भविष्य

वार्षिक भविष्य मिथुन (Gemini) राशी : वर्षभर उतार-चढ देणार सापशिडीच्या खेळाचा अनुभव

Jyotish Bhaskar  |  Jan 3, 2019
वार्षिक भविष्य मिथुन (Gemini) राशी : वर्षभर उतार-चढ देणार सापशिडीच्या खेळाचा अनुभव

राशी चक्रातील तिसरी राशी मिथुन राशी होय. चंचल स्वभाव या राशीच्या लोकांमध्ये फारच बघायला मिळतो. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना २०१९ या नववर्षामध्ये फारच जागरुक राहावं लागेल. कारण हे वर्ष आपल्या राशीसाठी वर्षभर अनेक उतार-चढावांचे असणार आहे. थोडक्यात सापशिडी या खेळाचा अनुभव मिथुन राशीच्या लोकांना येऊ शकतो. असं असलं तरी घाबरुन जायचं काही कारण नाही. वर्षभर असणा­-या ग्रहांच्या स्थितीनुसार कोणती गोष्ट केव्हा करायची आणि केव्हा प्रकर्षाने टाळायची आदी समजून घेतलं तर नववर्ष सुखकारक आणि आनंदात जाऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया हे नववर्ष मिथुन राशीसाठी कसं असेल…

मिथुन राशीचा स्वभावविशेष

सतत भ्रमण करीत राहणा-या ग्रहांचा परिणम मिथुन राशीच्या लोकांवर चटकन होतो. कारण ही रास नाविन्य जपणारी आहे. ‘रोज नवं.. रोज हवं’ हे या राशीचं ब्रिद वाक्य होऊ शकतं. पती-पत्नीची जोडी हे या राशीचं प्रतिक म्हणून ओळखलं जाते. नाविन्य जपणारं असल्यामुळे या राशीचे लोक फार चंचल असतात. ही राशी वायुतत्त्वाची आणि द्विस्वभावी आहे. उत्तम ग्रहणशिलता, तल्लख स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा ही राशीची स्वभाव वैशिष्ट्यं आहेत. मिथुन राशीच्या लोकांकडे बुद्धिमत्ता असली तरी विवेक असतोच असं नाही. म्हणून कित्येक वेळा समोरच्या व्यक्तीची फसगत होऊ शकते. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्तम वक्ता, उत्तम लेखक, योग्य सुसंवाद साधणारे, वैचारिक प्रगल्भता असणारे म्हणूनही ओळखले जातात. हे लोक प्रत्येक गोष्ट बौद्धीक निकषांवर चाचपून घेणारेही असतात. या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळेच या नववर्षात मिथुन राशीच्या लोकांनी अतिदक्षता बाळगायला हवी.

2019 वर्षात जाणवणार सकारात्मक बदल

2018 हे वर्ष  मिथुन राशीच्या लोकांना काही विशेष असं गेलं नाही. मात्र दक्षता बाळगल्यास नववर्षात लाभ मिळू शकतो. मिथुन राशीच्या भाग्याची आखणी  करणारे ग्रह म्हणजे बुध, शुक्र आणि शनि महाराज होय. तसेच गुरु आणि बुध हे या राशीचे कर्म ठरवतात. नववर्षाच्या सुरुवातीलाच लाभ स्थानाचा स्वामी मंगळ तुमच्या दशमात राहणार असून राशीस्वामी असलेला बुध, रवि आणि शनि यांच्यासोबत सप्तमात राहणार आहे. त्यामुळे नववर्षाचा आनंद, उत्साह कायम राहणार असून वर्षाच्या सुरुवातीलाच एक सकारात्मक बदल तुम्हाला जाणवू शकतो. परिणामी कुठलंही कार्य करत असताना त्याचं निश्चित असा उद्देश ठरवू शकाल.

विद्यार्थ्यांना यश, व्यापारात वृद्धी आणि नोकरीत बढतीचा काळ

विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल असल्यामुळे स्कॉलरशिप मिळविण्यासाठी या काळात प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. व्यापाराला कारक असलेला बुध धनू राशीतून स्वराशीकडे दृष्टी टाकत असल्यामुळे व्यापारातही वृद्धी करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. दि. 5 फेब्रुवारी 2019 पासून लाभेष लाभात असल्याने लाभ योग जुळून येत आहे. ज्यामुळे बदली आणि प्रमोशन या दोन्ही संधी चालून येऊ शकतात. त्यांचा आपण योग्य लाभ घ्यायला हवा. दि.15 एप्रिल ते 10 मे 2019 या कालखंडात शुक्र मिन राशीत तुमच्या कर्मस्थानात मालव्य योग निर्माण करीत आहे. त्यामुळे व्यवसाय, व्यापार, नोकरी यासाठी कालखंड सर्वाेत्तम लाभ देणारा असणार आहे. मुख्यत: कम्प्युटर, फॅशन, गार्मेंट यासारख्या सेक्टरमध्ये जे मिथुन राशीचे लोक कार्यरत असतील त्यांच्यासाठी तर हा कालखंड फारच लाभदायक ठरु शकतो.

परीक्षा घेणारा काळ

इथपर्यंत सर्व ठिक असलं तरी पुढचा कालखंड मिथुन राशीच्या लोकांसाठी परीक्षा घेणारा ठरणार आहे. कारण दि. 7 मे 2019 ला मिथुन राशीत मंगळ आणि राहू यांचा अंगारक दोष निर्माण होत आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांनी आपला मूळ स्वभाव थोडा बाजूला ठेवून परिस्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे. आपल्या चंचल स्वभावाला आळा घालत रोज नव्याची अपेक्षाही सोडली पाहिजे. विशेषत: आपल्या शब्दांवर नियंत्रण या कालखंडात ठेवले पाहिजे. ते नियंत्रण जर तुम्ही मिळवू शकला नाहीत. तर जवळची माणसं दुरावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हा कालखंड वैवाहिक जीवनासाठीही अत्यंत कठीण असणार आहे. लग्नस्थानात अंगारक दोष आणि सप्तमात जडत्व दोष निर्माण होत असल्यामुळे पती आणि पत्नी दोघंही या कालखंडात जेवढा समजूतदारपणा दाखवतील, तेवढी घरात, नात्यांमध्ये शांतता प्रस्थापित करु शकतील. जी त्यांच्यासाठी लाभदायक ठरु शकते. लाभापेक्षा किंवा काही मिळविण्यापेक्षा आपले काही गमावले जाणार नाही, याची काळजी या कालखंडात मिथुन राशीच्या लोकांनी घ्यावयाची आहे.

चढ-उतारांचा सामना

2019 या नववर्षाचं मिथुन राशीच्या लोकांसाठी वैशिष्ट्य म्हणजे 3 वेळा मोठे उतार-चढाव आपल्या आयुष्यात येऊ शकतात. त्यांचा आपण आपल्यातल्या गुणांच्या आधारे सामना करावयाचा आहे. दि. 17 ऑगस्ट 2019 ला पुन्हा स्वराशीचा रवि आणि मंगळ तुमच्या तृतीय स्थानात येऊन पराक्रम गाजवण्याचे योग निर्माण करत आहेत. त्याचा योग्य लाभ आपण करवून घ्यायचा आहे. विशेषत: परदेशात व्यवसाय असणा-या मिथुन राशीच्या जातकांना हा योग अत्यंत लाभदायक असा असणार आहे. दि. 5 नोव्हेंबर 2019 ला गुरु महाराज तुमच्या सप्तमात येऊन हंसयोगाचे गठन करीत आहेत. गुरु महाराजांची असीम कृपा या कालंखहात आपल्यावर होणार आहे. व्यवसाय, व्यापार वृद्धिंगत होऊन घरात सुख, शांती, प्रगती देणारा हा हंसयोग आहे. ज़े काही करायचं आहे, ते या कालखंडात करायला मिथुन राशीच्या लोकांनी चुकायला नको. आपण प्रयत्नांची पराकाष्ठा या कालखंडात केली तर गुरु महाराज आपल्या भरभरुन देणार आहेत.

एकंदरीत 2019 हे नववर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी उतार-चढावाचे अगदी सापशिडीच्या खेळाचा अनुभव देणारे ठरु शकते. असे असले तरी आपला मूळ स्वभाव बाजूला ठेवून, चंचलतेला आवर घालून, रोज नाविन्याची अपेक्षा सोडून ग्रहाची स्थिती लक्षात घेऊन मार्गक्रमण करीत राहिलात, तर आपली प्रगती निश्चित होईल.

लेखिकेच्या FB पेजला तुम्ही भेट देऊ शकता.

हेही वाचा : 

वार्षिक भविष्य 2019 : मेष रास

वार्षिक भविष्य 2019 : वृषभ रास

Read More From भविष्य