बटाटावडा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. वडापाव हा तर महाराष्ट्राची शान आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात जागोजागी वडापावच्या गाड्या दिसतात. मात्र सध्या कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे सर्वांना काही आठवडे सक्तीने घरी राहवं लागत आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसला पिटाळून लावण्यासाठी सहकुटुंब घरात राहणं हाच एक उत्तम उपाय उरला आहे. आता घरात राहायचं म्हणजे रोज काहीतरी नवनवीन पदार्थ करणं हे आलंच. शिवाय घरात बसून राहण्यामुळे व्यायामदेखील कमी प्रमाणात होत आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला कमी तेलात आणि झटपट होणाऱ्या बटाटावड्यांची रेसिपी शेअर करत आहोत. हे बटाटेवडे तुम्ही कढईभर तेलात नाहीतर चक्क आप्पेपात्रात आणि फक्त चमचाभर तेलात तळू शकता.
आप्पेपात्रात असा बनवा झटपट आणि हेल्ही बटाटावडा –
आप्पेपात्रात बटाटेवडे करणं अगदी सोपं आहे. यासाठी या साहित्य आणि कृतीची पटकन नोंद करा.
आप्पेपात्रातील बटाटेवडे करण्यासाठी साहित्य –
अर्धा किलो बटाटे, दोन चमचे आले लसणाची पेस्ट, चार ते पाच हिरव्या मिरचीचे वाटण, चवीपुरते मीठ, एक चमचा लिंबूरस, एक वाटी बेसन, आप्पे पात्र आणि तेल
आप्पेपात्रात बटाटेवडे करण्याची कृती –
सर्वात आधी बटाटेवडे कुकरमध्ये उकडून घ्यावेत. उकडलेले बटाटे सोलून ते व्यवस्थित कुस्करून एकजीव करावेत. या सारणामध्ये आले लसणाची पेस्ट, मिरचीचे वाटण टाकून पुन्हा एकजीव करावे. सारणाला वरून एक चमचा तेल, हिंग, कडीपत्त्याची फोडणी देऊन वरून लिंबूरस पिळून भाजीचे सारण पुन्हा एकत्र करावे. या सारणाचे आप्पेपात्राच्या आकाराप्रमाणे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत. बेसनाच्या पिठात चवीपुरते मीठ आणि मोहनाचे तेल टाकून भजीप्रमाणे सरसरीत पीठ भिजवून घ्यावे. पीठ भिजवताना ते कढईत तळण्यासाठी केल्या जाणाऱ्या बटाट्यावड्याच्या पीठाप्रमाणे न भिजवता थोडे घट्ट भिजवावे.
कसे तळावे आप्पे पात्रात बटाटेवडे –
आप्पेपात्राच्या खोलगट आकाराप्रमाणे भाजीचे छोटे छोटे गोळे तयार करावेत हे गोळे पिठात घोळवून घ्यावेत. आप्पेपात्रात एक छोटा चमचा तेल सोडावे त्यावर बटाटेवडे सोडावेत आणि वरून झाकण लावावे. बटाट्यावड्यांची एक बाजू तळून झाली की वडे पलटून दुसरी बाजू तळून घ्यावी. गरज असल्यास पुन्हा थोडे तेल वरून सोडावे. गरमागरम आणि स्वादिष्ट बटाटेवडे ओल्या नारळाची चटणी अथवा लसणाच्या तिखट चटणीसोबत खावे. कुटुंबासोबत असे हेल्दी बटाटेवडे खाण्याची मजाच काही और आहे. शिवाय यासाठी वापरण्यात येणारं तेलाचं प्रमाण कढईत डीप फ्राय केलेल्या बटाटावड्यांपेक्षा नक्कीच नगण्य आहे. त्यामुळे तुमच्या फिटनेसवरही याचा विपरित परिणाम होत नाही. आप्पेपात्रातील बटाटेवडे आपल्या नेहमीच्या वड्यांप्रमाणेच लागतात.
सूचना – बटाटेवडे तळण्यासाठी शक्य असल्यास नॉनस्टिक अप्पम पॅन ऐवजी लोखंडी आप्पेपात्राचा वापर करावा ज्यामुळे त्यामाध्यमातून लोहाचादेखील शरीराला योग्य पूरवठा होईल.
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वजण घरीच आहेत. अशा वेळी काहीतरी नवीन शिकण्याची आणि कुटुंबासोबत हेल्दी फूड खाण्याची चांगली संधी आहे. तेव्हा घरच्या घरी मस्त मुंबई स्पेशल बटाटेवड्यांचा बेत आखा आणि परिवारासोबत मिळून मस्त त्याचा आस्वाद घ्या. तेव्हा घरीच राहा आणि अशा पद्धतीने तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या.
आप्पे तर बनवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने