औरंगाबाद हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. औरंगाबाद पर्यटन स्थळेही अनेक आहेत. या सुट्टीमध्ये तुम्हाला जर या ऐतिहासिक शहराला भेट द्यायची असेल तर औरंगाबाद मधील पर्यटन स्थळे (Aurangabad Paryatan Sthal) नक्की कोणती आहेत आणि तिथे कसे जाता येते अथवा औरंगाबाद पर्यटन स्थळे यांची योग्य आणि इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. आपणच आपल्या पुढच्या पिढीला अशा ऐतिहासिक ठिकाणी फिरवून व्यवस्थित इतिहास समजून द्यायला हवा. तरच पुढची पिढी अभिमानाने आपल्या शहरांचा इतिहास सांगू शकेल. या सुट्टीत जर तुमचा बेत औरंगाबादला फिरायला जायचा होत असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा, जेणेकरून होईल तुम्हाला फायदा. त्यापूर्वी आपण जाणून घेऊया औरंगाबादचा इतिहास.
Table of Contents
- औरंगाबादचा इतिहास – History Of Aurangabad In Marathi
- औरंगाबाद पर्यटन स्थळे यादी – List Of Tourist Places Of Aurangabad In Marathi
- औरंगाबाद पर्यटन स्थळे ठिकाणे | Most visited places in Aurangabad district In Marathi
- औरंगाबाद मधील इतर बघण्यासारखी ठिकाणे
- औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध हस्तकला
- औरंगाबादला कसे पोहोचायचे – How To Go Aurangabad In Marathi
- प्रश्नोत्तरे (FAQ)
औरंगाबादचा इतिहास – History Of Aurangabad In Marathi
मुघल सम्राट औरंगजेब (इ. स. 1659 – इ. स. 1707) याच्या नावावरून त्याच्या मृत्यूनंतर शहराला औरंगाबाद असे नाव देण्यात आले असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. औरंगाबादचे मूळ नाव खडकी असे होते. संभाजीनगर अशीही या शहराची औळख आहे. 52 दरवाजांचे हे शहर आहे. अजूनही जुन्या औरंगाबाद शहरामध्ये अनेक महाद्वार आढळून येतात. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठही औरंगाबदमध्ये असून हे औद्योगिक शहर म्हणून वेगाने वाढत आहे. तर महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे हे शहर मानले जाते.
औरंगाबादचा इतिहास हा सातवाहन काळातील असल्याचे सांगण्यात येते. राजा विक्रमादित्याच्या काळातही या शहराचा उल्लेख आहे. आताचे औरंगाबाद अर्थात आधीच खडकी असा याचा उल्लेख आढळतो. सातव्या शतकामध्ये या गावाच्या उत्तरेला बुद्धलेणी आणि विहीर खोदण्यात आली होती. तर नंतर 14व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांचे इथे राज्य असल्याचा उल्लेखही आहे. तर काही इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार, 1604 मध्ये अहमदनगरचा निजामशहा मुर्तझा द्वितीय याचा मंत्री असणारा मलिक अंबर याने औरंगाबाद शहर वसवले आणि याचे नाव बदलून फतेहपूर असे ठेवले होते. 1634 मध्ये औरंगजेब या शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला आणि नंतर पुन्हा आग्र्याला निघून गेला. तर 1681 मध्ये मुघल बादशाह असताना इथे आला आणि आपल्या मृत्यूपर्यंत इथेच राहिला. इथेच खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे असं सांगण्यात येते. तर त्यानंतर निझामाने या शहराचा ताबा घेतला. 1889 मध्ये औरंगाबादमध्ये पहिली कापूस गिरणी चालू झाली आणि नंतर 700 लोकांना रोजगार मिळाला असा या स्थळाचा इतिहास आहे.
औरंगाबाद पर्यटन स्थळे यादी – List Of Tourist Places Of Aurangabad In Marathi
औरंगाबादमध्ये अनेक स्थळे आहेत जी फिरण्यासारखी आणि पाहण्यासारखी आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची औरंगाबाद पर्यटन स्थळे तुम्हाला आम्ही इथे देत आहोत. औरंगाबाद पर्यटन स्थळे यादी पुढीलप्रमाणे –
वेरूळ लेणी (Ellora Caves)
अजंठा लेणी (Ajanta Caves)
दौलताबाद गड (Daulatabad Forts)
घृष्णेश्वर मंदिर (Ghrishneshwar temple)
बिबी का मकबरा (Bibi ka Maqbara)
जायकवाडी धरण (Jayakwadi Dam)
सिद्धार्थ गार्डन (Siddharth Garden)
छत्रपती शिवाजी संग्रहालय (Chhatrapati Shivaji Museum)
सलीम अली तलाव (Salim Ali Lake)
पिठलखोरा लेणी (Pitalkhora Caves)
बानी बेगम गार्डन (Bani Begum Garden)
कैलास मंदिर (Kailas Mandir)
वाचा – निसर्गरम्य महाबळेश्वर पर्यटन स्थळे
औरंगाबाद पर्यटन स्थळे ठिकाणे | Most visited places in Aurangabad district In Marathi
औरंगाबाद हे अत्यंत सुंदर शहर असून याठिकाणी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला फिरता येते आणि औरंगाबादला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशी अनेक ठिकाणे आहेत त्याची इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
वेरूळ लेणी (Ellora Caves)
एलोरा लेणी (Ellora Caves Information in Marathi) ही जगप्रसिद्ध आहे. एलोरा हा जागतिक वारसा स्थान आहे. पुरातन वास्तु असून हे वास्तुकलेचे प्रतीक आहे. यामध्ये 34 लेणी असून प्रत्यक्षात चारणंद्री टेकड्यांमध्ये खोदल्या आहेत. बौद्ध, हिंदू आणि जैन मंदिरे आणि मठ असे साधारण 5 व्या आणि दहाव्या दशकापासून बांधलेले आहेत. यामध्ये 12 बौद्ध लेणी तर 5 जैन मंदिरे आहेत. भारत शासनाने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले असून हे सध्या पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आलेले आहे. तर युनेस्कोने 1983 मध्ये वेरूळ लेण्यांचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये केला आहे. यामधील कैलास मंदिर हे कौशल्यांचा अद्भुत नमुना आहे असे मानण्यात येते. या लेण्यांमध्ये विहार, प्रार्थनागृह, बौद्ध भिख्खूल यांचे निवासस्थान, गौतम बुद्ध यांची शिल्पं, तसंच शिल्पांचं अंकन पाहायला मिळते.
वेरूळला कसे पोहचावे – विमानतळ 36 किमी अंतरावर आहे. तर रेल्वे स्टेशनदेखील साधारण 36 किमी अंतरावर आहे. रेल्वेपासून बस अथवा खासगी वाहनाने तुम्ही पोहचू शकता. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम.
अजिंठा लेणी (Ajanta Caves)
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात अजंठा लेणी वसलेली आहे. 2 ऱ्या शकतापासून ते 4 थ्या शतकाच्या अशा कालखंडामध्ये 29 बौद्ध लेणी इथे निर्माण करण्यात आल्या आहेत. वाघूर नदीच्या आसपास या लेणी आहेत. तर डोंगरावरील कातळांवरील या लेण्या अतिशय सुंदर आहेत. बौद्ध धर्माचा वारसा जपणाऱ्या या लेणी प्रसिद्ध असून भारतीय केंद्रीय पर्यटन स्थळ प्रकल्पांमध्ये पहिल्या 12 पर्यटन स्थळांपैकी या लेणी आहेत. तसंच महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी हे एक स्थळ आहे. या लेण्यांपैकी एक चित्र हे भारतीय 20 रूपयांच्या नोटेवरही छापण्यात आलेले आहे. अजिंठा लेणी (Ajanta Caves Information in Marathi) हे केवळ देशीच नाही तर विदेशी पर्यटकांसाठीही सर्वाधिक आवडते स्थळ आहे. लेणी पाहण्यासाठी तुमही मंगळवार ते रविवार सकाळी 9 ते 5.30 या वेळात जाऊ शकता. सोमवारी लेणी पाहता येत नाही. तर संध्याकाळी पाचनंतर कोणत्याही पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही.
