Diet

निरोगी आरोग्याचं रहस्य, सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ

Harshada Shirsekar  |  Nov 15, 2019
निरोगी आरोग्याचं रहस्य, सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ

असं म्हणतात, कितीही महत्त्वाचं काम आले तरीही ती बाजूला सारून आधी सकाळच्या नाश्त्याला प्राधान्य द्यावं. कारण, सकाळच्या नाश्त्यावरच आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो. थकवा जाणवू नये आणि शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी सकाळचा नाश्ता अत्यंत गरजेचा आहे. पण सकाळी रिकाम्या पोटी काय खाल्लं पाहिजे? असा रोजचा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर आम्ही ही समस्या सोडवण्यास तुमची थोडीशी मदत करू शकतो. काही हेल्दी फूड्सची माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा, हे तसं सर्वांनाच माहिती आहे. पण रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचं सेवन केल्यास त्याचा शरीरास सर्वाधिक फायदा होईल, हे तुम्हाला माहीत आहे का? तर आपण याबाबतची माहिती जाणून घेऊया.

दिवसाची पौष्टिक सुरुवात

मध आणि कोमट पाणी एकत्रित करा आणि ते प्या. या पेयापासून तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. सकाळच्या नाश्त्यात जीवनसत्त्वे, प्रोटीन, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा. अंडी, पनीर, सबजा, बदाम, फळांचा सकाळच्या नाश्त्यात अवश्य समावेश करावा. फळांमध्ये विशेषतः संत्रे, पपई खाणं सर्वाधिक फायदेशीर ठरेल. सकाळचा नाश्ता शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे, हे आतापर्यंत तुम्ही कित्येकदा अनुभवलं असेलच. नाश्ता केवळ आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं काम करत नाही तर यामुळे मोठमोठ्या आजारांपासून देखील बचाव होतो. जाणून घेऊया सकाळी कोणते अन्नपदार्थ खाल्ल्यानं अधिक फायदे मिळू शकतात…

(वाचा : मातीच्या भांड्यात शिजवा जेवण आणि मिळतील आरोग्याला फायदे)

1. सफरचंद आणि संत्रे

एक का होईना पण दिवसभरात फळ खाणं अतिशय गरजेचं आहे. महत्त्वाचे म्हणजे फळांचा समावेश सकाळच्या नाश्त्यामध्ये केला तर अगदीच उत्तम. यातही सफरचंद आणि संत्र्यांचं सेवन केल्यास ऊर्जा मिळण्यासह तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती देखील वाढते. संत्र्यामुळे पचन प्रक्रिया योग्य रितीने होते. शिवाय, चयापच प्रक्रियाही चांगली राहण्यास मदत होते.

(वाचा : ब्लड ग्रुपनुसार डाएट फॉलो केल्यास आरोग्याला होतील फायदे)

2.कोमट पाणी आणि मध

सकाळची सुरुवात मध आणि कोमट पाणी प्यायल्यास सर्वात उत्तम. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसून पिणं फायदेशीर ठरेल. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील. सोबतच रोग प्रतिकारकशक्ती देखील वाढते. शरीर डिटॉक्स करण्यातही या पेयाची मदत होते. मध आणि कोमट पाण्यामुळे कित्येक रोगांपासून तुमचा बचाव होतो. 

(वाचा : बद्धकोष्ठता, वजन वाढीमुळे आहात हैराण करा ‘हे’ उपाय)

 

shutterstock

3. बदाम

सकाळी रिकाम्यापोटी बदाम खाल्ल्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायद्यांचा लाभ होतो. रात्री बदाम भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास त्याचे सर्वाधिक फायदे शरीराला मिळतात. बदामामध्ये शरीरासाठी पोषक असे व्हिटॅमिन, मॅगनिज, प्रोटीन फायबर आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडी असे घटक आहेत.

4. सब्जा

सब्जामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड प्रचंड प्रमाणात असतात. विशेषतः वजन घटवण्यासाठी सब्ज्याचा आहारात समावेश केला जातो. तसंच यामुळे शरीराची रोग प्रतिकारक यंत्रणा देखील चांगली राहते.

5. अंडे आणि पनीर

अंड आणि पनीर दोन्ही शरीरासाठी पोषक आहेत. जर तुम्हाला अंड आवडत नसेल तर पनीरचा आवर्जून समावेश करावा. सकाळच्या नाश्त्यात अंडी आणि पनीर खाल्ल्यास प्रोटीन आणि कॅल्शिअम पुरेशा प्रमाणात शरीराला मिळतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी दोन्ही पदार्थ फायदेशीरच ठरतील. 

रिकाम्या पोटी काय खाऊ नये

1. टोमॅटो

त्वचेसाठी टोमॅटो अतिशय उपयोगी आहे. पण टोमॅटो कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण यामध्ये अ‍ॅसिडचं प्रमाण अतिशय आहे. रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्यास पित्त होतं आणि यामुळे पचन प्रक्रियेवर परिणाम होतो.

2. फ्रुट जॅम

अनेकांना सकाळच्या नाश्त्यामध्ये जॅम आणि ब्रेड खाण्याची सवय असते. ही सवय वेळीच नियंत्रणात आणल्यास याचा शरीराला फायदा होईल. कारण ब्रेड जॅम शरीरासाठी पोषक नसून हानिकारक आहेत. यामध्ये कॅलरीज आणि साखरेचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे रिकाम्या पोटी ब्रेड-जॅम खाणं टाळा.

3. दही

आरोग्याच्या दृष्टीनं दही खाणं फायदेशीर असलं तरीही रिकाम्या पोटी  खाऊ नये. कारण याचे पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतात. दुपारच्या वेळेस दही खाणं कधीही उत्तम. पण नेहमी ताज्या दह्याचंच सेवन करा. मुळातच याची चव आंबट असल्यानं शिळं दही खाणं शक्यतो टाळा. शरीररूपी यंत्र सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सकाळच्या  नाश्त्यात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यास विसरू नका. खा हेल्दी आणि राहा हेल्दी.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Diet