महिलांकडे दागिन्यांचे कितीतरी प्रकार असतात. पण त्यात खुलून दिसतात ते पारंपरिक आणि मराठमोळे दागिने. पारंपरिक दागिन्यांबद्दल सांगायचे झाले. तर आपल्या प्रत्येकाकडे अगदी गळ्यालगतच्या ठुशी डिझाईन पासून ते लांब राणी हारपर्यंत सगळे प्रकार असतात. हल्ली कोल्हापुरी साज हा प्रकार सुद्धा अगदी आवर्जून घातला जातो. तुम्ही कोल्हापुरी साज हा प्रकार कधी वापरुन पाहिला आहे का? जर तुमच्याकडे कोल्हापुरी साज नसेल आणि तुम्ही तो खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला कोल्हापुरी साजच्या वेगवेगळ्या डिझाईन्स या माहीत हव्यात. म्हणजे तुमच्या दागिन्यांमध्ये आणखी एका मराठमोळ्या दागिन्यांची भर पडेल. शिवाय तुमच्या या दागिन्यामुळे तुमच्या अगदी साध्या कपड्याचाही रुबाब वाढेल.
तुम्हाला माहीत आहे का कोल्हापुरी साजचा इतिहास (History of Kolhapuri Saaj)
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या दागिन्यांच्या घडणी मागे एक गोष्ट नक्कीच असते. कोल्हापुरी साज मागेही तसाच रोमांचक इतिहास आहे. आता नावावरुन तुम्हाला कळलं असेलच की, हा दागिना कोल्हापूरचा आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरचीही स्वतंत्र अशी ओळख इतिहासात आहे. पण कोल्हापुरी साजबद्दल सांगायचे झाले तर साधारण 60 वर्षांपूर्वी कोल्हापुरी साज हा दागिना तयार केला गेला. कोल्हापुरात मंगळसूत्राऐवजी हा दागिना घालण्याची पद्धत आहे. सगळ्यात आधी हा दागिना फक्त सोन्यामध्ये बनवला जात होता. पण सोन्याच्या किमती वाढल्यानंतर त्या मध्ये काळ्या मण्यांचा वापरही केला जाऊ लागला.काळ्या मण्यांचा वापर हा नजर लागू नये म्हणून देखील केला जातो. कोल्हापुरी साज हा दागिना लाखेपासून बनवला जातो. या लाखेवर सोन्याचा पत्रा चढवला जातो.कोल्हापुरी साजमध्ये 21 लोंबते डुल असतात. त्यातील वेगवेगळ्या डुलवर वेगवेगळ्या डिझाईन्स असतात. कोल्हापूरला गेल्यानंतर तुम्हाला कोल्हापुरी साज घ्यायचा असेल तर कोल्हापूरच्या प्रसिद्ध सराफ कट्ट्यातून तुम्ही या दागिन्याची खरेदी करु शकता.
कोल्हापुरी साजमध्ये मिळणाऱ्या डिझाईन्स (Designs of Kolhapuri Saaj)
कोल्हापुरी साज हा दागिना पारंपरिक आहे. त्याचा ठराविक पॅटर्न तुम्हाला माहीत असेल पण कोल्हापुरी साजमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची खरेदी करु शकता. जाणून घेऊया कोल्हापुरी साजच्या या वेगवेगळ्या डिझाईन्स
मराठमोळ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स खास तुमच्यासाठी
1. सूर्य कोल्हापुरी साज
कोल्हापुरी साजमधील हा प्रकार फारच प्रचलित आहे. याचे पेंडट तुम्ही इतरवेळीही पाहिले असेल. सूर्य कोल्हापुरी साजचे पेंडंट गोल असते. त्याच्या आजूबाजूला सोन्यांच्या मण्यांचे काम केलेले असते. गोलाकार पेंडंटच्यामध्ये माणिक असतो. आाता यामध्ये व्हरायटी पाहायला मिळते. याच्या डुलमध्ये थोडा वेगळेपणा आणला जातो. साधारण ठुशीच्या जवळ जाणारा असा हा प्रकार असल्यामुळे तुम्हाला हा कोल्हापुरी साजचा प्रकार गळ्यालगत घालता येईल.यामध्ये गळ्यालगत मण्या असतात. डुलाची रचना तारेमध्ये केलेली असते. माणिकसोबत हवे असल्यास यामध्ये पाचू आणि आणखी माणिक लावले जातात
2. चंद्र कोल्हापुरी साज
चंद्र कोल्हापुरी साज ही दुसरी डिझाईन यामध्ये प्रसिद्ध आहे. सूर्य कोल्हापुरी साजमध्ये ज्या प्रमाणे पेंडट गोल असते. तसेच चंद्र कोल्हापुरी साजचे पेंडंट हे चंद्रकोरीप्रमाणे असते. ही कोर अधिक आकर्षक करण्यासाठी यामध्ये माणिकचा वापर केलेला असतो. चंद्र कोल्हापुरी साज ही अनेकदा ठुशीसारखीच दिसते. तुम्ही गळ्यालगत किंवा सैल अशी डिझाईन्स तयार करु शकता.
3. कासव कोल्हापुरी साज
हिंदू धर्मात कासवाला देव मानले जाते. कोल्हापुरी साजमध्ये कासवाच्या डिझाईन्सचाही वापर केला जातो. कासव कोल्हापुरी साजचे डुल हे वेगळ्या आकाराचे असतात. याच्यामधील डुल थोडे कासवाच्या पाठीसारखे असतात. याच्या आकारामध्ये लहान मोठे डुल असतात. पण ही डिझाईन दिसायला छान दिसते.
4. वाघ नख कोल्हापुरी साज
वाघ नख कोल्हापुरी साज हा यातील आणखी एक प्रकार आहे. तुम्ही वाघ नख असलेले काही खास दागिने पाहिले असतीलच. साधारण दोन नखांचा वापर हा पेंडंटमध्ये केला जातो. पण कोल्हापुरी साजचा विचार करता पेंडंटच्या बाजूला वाघ नखासारके सोन्याचे पत्रे जोडले जातात. वाघ नख कोल्हापुरी साज हा दिसायला फारच सुंदर दिसतो. हा प्रकार तुम्हाला सहज उपलब्ध होईलच असे नाही. पण कोल्हापुरात हा प्रकार तुम्हाला कदाचित बनवून मिळेल.
5. मासा कोल्हापुरी साज
मासोळीचा वापर अनेक दागिन्यांमध्ये केला जातो. त्यामुळे मासा कोल्हापुरी साज हा प्रकार थोडासा वेगळा दिसतो. आपण कोळी दागिन्यांमध्येच मासा किंवा मासोळी डिझाईनचा वापर केलेला आतापर्यंत पाहिला असेल. पण कोल्हापुरी साजमध्येही हा प्रकार मिळतो. मासा कोल्हापुरी साजचे डुल हे माशाच्या आकारातील असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार माशांच्या डुलची संख्या निवडू शकता.
6. नाग कोल्हापुरी साज
नाग कोल्हापुरी साजमधील डुलाचा आकार हा नागाच्या फणाप्रमाणे असतो. याला अधिक आकर्षित करण्यासाठी त्यामध्ये मण्यांची गुंफण केली जाते. नाग कोल्हापुरी साज हा प्रकारही दिसायला फारच वेगळा दिसतो. तुम्हाला ऑनलाईन हा प्रकार पटकन मिळणार नाही. पण ज्या ठिकाणी तुम्हाला पारंपरिक दागिने मिळतात.त्या ठिकाणी तुम्ही हे दागिने शोधू शकता.
7. भुंगा कोल्हापुरी साज
भुंगा कोल्हापुरी साज हा आणखी एक प्रकार सगळ्यांना फारसा परिचित नाही. पण खूप कमी ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळतो. भुंगा कोल्हापुरी साजमध्ये डुल हे गोलाकार आकाराचे असतात. हा प्रकार थोडा फुगलेला असतो. याच्या डुलच्या आकारामुळे हा भुंगा डिझाईनमधील कोल्हापुरी साज थोडा वेगळा दिसतो.
8. कारले कोल्हापुरी साज
कारले कोल्हापुरी साज हा प्रकारही फारच प्रसिद्ध आहे. या कोल्हापुरी साजच्या प्रकारामध्ये याच्या कळ्या किंवा डुल कारल्याप्रमाणे लांबट आाकाराचे असतात. कारले कोल्हापुरी साज हा प्रकार फारच सर्वसामान्य आहे.यातील लांबट कळ्या असलेल्या कारले कोल्हापुरी साजवर अनेक बारीक नक्षीकामही केलेले असते. नऊवारी आणि सहावारीवर हा प्रकार छान उठून दिसतो.
9. कमळ कोल्हापुरी साज
कमळ कोल्हापुरी साज हा प्रकार तुम्ही जरी ऐकला नसेल तरी सुद्धा हा प्रकार फारच प्रसिद्ध आहे. कमळांच्या कळा कशा असतात अगदी त्याचप्रमाणे याच्या कळ्या असतात. या दागिन्यामध्ये कमळाच्या आकारात वापरलेले डुल फार जवळ जवळ असतात त्यामुळे हा दागिना भरगच्च दिसतो. तुम्ही हा एक प्रकार घातल्यानंतर तुम्हाला इतर काहीही घालण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे तुम्ही कमळ कोल्हापुरी साज वापरायला काहीच हरकत नाही.
10. शंख कोल्हापुरी साज
शंख कोल्हापुरी साज ही डिझाईन ही कोल्हापुरी साजमध्ये तुम्हाला मिळू शकेल. शंखाचा आकार असलेले डुल यामध्ये लावलेले असतात. शंखाचा आकार असलेले कोल्हापुरी साज तुम्हाला सहज उपलब्ध होणार नाही. शंख कोल्हापुरी साजचे डुल गोलाकार असतात शंखाव्यतिरिक्त यामध्ये शिंपल्या आणि कवड्यांच्या आकाराचा वापर देखील केला जातो.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)
कोल्हापुरी साज आणि ठुशी हा प्रकार वेगळा आहे का?
कोल्हापुरी साज आणि ठुशी हे दोन वेगळे प्रकार आहेत. कोल्हापुरी साज हा थोडा मोठा असतो त्यामध्ये पानांचे आणि डुलचे काम केलेले असते. ठुशी हा प्रकार गळ्यालगत असतो. त्यामध्ये सोन्याचे बारीक मणी असतात. त्यांची दोऱ्यामध्ये गुंफण केली जाते. दोन्ही दागिने हाताने बनवलेले असले तरी या दोघांमध्ये बराच फरक आहे.
कोल्हापुरी साज चांदीमध्ये करुन मिळतात का?
कोल्हापुरी साज हा सोन्याच्या पत्रात बनवून मिळवत असला तरी हल्ली चांदीमध्येही तो करुन मिळतो. हल्ली चांदीवर सोन्याचे पाणी लावून सुद्धा कोल्हापुरी साज बनवला जातो. त्यामुळे हा दागिना थोडा अधिक वजनदार लागतो. पण जर तुम्हाला चांदीत तो घडवून हवा असेल तर तुम्हाला हा दागिना घडवून मिळतो.
कोल्हापुरी साजची काळजी नेमकी कशी घ्यावी ?
प्रत्येक दागिन्यांची काळजी ही तुम्हाला घ्यावी लागते. कोल्हापुरी साज हा पत्र्यामध्ये बनवला असतो. त्यामध्ये बारीक तारांचे काम केलेले असते. त्यामुळे तुम्हाला अगदी नाजूक पद्धतीने त्याला हाताळावे लागते. कोल्हापुरी साज जर तुम्हाला साफ करायचे असेल तर तुम्ही कोरड्या ब्रशने हलक्या हाताने तो दागिना स्वच्छ करु शकता. शिवाय तुम्ही डिटर्जंट पावडरचा उपयोग करुनही त्याची सफाई करु शकता.
आता तुम्हाला कोल्हापुरी साज घेण्याची इच्छा झाली असेल तर वेळ न दवडता लगेचच तुम्ही कोल्हापुरी साजची खरेदी करा.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
You Might Like This:
प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत हे 5 दागिने
पारंपारिक महाराष्ट्रीयन ते झुमकी.. लग्नात घालण्यासाठी खास कानातले डिझाईन