अजिंठाला कसे पोहचावे – औरंगाबाद विमानतळावरून साधारण 3 तासाचे अंतर आहे. 120 किमी अंतरावर अजिंठा लेणी आहे. विमानतळावरून तुम्ही बस अथवा टॅक्सीने जाऊ शकता. जर ट्रेनने तुम्हाला जायचे असेल तर जळगाव स्टेशनवरून तुम्हाला अजिंठा लेणी साधारण 60 किमी जवळ आहे. औरंगाबाद स्टेशनवरून 120 किमी अंतर आहे. तर रस्त्याद्वारे वाहनाने जायचे असेल तर उत्तम पर्याय आहे.
दौलताबाद किल्ला (Daulatabad Forts)
दौलताबाद (Daulatabad Fort Information in Marathi) हे औरंगाबाद जिल्ह्यात असून याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. मुहम्मद बिन तुघलकची ही राजधानी होती असा इतिहासात उल्लेख आढळतो. तर हे शहर सम्राटांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरले होते. दौलताबादचा किल्ला हा मध्ययुगीन डेक्कनमधील सर्वात शक्तीशाली किल्ला होता. हा असा एकमेव किल्ला होता ज्यावर कोणीही विजय मिळवू शकले नाही. या किल्ल्यामध्ये विहिरी, बरदरी, जलाशय, मिनार, हमाम, विविध मंदिरे, वाड्या, मशिदी आणि रॉककट लेण्या आहेत. हा किल्ला एका विशिष्ट प्रकारच्या नैसर्गिक डोंगरावर असून हा किल्ला इतका मजबूत होता की, शत्रूला तोडणे शक्य नव्हते. दौलताबाद किल्ल्याचे कामही राष्ट्रकुटा राजवंशाने केले होते. या किल्ल्यावर यादव, खिलजी, तुघलक घराण्याचे राज्य होते.
दौलताबाद किल्ल्यावर कसे पोहचावे – औरंगाबाद रेल्वे स्टेशनला उतरून बसने किल्ल्यावर जाता येते. तसंच टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध आहे.
घृष्णेश्वर मंदिर (Ghrishneshwar temple)
औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथून जवळ असणारे हे प्राचीन शंकराचे मंदिर असून घृष्णेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. वेरूळ लेण्यांपासून हे मंदिर अगदी जवळ आहे. तसंच शिवपुराण, रामायण, स्कंदपुराण, महाभारत या ग्रंथांमध्येही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. या मंदिराचा उद्धार 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले (Chatrapati Shivajiraje Bhosale) यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी जिर्णोद्धार केला. तर सध्याचे हे मंदिर नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या जिर्णोद्धारानंतर उभे राहिलेले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अत्यंत सुंदर असून पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरते.
घृष्णेश्वर मंदिरात कसे पोहचावे – औरंगाबाद विमानतळापासून बस अथवा टॅक्सीच्या सहाय्याने तुम्ही मंदिरापर्यंत पोहचू शकता.
बिबी का मकबरा (Bibi ka Maqbara)
आग्र्यातील ताजमहालाची हुबेहूब प्रतिकृती म्हणजे औरंगाबादमधील बिबी का मकबरा. औरंगजेबाची बायको रबिया-उद-दुरानी ऊर्फ दिलरास बानो बेगमच्या आठवणीत बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. तर औरंगजेबाचा मुलगा आझमशाह याने हा मकबरा बांधला असेही इतिहासात सांगण्यात येते. मुलाला जन्म देत असताना औरंगजेबाच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि तिच्या आठवणीतच मुलाने हा मकबरा बांधला अशीही आख्यायिका आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे जयपूरमधून मार्बल आणण्यात आले आणि यासाठी 150 पेक्षा अधिक त्याकाळी वाहनांचा वापर करण्यात आला होता. तर बागेच्या मधोमध असणारा हा मकबरा पर्यटकांसाठी आकर्षण ठरतो. त्या काळात हा मकबरा बांधण्यासाठी सात लाख रूपये अर्थात आताचे साधारण 3.20 कोटी रूपये लागले होते असा अंदाज आहे.
बिबी का मकबरा येथे कसे पोहचाल – औरंगबाद विमानतळापासून केवळ 10 किमी अंतरावर बिबी का मकबरा आहे. तर रेल्वे स्टेशनपासून थोडे दूर आहे. याशिवाय तुम्ही टॅक्सी वा बसचाही वापर करू शकता.
जायकवाडी धरण (Jayakwadi Dam)
आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी प्रसिद्धी असणारे जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असून औरंगाबाद जिल्ह्यात आहे. 60 किमी लांब आणि 10 किमी रूंदी इतका मोठा या धरणाचा पसारा आहे. नाथसागर असेही याला म्हटलं जाते. हे आशिया खंडातील सर्वात मोठे धरण असून हे धरण संपूर्ण भरल्यास, दोन वर्षाची शेती आणि 4 वर्षाच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते असं सांगण्यात येतं. त्यामुळे मराठवाड्याचा समुद्र असंही या धरणाला म्हटलं जातं. तर औरंगबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे पाच जिल्हे जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत. या धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवेही आहेत. ज्यामधून पाचही जिल्ह्यात शेतीसाठी पाणी सोडण्यात येतं. याशिवाय औरंगाबादमधील अनेक औद्योगिक वसाहतीदेखील याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी या धरणाचा महत्त्वाचा हातभार लागतो.
जायकवाडी धरण येथे कसे पोहचावे – औरंगाबाद विमानतळ आणि रेल्वे स्टेशनपासून दूर असल्यामुळे बस आणि टॅक्सी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही स्वतःच्या वाहनानेही येथे जाऊ शकता. आसपास राहण्याची सोयही उपलब्ध आहे.
सिद्धार्थ गार्डन (Siddharth Garden)
सिद्धार्थ गार्डन आणि झू औरंगाबाद प्रसिद्ध आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनपासून 3 किमी अंतरावर आहे. हे तीन भागात विभागले गेले असून गार्डनचा पहिला भाग हा प्राणीसंग्रहालय आहे. ज्यामध्ये पांढरा वाघ, चिता, मगर, साप इत्यादी प्राणी आहेत. तर दुसरा भाग हा बागेचा असून मुलांच्या खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी जागा आहे. पर्यटकांना संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी ही जागा उत्तम आहे. तर सिद्धार्थ गार्डनचा तिसरा भाग हा अक्वेरियमसाठी देण्यात आला आहे. इथे औरंगाबादमधील अत्यंत सुंदर असे मत्स्यालय असून नेहमी गर्दी असते. औरंगाबादमधील समर्थनगर इथे हे स्थित आहे आणि याचे क्षेत्र खूपच मोठे आहे. इथे बुद्धाचा अत्यंत सुंदर स्टॅच्यू असून पाण्याचे कारंजेही आहे. इथे फिरण्यासाठी किमान 2 तास लागतातच. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 हे पर्यटकांसाठी खुले असून मंगळवारी मात्र बंद राहते.
सिद्धार्थ गार्डन कसे पोहचावे – औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून कॅब अथवा टॅक्सी हा योग्य पर्याय आहे. कमी अंतर असल्यामुळे पटकन पोहचता येते.
छत्रपती शिवाजी संग्रहालय (Chhatrapati Shivaji Museum)
रयेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तीमत्व कसे होते, ते दिसायला कसे होते, महाराजांचे राहणीमान, महाराजांचा पेहराव, त्यांचे शौर्य, महाराजांचा पराक्रम हे सर्व मूळ रूप कसे होते हे पाहाण्यासाठी औरंगाबाद येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट द्यायला हवी. शिवाजी महाराजांचा पराक्रम अनेक साहित्यिकांनी, कथाकारांनी, कलावंतांनी आपल्या शैलीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु महाराजांच्या काळात काढलेली त्यांची अत्यंत दुर्मिळ अशी चित्रे या संग्रहालयात मांडण्यात आली आहेत. यासह जुनी शस्त्रे, पेहराव, नाणी, त्याकाळातील पत्रे हे सर्व याठिकाणी जतन करण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी संग्रहालयात कसे पोहचावे – औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून कॅब अथवा टॅक्सी हा योग्य पर्याय आहे.
सलीम अली तलाव (Salim Ali Lake)
भर शहरामध्ये असलेला पाणथळीचा आणि जैव विविधता असणारा असा औरंगाबादमधील एकमेव तलाव आहे तो म्हणजे सलीम अली तलाव. इथे साधारणतः 132 प्रकारचे पक्षी, 30 प्रकारची फुलपाखरे, विविध प्रकारचे किटक आणि विविध प्राणी आढळतात. औरंगाबादमधील अनेक गेटपैकी असणाऱ्या दिल्ली गेटजवळ हा तलाव स्थित आहे. मुघल काळात याचे नाव खिजरी तलाव असे होते. प्रसिद्धी पक्षीतज्ज्ञ सलीम मुईनुद्दीन अब्दुल अली यांच्या नावावरून या जागेला नाव देण्यात आले आहेत. सूर्यादयाच्या वेळी इथे निरीक्षण करण्यासाठी अनेक पर्यटक येतात.
सलीम अली तलाव येथे कसे पोहचावे – तुम्ही स्वतःच्या वाहनानेही येथे जाऊ शकता अथवा औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून कॅब अथवा टॅक्सी हा योग्य पर्याय आहे.
पितळखोरे लेणी (Pitalkhora Caves)
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडजवळ पितळखोरे लेणी असून ही शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. ही लेणी अजिंठा – वेरूळ लेण्यांपेक्षाही प्राचीन मानली गेली आहे. या लेण्यातील काही गुहा या दुमजली असून वर जाण्यासाठी भुयारांमधून पायऱ्या खोदलेल्या दिसून येतात. तर मुख्य गुंफा म्हणजे एक चैत्य आहे. याठिकाणी 35 स्तंभ असून यावर धवल, कृष्ण, रक्त आणि पिंगट रंगामध्ये रंगवलेली बौद्ध संन्यास्यांची काही चित्रेही आहेत. तसंच येथे भारतीय वास्तु शिल्पात दाखवलेला पहिला गजथरही आहे. या लेण्यामधील राजा – राणीचे शिल्प अप्रतिम मानले जाते. तसंच भारतीय शिल्पकलेतील एक उत्तम नमुना म्हणूनही याकडे पाहिले जाते. येथे 18 बौद्ध लेण्यांचा समूह आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 हे पर्यटकांसाठी खुले असते. ऑगस्ट ते फेब्रुवारी हा इथे भेट देण्याचा उत्तम काळ आहे.
पितळखोरे लेणी येथे कसे पोहचावे – तुम्ही स्वतःच्या वाहनानेही येथे जाऊ शकता अथवा औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून कॅब अथवा टॅक्सीदेखील उपलब्ध आहेत.
बानी बेगम गार्डन (Bani Begum Garden)
औरंगाबादमध्ये अत्यंत मनोहारी असे हे बानी बेगम उद्यान आहे. आरामदायी आणि सुखदायी अशी ही बाग असून औरंगजेबचा मुलगा आजमशाहच्या पत्नीच्या बानी बेगमच्या नावावरून हे उद्यान ओळखण्यात येते. इथे बानी बेगमची कबरदेखील आहे. तसंच या उद्यानात कारंजे, सुगंधित खांब असून हे सर्व मुघल शैलीत बांधण्यात आले आहे. संध्याकाळी मनोहारी वातावरणात तुम्ही फिरू शकता.
पितळखोरे लेणी येथे कसे पोहचावे – तुम्ही स्वतःच्या वाहनानेही येथे जाऊ शकता अथवा औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून कॅब अथवा टॅक्सीदेखील उपलब्ध आहेत.
कैलास मंदिर (Kailas Mandir)
जगातील काही आश्चर्यकारक स्थापत्यांपैकी औरंगाबादमधील कैलास मंदिर हे एक आश्चर्य मानण्यात आलं आहे.वेरुळ मंदिराला आणि कैलास मंदिराला स्थापत्यकलेतील एक शिल्प असे समजण्यात येते. 200 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 100 फूट उंच अशा खडकामधून हे कोरून काढण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे या मंदिराचं स्थापत्य करणाऱ्यांना हजार वर्षांपूर्वीदेखील भूगर्भशास्त्राचे सखोल ज्ञान होते. या मंदिराची निर्मिती ही ‘आधी कळस मग पाया’,अशा तत्त्वावर करण्यात आली आहे. हे मंदिर बनवण्यासाठी साधारण 150 वर्षं लागली असावी असा अंदाज संशोधकांनी मांडलेला आहे. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे, असं हिंदू पुराणांमध्ये म्हटलंय. त्याप्रमाणे हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात.
कैलास मंदिरात कसे पोहचावे – विमानतळ 36 किमी अंतरावर आहे. तर रेल्वे स्टेशनदेखील साधारण 36 किमी अंतरावर आहे. रेल्वेपासून बस अथवा खासगी वाहनाने तुम्ही पोहचू शकता. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम.
