आरोग्य

लॉकडाऊन कालावधीत पीसीओएसच्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ

Dipali Naphade  |  Sep 29, 2021
pcos patients increase

अलीकडे, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम (पीसीओएस) च्या संख्येत वाढ झाली आहे कारण विविध कारणामुळे घरात घरातच राहणे, शारीरिक हालचाली कमी होणे, ताणतणाव, जंक फूडचे अतिसेवन, बैठे काम, पुरेशी झोप न होणे याचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात. पीसीओएस प्रकरणांमध्ये संबंधीत महिलेला वजन वाढण्यासारख्या समस्येला सामोरे जावे लागते. ही स्थिती औषधोपचार, वजन व्यवस्थापन, व्यायाम, पौष्टिक आहार आणि गर्भवती होण्यात अडचण आल्यास सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाची मदत घेऊन व्यवस्थापित केली जाऊ शकते. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) हा प्रजनन वयातील स्त्रियांमध्ये सामान्यतः दिसणारा गंभीर अंतःस्रावी विकार आहे ज्यामुळे हार्मोन्सचे असंतुलन होते. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये पुरुष हार्मोन्सचे उत्पादन जास्त असते, ते इन्सुलिनला प्रतिरोधक बनतात, ज्यामुळे वजन वाढते आणि केसांची अवांछित वाढ होते. पीसीओएसच्या इतर लक्षणांपैकी त्वचेवर पुरळ येणे, काळे डाग आणि वजन वाढणे ही लक्षणे दिसून येतात. ही स्थिती उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि वंध्यत्व आदी आजारांना आमंत्रित करते. पीसीओएसबाबत जागरुकता असणे अधिक गरजेचे आहे.

काय आहे नक्की कारणे

शारीरीक हालचाली मंदावल्याने स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी, हार्मोन्सचे असंतुलन, तणाव आणि वजन वाढणे, मासिक पाळीच्या कळा तसेच पीसीओएस प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. स्त्रिया देखील अनियमित मासिक पाळी तसेच पाळीदरम्यान होणा-या अधिक रक्तस्रावाकडे एक सामान्य समस्या असल्याचे गृहित धरुन याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे पीसीओएसची प्रकरणे वाढली आहेत.. गेल्या काही महिन्यांत पीसीओएसच्या प्रकरणांमध्ये 30% पेक्षा जास्त वाढ झाली आहे जी महामारीमुळे लागू केलेल्या जीवनशैलीतील बदलांमुळे वाढली आहे. सुमारे 25-30 वर्षांच्या वयोगटातील महिला मुख्यतः पीसीओएसने ग्रस्त आहेत. बहुतांश तरुण मुलींना लॉकडाऊन दरम्यान विशीच्या सुरुवातीच्या काळात चूकीच्या जीवनशैलीमुळे पीसीओएस होत आहे अशी प्रतिक्रिया पुण्यातील मदरहूड हाॕस्पिटलच्या स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. राजेश्वरी पवार यांनी व्यक्त केली.

डॉ. राजेश्वरी यांनी पुढे सांगितले की, पीसीओएस असलेल्या वृद्ध स्त्रियांमध्ये सामान्य समस्या म्हणजे रक्तातील साखरेच्या पातळीतील वाढ आणि उच्च रक्तदाब अशी आहे. ज्या महिलांना आधीच पीसीओएस होता त्यांनाही लॉकडाऊन कालावधीत अडचणी उद्भवल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी ज्यांनी त्यांच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले होते, त्यांनाही चूकीच्या जीवनशैलीमुळे पुन्हा ती लक्षणे दिसू लागली आहेत.अनेक किशोरवयीन मुली पीसीओएसची लक्षणे जसे की पुरळ आणि चेहऱ्यावरील केसांची तक्रार घेऊन रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होत आहेत.

अधिक वाचा – पीसीओएस या आजारावर स्टेम सेल थेरपी ठरतेय वरदान

तज्ज्ञांचे मत 

डॉ. करिश्मा डाफळे, फर्टिलिटी कन्सल्टंट, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे सांगतात पॉलीसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम (पीसीओएस) हे स्त्रियांमध्ये वंध्यत्व आणि ओव्हुलेटरी डिसऑर्डरचे एक कारण आहे. परंतु, पीसीओएस असलेल्या स्त्रिया सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे गर्भवती होण्यास प्रयत्न करतात. पुरुष सेक्स हार्मोन्स (अँड्रोजन) चे उच्च स्तर आणि असामान्य साखरेचे प्रमाण स्त्रीच्या मासिक पाळीवर परिणाम करते. पीसीओएस नियमितपणे अंड्याचे उत्पादन प्रतिबंधित करते त्यामुळे गर्भधारणेस अडथळे येऊ शकतात. प्रजनन अडथळ्यावर उपचार घेणाऱ्या 10 जोडप्यांपैकी जवळजवळ 6 जोडप्यांना वंध्यत्वाचे कारण म्हणून पीसीओएसचा सामना करावा लागतो.

डॉ करिश्मा डाफळे यांनी यासंदर्भात पुढे सांगितले की, ही स्थिती एखाद्याच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करते, ज्यात मूड स्विंग्स, तणाव आणि शरीराची प्रतिमा समाविष्ट आहे. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये नैराश्य, चिडचिड, ताणतणाव आणि चिंता आदी समस्या भेडसावतात. पीसीओएस असलेल्या स्त्रिया अनेकदा तणावग्रस्त असतात आणि त्या स्थितीकडे दुर्लक्ष करतात. पीसीओएसच्या लक्षणांचा सामना करताना त्या नैराश्याचा सामना करतात. चेहऱ्यावर जास्त केस, अनियमित मासिक पाळी आणि वजन वाढणे हे स्त्रियांसाठी लाजिरवाणे आणि स्वाभिमान कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते. काही स्त्रिया समाजात वावरणे टाळतात आणि त्यांना एकटेपणासारख्या समस्या भेडसावतात. योग्य जीवनशैली बदलणे आणि पीसीओएस असलेल्या महिलांनी प्रजनन तज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गर्भवती होण्यास फायदेशीर ठरु शकते.

पीसीओएस नियंत्रित करण्यासाठी दररोज संतुलित आहार घ्या, दररोज व्यायाम करा आणि आपल्या रक्तातील साखरेची पातळी आणि उच्च रक्तदाबाचे नियमित निरीक्षण करा. ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, शेंगा आणि डाळींचा आहारात समावेश करा. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूडचे सेवन टाळा ज्यामुळे वजन वाढते. पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड रहा, शर्करायुक्त पेयांना नाही म्हणा, पुरेसा सूर्यप्रकाश मिळवा आणि योग किंवा ध्यान करून तणावमुक्त रहा. वंध्यत्व टाळण्यासाठी पीसीओएसवर उपचार घेण्यास विलंब करू नका असेही डॉ. राजेश्वरी यांनी स्पष्ट केले.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य