Family

आई तुला Thanks म्हणायचं राहूनच जातं…

Dipali Naphade  |  May 7, 2019
आई तुला Thanks म्हणायचं राहूनच जातं…

प्रिय आई,

खरं तर Mother’s Day हा रोजचाच. कारण जन्म होण्याच्या आधीपासूनच जी आपली काळजी घ्यायला सुरुवात करते तिच्यासाठी वेगळा दिवस काढून साजरा करण्यामागचं नक्की कारण काय? असा प्रश्न पूर्वी मला नेहमीच सतावत राहायचा. पण आता स्वतः आई झाल्यावर हे कळायला लागलंय. तुझ्यासाठी हा दिवस साजरा करणं हे खरं तर आमचं भाग्य म्हणायला हवं. कोणतीही परिस्थिती असो घाबरून न जाता, न डगमगता अगदी बाबांच्या खांद्याला खांदा लाऊन तू आम्हाला मोठं केलंस. पण खरं सांगू का आई, तुला थँक्स म्हणायचं राहून गेलं. कोणतंही गिफ्ट तुला या मदर्स डे ला घेण्यापेक्षा तुझे मनापासून आभार मानायचे आहेत, कारण तू मला या जगात आणलंस. काय चांगलं आणि काय वाईट यामध्ये फरक शिकवलास आणि मुळात कोणीही कितीही वाईट वागलं तरी आपण चांगलंच वागायचं, कर्माचं फळ इथेच भोगावं लागतं हे अगदी कुठेतरी मनात खोलवर बिंबवलंस, म्हणूनच आज आजूबाजूला इतकी चांगली माणसं गोळा करू शकले आहे. अगदी काहीही झालं तरी एका हाकेवर धावत येणारी माणसं आज तुझ्यामुळे आणि बाबांमुळेच मी माझ्या आयुष्यात आणू शकले आहे.

‘मदर्स डे’ निमित्त खास कविता

खरं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आईचं स्थान हे वेगळंच आणि अर्थात प्रथम स्थान असतं. पण ते दर्शवण्याची संधी कधी मिळत नाही. ज्यांना ती मिळते ते लोक नक्कीच भाग्यवान असतात. आई आपल्यासाठी काय करत नाही? अगदी वेळेला पोटाला चिमटा काढून आमचं पोट भरलं आहेस. हे कधीही न विसरता येण्यासारखं आहे. बोलायला येत नव्हतं तेव्हा कसं गं कळत होतं तुला की, मला नक्की काय हवंय. रात्र रात्र उशाशी बसून आमचं आजारपण काढणारी तू. तुला कधीच आजारी होऊन पडून राहीलेलं पाहिलं नाही. प्रश्न पडतो की, आम्ही आजारी पडतो काही न करता. पण तू सकाळी पाचला उठल्यापासून रात्री बारापर्यंत अव्याहत काम करत असतेस आणि तरीही सतत हसत काहीही कुरकूर न करता. हे गुण ना माझ्याकडे पण तुझ्याकडूनच आले आहेत कदाचित. जेव्हा लोक विचारतात इतकी हसत असतेस, दमत नाहीस का? एनर्जी आणतेस कुठून…आता उत्तर मला मिळालं आहे. तुझ्याकडूनच येते ती सगळी एनर्जी.

थँक्स तर म्हणायचं आहेच गं आई, पण त्याचबरोबर सॉरी पण म्हणायचंय. तू इतकं सगळं प्रेमाने करत असताना तुला नकळत दिलेली दुःख आजही आठवतात. पण ते त्या वयात नकळत घडत गेलं. तू काळजीनेच सगळं करत होतीस सांगत होतीस, पण त्या वयात ती अक्कल नव्हती. कळत नव्हतं की, तू सांगत आहेस ते माझ्या चांगल्यासाठीच आहे. पण आता ती प्रत्येक गोष्ट जाणवते. एक वय निघून गेल्यावर सगळं कळायला लागलं आणि मी घडत गेले. सगळ्या चुका मागे सोडल्या आणि नव्याने जगायला तुझ्यामुळेच लागले. ध्येय एकच होतं ते म्हणजे तुझं आणि बाबांचं नाव मोठं करायचंय. तुमचं नाव कुठे खराब होऊ द्यायचं नाहीये. पण या सगळ्यासाठी बळ मिळालं ते पण तुझ्याकडूनच. सॉरी यासाठी आई की, त्यावेळी तुला दिलेली उलट उत्तरं वाईट होती. तेव्हा अर्थात तुझा मार खाल्ला. पण आज त्या मारामुळे आणि ओरड्यामुळेच चांगल्या वाईटातील फरक जाणवतोय.

थँक्स त्या प्रत्येक गोष्टीसाठी, मी दमून आल्यानंतर मला आवडणारी वाफाळलेली कॉफी लगेच समोर आणण्यासाठी. मला खायला काय आवडतं ते लक्षात ठेऊन प्रत्येकवेळी आल्यानंतर कितीही घाईत असलीस, दमली असलीस तरीही ती गोष्ट माझ्यासाठी करून ठेवण्यासाठी. मग अगदी ती साधी पोळी भाजी असली तरीही. त्या पदार्थांंमध्ये तुझ्या हाताची चव उतरते कदाचित. म्हणून दुसऱ्या कोणाच्याही हातचे पदार्थ आवडत नाहीत मला. जन्मापासून जोडलेली ती नाळ त्यावेळी डॉक्टर्स तोडतात. पण अदृष्य रूपात कायम आईबरोबर जोडलेली राहाते असं म्हटलं ना तर खरंच मला नाही वाटतं की, ती अतिशयोक्ती असेल.

माझीच आई असं नाही, जगातील कोणतीही आई असो ती आपल्या बाळासाठी झटतेच. मग अगदी ते कुटुंब श्रीमंत असो वा गरीब. प्रत्येक आईच्या नजरेत आपलं मूल हे उत्कृष्टच असतं. भले ती आई आपल्या मुलासमोर ते जाणवू देणार नाही. पण इतरांशी बोलताना आई तू ज्या तऱ्हेने माझ्याबद्दल बोलतेस ना? तो अभिमान तुझ्या बोलण्यातून जाणवतो आणि त्यासाठी मी कायम झटत राहीन.

आजपर्यंत जे काही झालं अथवा मी जे काही करत आहे, त्यामध्ये तुझा नेहमीच मोलाचा वाटा राहिला आहे आणि राहील.

आई तुला आणि जगभरातील सर्व आईंना Happy Mother’s Day च्या शुभेच्छा.

कायम तुझीच

फोटो सौजन्य – Shutterstock, Instagram 

हेदेखील वाचा – 

म्हणून यंदा नक्की साजरा करा ‘मातृदिन’, द्या हे अमूल्य गिफ्ट
मातृदिनासाठी शुभेच्छा संदेश (Mothers Day Wishes In Marathi)
Mothers Day Wishes in Hindi
Maa Quotes in Hindi
Poetry on Mothers Day in Hindi

Read More From Family