औरंगाबाद मधील इतर बघण्यासारखी ठिकाणे
आपण वर औरंगाबादमधील फिरण्याची महत्त्वाची ठिकाणे जाणून घेतली. पण औरंगाबादमध्ये अजूनही अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता. यापैकी काही ठिकाणांची माहिती
पाणचक्की – पाणचक्की हे औरंगाबाद शहराचे मोठे आकर्षण आहे. याला पाणी मिल अशीही ओळख आहे. जलसाठ्याचे एक अनोखे उदाहरण आहे. ही अद्भुत पाण्याची मिल, आटा चक्की इतिहासातील अत्यंत अद्वितिय गोष्ट आहे. इथे संत बाबा शाह मुसाफिर यांचेही वास्तव्य होते. पाणचक्कीतील अतिरिक्त पाणी हे खाम नदीमध्ये समाविष्ट होते. इंजिनिअरिंगचा हा अद्भुत नमुना मानला जातो. या परिसरात औरंगजेबाच्या काळातील उद्याने, बाबा शाह मुसाफिर यांची कबर, जमा मस्जिद आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे कार्यालयदेखील आहे.
खुल्दाबाद – एक ऐतिहासिक परंपरा लाभलेले असे हे गाव आहे. भद्रा मारूती मंदिराशिवाय येथे ऐतिहासिक राजवंशी, बादशाह, दरबारी यांच्या कबरही आहेत. हे गाव रत्नापूर नावानेही ओळखण्यात येते. या ठिकाणी 1500 सुफी संताच्या कबरी आहेत ज्यामध्ये मुगल बादशाह औरंगजेब, अहमदशाह, मलिक अंबर, जानी बेगम, संत जैनुलहक, राजू कत्तार यांच्या कबरींचा समावेश आहे.
सोनेरी महाल – औरंगाबादच्या पहाडसिंहपुरा क्षेत्रात सोनेरी महाल आहे. विशिष्ट राजपूत शैलीत बांधण्यात आलेला हा दोन मजली बंगला आहे. चुना आणि दगडाने हा बांधण्यात आला होता. बुंदेलखंडच्या सरदाराद्वारे हा महाल बनविण्यात आला असून याच्या दरबारातील पेटिंगवर खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंग देण्यात आल्यामुळे याला सोनेरी महाल असे नाव देण्यात आले. याठिकाणी साधारण अकराशे ऐतिहासिक वस्तू आहेत. अनेक नकाशे, शिलालेख, पितळ आणि तांब्याची वस्तू तसंच अनेक देवतांच्या प्राचीन मूर्तीही आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध हस्तकला
- पैठणी सिल्क साड्या – पैठणी हा महाराष्ट्राचा वारसा आहे. सातवाहन काळात पैठणी विणण्याची कला 200 बीसी मध्ये बहरली असं सांगण्यात येते. किमान 2000 वर्षांपेक्षा अधिक काळ पैठणीचे रेशीम काम येथे करण्यात येते. पैठणी शुद्ध रेशीम आणि सोने तसंच चांदीच्या सहाय्याने हाताने विणलेली असते. औरंगाबादच्या या पैठणी अत्यंत प्रसिद्ध आहेत. पदर आणि बॉर्डरवर गुंतागुंतीची रचना हे पैठणी साड्यांचे वैशिष्ट्य आहे. पदरावर साधारणपणे मोर, कमळ, आंबा आणि अजिंठा लेण्यांमधून घेतलेल्या इतर रचना विणल्या जातात. भारतीय लग्नामध्ये विशेष महत्त्व असलेल्या रेशमाच्या वापरामुळे पैठणीला भारतीय परंपरेतही पवित्र मानले जाते.
- पैठणी रेशीम साड्या – पैठणीमध्ये विविधता आहे आणि ही औरंगाबादमध्ये दिसून येते. औरंगाबादमधील पैठण शहर आहे, जिथे या पैठणी हाताने विणल्या जातात. या अत्यंत बारीक रेशमापासून बनविण्यात येतात आणि भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक मानली जाते. पैठणमुळेच याला पैठणी असे नाव पडले आहे. त्यामुळे येथे आल्यानंतर पैठणी घेतली नाही तर त्याठिकाणी जाण्यात काही अर्थच राहात नाही असं मानण्यात येते.
