लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!!!
या ओळी ऐकल्या की मराठी भाषिक माणसाला नक्कीच स्फुरण चढते आणि छाती अभिमानाने भरून येते. मराठी भाषा ही आपली शान आहे. मराठी भाषेने ठिकठिकाणी झेंडे रोवले आहेत आणि अशा या मराठीचा अभिमान नाही असा एकही माणूस सापडणार नाही. इथे तर आता महाराष्ट्रात बऱ्याचशा अमराठी लोकांनाही मराठी येते आणि त्यांनीही ही भाषा अभिमानाने आपलीशी केली आहे. आज मराठी भाषा दिन (Marathi Bhasha Din) असल्याने तुम्ही मराठी भाषा दिन कोट्स (marathi bhasha din quotes) शेअर करू शकता. कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी हा मराठी दिन आपण गेले काही वर्ष साजरा करत आहोत. आपल्या सर्वांनाच कुसुमाग्रज माहिती असून एकच दिवस नाही तर कायमस्वरूपी आपण हा मराठी भाषा दिन साजरा करायला हवा असं मराठी भाषिकांना वाटणं नक्कीच स्वाभाविक आहे. मराठी भाषा दिनाची माहिती सर्वांना आहे. पण ही मराठी भाषा मूळ कुठची आणि आतापर्यंत या भाषेचा नक्की प्रवास कसा झाला याची तुम्हाला माहिती आहे का? हीच रंजक माहिती आम्ही तुम्हाला या लेखामधून देणार आहोत.
मराठी भाषेचा उगम झाला उत्तरेकडे
मराठी भाषा (Marathi Language) नक्की कुठून आली तर या भाषेचा उगम झाला तो उत्तरकडे. मूळ आर्यांची असणारी ही भाषा साधारण 1500 वर्षांचा इतिहास जपणारी आहे. उत्तरेच्या सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत आणि त्यानंतर दमणपासून ते अगदी दक्षिणेच्या गोव्याच्या किनाऱ्यापर्यंत या मराठीचा विस्तार होत गेला. भारताच्या दक्षिण भागामध्ये ही भाषा विकसित झाली. ही भाषा स्थिरावली महाराष्ट्रात. मराठी माणसाने या भाषेचा विकास केला आणि अगदी वर्षानुवर्षे या भाषेमध्ये बदल होत गेला. अत्यंत कठीण असणारी ही भाषा प्रांत, माणसं आणि उच्चारातही बदलली गेली. गावागावात वेगवेगळ्या लहेजाच्या मराठी भाषा ऐकू येते. आजही वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी मराठी ऐकू येते. प्रत्येक ठिकाणी शुद्ध मराठी बोलली जाते असचं नाही. पण मराठी भाषांच्या या पोटभाषांचेही तितकेच कौतुक आहे. इसवी सन 500-700 वर्षांपासून मराठी पूर्ववैदिक, वैदिक, पाली, प्राकृत, संस्कृत अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मराठी भाषेचा विकास होत गेला. ज्ञानेश्वर, तुकाराम यांचे मराठी, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मराठी, तर बहिणाबाईच्या कवितेतील मराठी यामध्येही तुम्हाला तफावत आढळते. चक्रधर स्वामींनी लिहिलेले लिळाचरित्र असो अथवा रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक असोत. आजही अगदी मनापासून याचा अभ्यास केला जातो. मात्र या दोन्ही मराठीमध्ये खूपच फरक आहे.
मराठीतील माधुर्य जपले लेखक आणि कवींनी
मराठी भाषा आपण वळवावी तशी वळते असं म्हटलं जातं. खरं आहे. मराठी भाषा जितकी सुंदर, मधुर आणि लयबद्ध आहे तितकीच अगदी मनावर फटके मारणारीही आहे. प्रेम, राग, मद, मोह, मत्सर या सर्व भावना अगदी उत्तमरित्या अलंकारिकरित्या शब्दात गुंफता येतात. मराठी भाषेचा हाच गोडवा आहे. तुम्हाला जशा हव्या तशा यामध्ये भावना व्यक्त करता येतात आणि त्याही मनावर चपखल बसतात. अगदी पूर्वीची मराठी भाषा आजही आपल्याला हवीशी वाटते. ऐतिहासिक लयबद्ध मराठी आणि त्याचा तोरा काही वेगळाच. काळानुसार मराठीच्या उगमापासून ते आतापर्यंत मराठी भाषेत बदल झाले. मात्र आपल्याकडील साहित्यिक आणि कवींनी ही भाषा उत्तम रित्या जपून ठेवली आहे. यादवी सत्ता असो, शिवरायांची सत्ता असो, पेशवाई सत्ता असो अथवा इंग्रजांची सत्ता असो. प्रत्येक सत्तेनुसार मराठी भाषेत बदल होत गेले. यातून मुख्य मराठी, अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, कोल्हापुरी, कोकणी असे अनेक मराठी भाषेचे पोटप्रकार येत गेले. या पोटप्रकारांचाही एक वेगळाच साज आहे. इंग्रजांनी सत्ता स्थापन केल्यानंतर इंग्रजी भाषेचे वर्चस्व अधिक आले. आता तर मराठी लोप पावते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी भाषेची काही जणांना लाज वाटते का असाही प्रश्न निर्माण झाला आहे पण मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम पाहता आणि नव्या पिढीच्या तोंडूनही मराठी ऐकताना मराठीचा लोप होणार नाही अशी आशा नक्कीच निर्माण होते.
दैनंदिन वापरातील म्हणी आणि वाक्प्रचार
मराठीची शान
मराठी भाषेतील साहित्य हे तर कधीही न संपणारा विषय असून शास्त्रशुद्ध व्याकरण आणि उत्तम विषयांनी अनेक पुस्तकं मराठीत आली. वि. वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज ज्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, चिं. वि. जोशी, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, शांता शेळके, ना. सी. फडके, रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर, गौरी देशपांडे, मंगला गोडबोले, भालचंद्र नेमाडे, विश्वास पाटील अशी न संपणारी उत्तम साहित्यिकांची, कवींची यादी मराठीमध्ये आहे.समाजशास्त्र, नाटक, साहित्य, संगीत सगळीकडे मराठी भाषेने आपले वर्चस्व आजही टिकवून ठेवलं आहे. इतकंच नाही तर मराठी भाषेने परदेशातही आपल्या भाषेचा झेंडा रोवला आहे हे आपण अभिमानाने सांगू शकतो. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचा तोरा टिकवून ठेवणे हे मराठी भाषिक म्हणून आपले कर्तव्य आहे आणि आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हा मराठी भाषेचा प्रवास असाच अविरत चालत राहील हीच मराठी भाषिक म्हणून प्रत्येकाची इच्छा असेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक