निरोगी आणि चांगल्या आरोग्यासाठी शरीराला पुरेशी झोप मिळणे गरजेचं आहे. एकदा झोपेचं चक्र बिघडलं की आरोग्य समस्या पाठी लागतात. जर तुम्ही दोन दिवस नीट झोपला नाहीत तर तुमचे शरीर थकते आणि अशक्त होते. जर तुम्हाला नियमित कमी झोपण्याची सवय असेल तर त्याचा परिणाम हळू हळू तुमच्या शरीरावर जाणवू लागतो. यासाठी दररोज कमीत कमी सहा ते आठ तासांची झोप शरीराला मिळायला हवी. कारण जर तुम्ही पाच तासांपेक्षा कमी झोपत असाल ते तुमच्या आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही. कमी झोपल्यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या कमी झोपेचे परिणाम…
पाच तासांपेक्षा कमी झोप मिळाल्यास शरीरावर काय परिणाम होतात
शरीराला कार्यरत राहण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त आठ तासांची गरज असते. त्यापेक्षा कमी झोपल्यास तुमच्या शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागतात.
स्मरणशक्ती कमी होणे –
झोपल्यामुळे तुमच्या मेंदूला आराम मिळतो. मेंदूचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुम्हाला दिवसभरात कमीत कमी आठ तास शांत आणि निवांत झोपण्याची गरज असते. मेंदूला झोप न मिळाल्यास तुमच्या स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो. कारण झोप पूर्ण न झाल्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. मेंदूचे आरोग्य बिघडले की पुढे त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर जाणवतो.
प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो –
कोरोनाच्या काळात आजारपणापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याची गरज आहे. पण त्यासाठी वेळेवर झोपण्याची आणि पूर्ण झोप घेण्याची आहे. कारण अर्धवट झोपेमुळे तुमची प्रतिकार शक्ती कमजोर होऊ शकते. असं झाल्यास सर्दी, खोकला अशा आरोग्य समस्या सतत डोकं वर काढतात.
सतत मूड स्वींग होणे –
तुमच्या शारीरिक स्थितीचा तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत असतो. झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर मेंदू थकलेला राहतो. ज्याचा परिणाम तुमच्या मनावर आणि मूडवर होतो. मेंदू थकल्यामुळे तुमचा मूड सतत बदलत राहतो. दिवसभर तुमची चीडचीड होते. सतत झोपेची समस्या निर्माण झाल्यास नैराश्य, चिडचिड, मूड स्वींग अशा समस्या वाढू लागतात.
मधुमेहींना धोका –
मधुमेहींना सतत झोप कमी लागण्याची सवय असते. मात्र त्यांनी वेळेवर झोपणे आणि लवकर उठणे फार गरजेचं आहे. कारण झोप कमी मिळाली तर त्यांच्या शीररातील इन्सुलीनच्या पातळीवर परिणाम होतो. इन्सुलीनची लेवल असंतुलित झाल्यास मधुमेहातील धोके वाढू लागतात. झोप पूर्ण न झाल्यास तुमचा रक्तदाबही वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे मधुमेहातील समस्या अधिकच वाढू शकतात. याचा परिणाम पुढे ह्रदय समस्या वाढण्यामध्ये होऊ शकतो. यासाठी मधुमेही असा वा ह्रदयरोगी पुरेशी झोप घेतलीच पाहिजे.
वजन वाढणे –
झोपेचे चक्र नीट सुरू नसेल तर याचा परिणाम तुमच्या वजनावरही होतो. कारण कमी झोप घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील रासायनिक क्रिय सुरळीत होत नाही. बऱ्याचदा जागरणामुळे लोकांना सतत भूक लागण्याची समस्या जाणवते. असं अवेळी आणि भरपूर खाण्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते. यासाठीच जर तुम्ही झोप कमी घेतली तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
तरुणांमध्ये या कारणामुळे वाढतोय निद्रानाशाचा त्रास
दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स
शांत झोप लागण्यासाठी उपाय जाणून घ्या (Good Sleeping Tips In Marathi)