- हिमरू शाल – याशिवाय औरंगाबादमध्ये हिमरू शालही प्रसिद्ध आहे. रेशीम आणि कापसापासून ही बनविण्यात येते. हिमरू हा शब्द पर्शियन शब्द ‘हम-रुह’ वरून घेण्यात आला आहे ज्याचा अर्थ ‘समान’ असा आहे. हिमरू ही कुम-ख्वाबची प्रतिकृती असून प्राचीन काळात सोनेरी आणि चांदीच्या धाग्यांनी विणली होती असे सांगण्यात येते तसंच ही शाल राजघराण्यांसाठी होती. औरंगाबादच्या हिमरू शालीला अनोख्या आणि आकर्षक शैलीसाठी आणि डिझाइनसाठी जास्त मागणी आहे. मध्ययुगीन काळातील राजा आणि राणी यांच्याकडे हिमरू संग्रहाचा मोठा साठा होता असंही सांगण्यात येते.
औरंगाबादला कसे पोहोचायचे – How To Go Aurangabad In Marathi
हवाई मार्गाने:
चिकलठाणा येथील औरंगाबाद विमानतळ येथे शहराचे सेवा देणारे विमानतळ आहे आणि याठिकाणी पोहचण्यासाठी मुंबई, हैदराबाद, दिल्ली, उदयपूर, जयपूर, पुणे, नागपूर, इंदूर याठिकाणावरून विमानाची उड्डाणे आहेत.
रेल्वे मार्गाने:
औरंगाबाद रेल्वे स्टेशन (स्टेशन कोड: AWB तुम्हाला तिकिट बुक करताना हा कोड वापरावा लागतो) भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राच्या नांदेड विभागाच्या सिकंदराबाद-मनमाड विभागामध्ये आहे. औरंगाबादला जाण्यासाठी तुम्हाला अनेक रेल्वेंचा पर्याय उपलब्ध होतो. यामध्ये तुम्हाला औरंगाबाद स्टेशन हा स्टॉपदेखील सापडतो.
बस मार्गाने:
औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांनी देशाच्या सर्व भागांशी चांगले जोडलेले आहे. धुळे-सोलापूर 211 राष्ट्रीय महामार्ग हा या शहरातून जातो. औरंगाबादमध्ये जालना, पुणे, अहमदनगर, नागपूर, नाशिक, बीड, मुंबई इत्यादी रस्त्यांची जोडणी आहे. तुम्ही बस अथवा एस. टी वापर करूनही जाऊ शकता.
स्वतःचे वाहनः
तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाहनानेदेखील जाता येते. योग्य सामान बरोबर असेल आणि तुम्हाला या ठिकाणाचा योग्य मॅप (Map) माहीत असेल तर येथे जाणे सहज शक्य आहे. मात्र यासाठी तुम्ही योग्य ती तयारी करूनच घराबाहेर पडावे.
प्रश्नोत्तरे (FAQ)
प्रश्नः औरंगाबादला जाण्याचा योग्य सीझन कोणता?
उत्तरः तुम्ही औरंगाबादला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर सर्वात चांगला काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. कारण औरंगाबादमध्ये अधिक उन्हाळा असतो. त्यामुळे तुम्ही सहसा थंडीचा हंगाम निवडावा.
प्रश्नः औरंगाबादमध्ये फिरण्यासाठी किती दिवस हवेत?
उत्तरः दोन दिवस आणि एक रात्र औरंगाबाद फिरण्यासाठी पुरेसे ठरते. तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर इतके कमी दिवस ठीक आहेत. अन्यथा 3-4 दिवस आरामात तुम्ही औरंगाबादची सफर करू शकता.
प्रश्नः औरंगाबादमध्ये कोणते पदार्थ अधिक चांगले मिळतात?
उत्तरः औरंगाबादमध्ये जाणार असाल तर तुम्ही तिथले स्थानिक पदार्थ नक्कीच चाखायला हवेत. तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्हाला इथे पर्याय उपलब्ध होतील. शाकाहारी व्यक्तींनाही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय प्रत्येक पर्यटनस्थळाजवळ तुम्हाला खाण्यासाठी पर्याय आहेत.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade