मनोरंजन

अभिनेत्री माधवी गोगटेचे निधन, अनुपमामध्ये साकारली होती आईची भूमिका

Dipali Naphade  |  Nov 22, 2021
madhavi gogate

अनेक मराठी मालिकांमध्येच नाही तर अगदी हिंदी मालिकांमध्येही आई, काकू, मावशी अशा भूमिकांमध्ये दिसणारा मराठमोळा चेहरा म्हणजे माधवी गोगटे (Madhavi Gogate). अनुपमा (Anupama) या मालिकेत अभिनेत्री रूपाली गांगुली (Rupali Ganguly) च्या आईची भूमिका साकारलेल्या माधवी गोगटे यांचे 21 नोव्हेंबरला मुंबईच्या सेव्हन हिल्स रूग्णालयात निधन झाले. रूपाली गांगुलीने सोशल मीडियावर श्रद्धांजली देत ही दुःखद बातमी शेअर केली. तर माधवीची मैत्रीण नीलू कोहलीनेदेखील अत्यंत भावनात्मक संदेश शेअर केला आहे. माधवी गोगटेने अनेक मराठी मालिकाच नाही तर हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. ‘कही तो होगा’ या मालिकेमध्येही माधवीची भूमिका प्रेक्षकांनी वाखाणली होती.

अधिक वाचा – रात्रीस खेळ चालेमध्ये येणार वच्छी.. येणार ट्विस्ट

कोरोनामुळे झाले निधन 

माधवी गोगटे यांना काही दिवसांपूर्वी कोविड (Covid 19) झाला होता. त्यानंतर त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणादेखील झाली होती. मात्र रविवारी अचानक त्यांची तब्बेत बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. माधवी गोगटे या 58 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रसिद्ध मालिका अनुपमा सोडली होती. यामध्ये अनुपमा अर्थात रूपाली गांगुलीच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. आता ही भूमिका सविता प्रभुणे साकारत आहे. माधवी गोगटेच्या अचानक निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. रूपाली गांगुलीने शोक व्यक्त केला असून बा ची भूमिका साकारणाऱ्या अल्पना बुचनेदेखील माधवीच्या जाण्यावर दुःख व्यक्त केले आहे. ‘माधवीजी असे कसे होऊ शकते. सीन संपण्यापूर्वी कोणताच अभिनेत्री बाहेर जाऊ शकत नाही. अनुपमाचा सेट तुमची नक्कीच सतत आठवण काढेल. तुमचे प्रेमळ हास्य, मधुर आवाज आणि मजेशीर स्वभाव नेहमीच सगळ्यांना लक्षात राहील.’ अशी भावनिक पोस्ट अल्पनाने शेअर केली आहे. माधवी गोगटेना ऐसा कभी सोचा ना था, कोई अपना सा या मालिकांमधूनही काम केले आहे. 

अधिक वाचा – प्रिती झिंटा झाली आई, सोशल मीडियावर शेअर केली जुळ्या मुलांची नावे

नाटकांमधूनही केले होते काम

‘गेला माधव कुणीकडे’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘अंदाज आपला आपला’ यासारख्या गाजलेल्या नाटकांमधूनही माधवी गोगटे यांनी भूमिका केल्या. तर दंगल टीव्हीवर नुकतीच त्यांची ‘सिंदुर की कीमत’ ही मालिका सुरू होती. मात्र लवकरच ही मालिका सोडणार असल्याचेही सांगण्यात येत होते. मराठीपेक्षाही हिंदी मालिकांमध्ये माधवी गोगटे यांनी काम केले. राजा बेटा, सपने सुहाने लडकपन के, मिसेस तेंडुलकर, एक सफर, बसेरा या हिंदी मालिका विशेष गाजल्या होत्या. तर स्वप्नांच्या पलीकडले, तुझं माझं जमतंय या मराठी मालिकांमधूनही माधवी गोगटे यांनी नेहमी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. इतकंच नाही तर हे खेळ नशीबाचे, घनचक्कर या मराठी चित्रपटांमधूनही त्यानी काम केले होते. माधवी गोगटे यांच्या पश्चात त्यांचे पती आणि कन्या असा परिवार आहे. तर त्यांच्या निधनाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला असून एक चांगली अभिनेत्री आपल्यातून निघून गेल्याचा सूर सध्या सोशल मीडियावरही दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटींनी माधवी गोगटे यांना श्रद्धांजली वाहिली असून नेहमी त्या स्मरणात राहतील असेही म्हटले आहे. विशेषतः अनुमपाच्या सेटवरील कलाकारांना त्यांच्या जाण्याने अधिक धक्का बसला आहे.

अधिक वाचा – मराठी चित्रपट पुन्हा नव्याने उभे राहण्याची नांदी “जयंती” पासून

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन