DIY लाईफ हॅक्स

उन्हाळ्यात शरीर ठेवायचे असेल थंड, तर हे पदार्थ खा

Dipali Naphade  |  Apr 12, 2022
7-best-summer-cooling-foods-to-eat-in-marathi

सध्या सगळीकडे उन्हाळा वाढतोय. तापमान वाढल्यामुळे अंगाची तर लाही लाही होदत आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्रातील भागात तर उन्हामुळे अक्षरशः अंग भाजून निघते. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात जर योग्य काळजी घेतली नाही तर आपण नक्कीच आजारी पडू शकतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात केवळ बाहेरूनच शरीर थंड नाही तर आतूनही शरीर थंड ठेवावे लागते. यासाठी तुम्ही या दिवसात कुलिंग फूड्स (Cooling Foods) सेवन करायला हवे. असे कोणते पदार्थ आहेत, जे आपल्या शरीराला थंड राखू शकतात याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या. 

कलिंगड (Watermelon)

watermelon

उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. असे म्हटले जाते की, कलिंगडामध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी असते, जे शरीर थंड राखण्यास आणि हायड्रेट राखण्यास मदत करते. तसंच कलिंगड हे असे फळ आहे ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असून शरीराला थंडावा देण्यासाठी याचा अधिक उपयोग करण्यात येतो. 

पुदीना (Mint)

Mint

उन्हाळ्यात बाहेरील तापमान अधिक असेल तर थंडावा देण्यासाठी पुदीना हा उत्तम खाद्यपदार्थ आहे. आपल्या जेवणात अथवा आपल्या स्नॅक्सच्या दरम्यान याचा समावेश करून घ्यावा. पुदिन्यामुळे केवळ शरीराचे तापमानच नियंत्रित राहते असं नाही तर तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुम्ही दही, ताक अथवा रायता – कोशिंबीरमध्ये घालून तुम्ही खाऊ शकता. याशिवाय तुम्ही एखादे ज्युस बनवत असाल तर त्यामध्येही पुदिन्याचा उपयोग करू शकता. तसंच संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्ही चटणी बनवणार असाल तर त्यातही पुदिना चटणी बनवून तुम्ही त्याचा स्वाद घेऊ शकता. 

काकडी (Cucumber)

Cucumber

उन्हाळ्याच्या दिवसात शरीर हमखास थंड राखणारा पदार्थ म्हणजे काकडी. काकडी ही थंडावा देण्यासाठी उत्तम मानली जाते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीही काकडीचा उपयोग होतो. काकडीचा उपयोग तुम्ही ज्युस, डिटॉक्स ड्रिंक्स, डिटॉक्स वॉटर अथवा कोशिंबीर स्वरूपात करू शकता. काकडीमध्येदेखील साधारण 90 टक्के पाणी असते. 

शहाण्याचे पाणी (Coconut Water)

Tender coconut

कोणत्याही हंगामात शहाळ्याचे पाणी उत्तम. तुमच्या आरोग्यासह तुमची त्वचाही उत्तम राखण्यासाठी नारळाच्या पाण्याचा उपयोग होतो. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याची कमाल दिसून येते. नारळाच्या पाण्यात अर्थात शहाळ्यामध्ये विटामिन्स, मिनरल्स आणि अनेक पोषक तत्व असतात. याच्या सेवनामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राखण्यास मदत मिळते. तसंच अनेक आजार दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

लिंबाचा करा समावेश (Lime)

Lime

कधीही उन्हातून घरी आल्यावर लिंबाचे सरबत दिले जाते. पण उन्हाळ्याच्या दिवसात याचे प्रमाण अधिक असते.  उन्हाळ्यात लिंबू पाणी हे केवळ शरीरात थंडावा निर्माण करत नाही तर तुमचे शरीर आतून ताजेतवाने राखण्यासाठीही मदत करते. तुम्ही दिवसातून एक वा दोन वेळा लिंबू पाणी अगदी कमी साखर आणि मीठ मिक्स करून प्यायलात तर तुम्हाला नक्की याचा फायदा मिळतो. तसंच नुसतं लिंबू पाणी हे सकाळी उठल्यावर उपाशीपोटी प्यायलात तर वजन कमी करण्यासही याची मदत मिळते.  

दह्याचा करा उपयोग (Curd)

Curd

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्यासाठी दहीदेखील एक उत्तम पर्याय आहे. दह्यामध्ये आढळणारे गुण हे तुमच्या शरीरातील पचनक्रिया योग्य राखते. तुम्ही रायता, लस्सी, दही साखर स्वरूपात याचे सेवन करू शकता. नुसते दही खाल्ले तरीही उत्तम. मात्र तुम्हाला कोणताही आजार असेल तर दही खाऊ नका. खोकला अथवा सर्दीसारखा त्रास असेल तरीही दही खाणे टाळा. 

खडीसाखर करा समाविष्ट (Granulated Sugar)

हो हे खरं आहे. खडीसाखरदेखील तुमचे शरीर थंड राखण्यास उपयोगी ठरते. रात्री पाण्यात खडीसाखर भिजवा आणि सकाळी याचे सेवन करा. यामुळे पोटात थंडावा निर्माण होतो. तसंच साखरेऐवजी तुम्ही जेवणात खडीसाखरेचा उपयोग करू शकता. जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात याचा अधिक उपयोग होईल.
तुम्हीही या पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करून घ्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला थंडावा द्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स