर अर्थातच तुम्ही डान्स नाही करू शकणार पण, स्वतःला समजवण्याचा आणि यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करायला हवा अन्यथा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊन स्वतःचं बरंवाईट नक्की करू शकता.
दोघांच्याही गोष्टी समजून घ्याव्या
केवळ आपण म्हणतो तीच पूर्व दिशा आणि आपल्याच सगळ्या गोष्टी बरोबर आहेत आणि आपल्या एक्सच्या चुका शोधत राहणं हे सर्व अतिशय सोपं आहे. पण तुम्ही समोरच्या माणसाचं मन आणि बाजू जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे. तुम्ही जे बघत आहात आणि जाणून घेत आहात ते कदाचित चुकीचंही असू शकेल. तुमच्या जोडीदाराची एक बाजू असेल आणि ती कदाचित योग्य असू शकते हे जाणून घ्या. अर्थात ती गोष्ट तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही वेगळं होणं गरजेचं आहे. पण तरीही समोरच्याला दोष देत राहणं योग्य नाही. तुम्हीच नेहमी पूर्ण बरोबर आणि समोरची व्यक्ती चूक असं होऊ शकत नाही.
शांततेने बोला
जेव्हा नातं बिघडतं तेव्हा तुम्ही एकमेकांशी भांडणाच्या स्वरात बोलता. तुम्हाला वाटतं मोठ्यानं बोललं, रागावलं की समोरचा माणूस ऐकून घेऊ शकतो. पण तुमचा हा विचार अगदी चुकीचा आहे. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी शांत राहणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्ही दोघंही शांत राहून चर्चा केलीत तर एकमेकांना समजून घेऊन सामंजस्याने निर्णय घेऊ शकता.
मित्रांचा सल्ला घ्या
ब्रेकअप झालंय तर एकटे राहू नका. यातून तुम्हाला बाहेर पडण्याची गरज आहे. त्यामुळे अशावेळी आपल्या आवडत्या मित्रमैत्रीणींबरोबर जास्तीत जास्त राहा. त्यामुळे तुम्हाला या दुःखातून बाहेर यायला नक्कीच मदत होईल. एक जवळचा आणि खरा मित्रच तुम्हाला यातून बाहेर पडायला मदत करू शकतो हे विसरू नका.
थेरेपिस्टची घ्या मदत
मित्रांची मदत घेऊनही तुम्ही यातून बाहेर पडत नसाल आणि पुन्हा पुन्हा त्याच विचाराने दुःखी होत असाल तर सरळ थेरेपिस्टची मदत घ्या. तुम्हाला या भावनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांची चांगली मदत होऊ शकते. मग ती मदत तुमच्याशी बोलून असो वा औषधोपचाराने असो. यातून तुम्हाला थेरेपिस्ट नक्कीच बाहेर काढतात.
ब्रेकअप (Breakup) असं दुःख आहे, ज्यातून बाहेर येणं अजिबात सोपं नाही. त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. पण ब्रेकअप झाल्यानंतर सतत दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा यातून बाहेर येणं हा जास्त चांगला पर्याय आहे हे नक्की.