Age Care

Valentines Day: व्हॅलेंटाईन डे ला दिसायचंय सुंदर तर असा करा ‘गुलाबपाण्याचा वापर’

Trupti Paradkar  |  Feb 8, 2019
Valentines Day: व्हॅलेंटाईन डे ला दिसायचंय सुंदर तर असा करा ‘गुलाबपाण्याचा वापर’

प्रेमाचा आणि गुलाबांचा खूप जवळचा सबंध आहे. गुलाबाचं फुल हे प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. व्हॅलेंटाईन वीकमधला पहिलाच दिवस रोझ डेने साजरा केला जातो. गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त केल्याने तुमच्या मनातील भावना सहज आणि सोप्या पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहचवता येतात. व्हॅलेंटाईन डे प्रत्येकासाठी स्पेशलच असतो. त्यामुळे या खास दिवशी आपण नेहमीपेक्षा जरा हटके दिसावं असं प्रत्येकाला नक्कीच वाटत असतं. गुलाबाचं फुल केसात माळल्याने जसं एखादी स्त्री सुंदर दिसते त्याचप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबपाण्याचा नियमित वापर करुनही सौदर्य खुलवता येतं. या व्हॅलेंटाईन डेला गुलाबपाण्याचा असा वापर करून तुम्हीही नेहमीपेक्षा अधिक आकर्षक दिसू शकता.
फार पूर्वीपासून गुलाबपाण्याचा वापर हा सौदर्य खुलवण्यासाठी केला जात आहे. कारण गुलाबपाण्यामध्ये अॅंटी ऑक्सिडंट आणि अॅंटी इन्फ्लैमेंटरी गुणधर्म असतात. त्वचा आणि केसांच्या सौदर्यांवर गुलाबपाण्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. गुलाबपाण्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि सतेज दिसू लागते. गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल नियंत्रित राहिल्याने त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. शिवाय गुलाबपाणी एक उत्तम मेकअप रिमूव्हर देखील आहे. दिवसभर धुळ आणि प्रदूषणाने निस्तेज झालेल्या त्चचेवर गुलाबपाणी लावल्याने नैसर्गिक चमक येते. डोळ्यांचा दाह कमी करण्यासाठीही गुलाबपाण्याचा चांगला वापर होतो. कॉस्मॅटिक उत्पादनांप्रमाणेच गुलाबपाणी तुम्ही घरगूती उपायांसाठी वापरू शकता. शिवाय अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला हे गुलाबपाणी घरीच तयार करता येऊ शकतं.

जाणून घेऊया गुलाबपाण्याचे फायदे  (Benefits of Rose Water)

त्वचेला फ्रेश ठेवण्यासाठी

गुलाबपाणी एक नैसर्गिक अॅस्ट्रिंजट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर याचा एखाद्या टोनरप्रमाणे ते वापरता येऊ शकते. त्वचा सुंदर आणि नितळ दिसण्यासाठी त्वचा क्लीजिंग, टोनिंग आणि मॉश्चराईझ करणं फार गरजेचं आहे. मात्र बऱ्याचदा आपण नेहमीच्या बिझी रुटीनमुळे त्वचा टोन करण्याचा कंटाळा करतो. खरंतर टोनिंग हा स्कीन केअरमधील एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे नियमित त्वचा टोन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्वचा टोन करण्याचा एक अगदी सोपा मार्ग म्हणजे कापसाच्या मदतीने गुलाबपाणी चेहऱ्यावर लावणे किंवा वॉटर स्प्रेच्या सहाय्याने गुलाबपाणी चेहऱ्यावर स्प्रे करणे. टोनिंग केल्यामुळे त्वचेला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो. शिवाय पिंपल्स आणि रेडनेसचा त्रासही कमी होतो. ज्यामुळे तुमची त्वचा आपोआप नितळ दिसू लागते. चेहऱ्यावर तेल आणि धुळ राहील्याने पिंपल्स निर्माण होतात मात्र गुलाबपाणी तुमच्या चेहऱ्याची त्वचा खोलवर स्वच्छ करते. नियमित गुलाबपाण्याचा वापर केल्यास त्वचेवरील डाग हळूहळू कमी होऊ लागतात.

सनबर्न पासून सुरक्षेसाठी

गुलाबपाणी थंड गुणधर्मांचं असतं ज्यामुळे सुर्य किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं. सर्नबर्नचा त्रास झाल्यास त्वचेला दाह आणि खाज येते. मात्र गुलाबपाण्यामुळे ही समस्या कमी होऊन त्वचा मऊ होते. त्यामुळे सुर्यप्रकाशात जाण्याआधी चेहऱ्यावर थोडं गुलाबपाणी लावा. याशिवाय संध्याकाळी घरी आल्यावरदेखील तुम्ही गुलाबपाण्याने चेहरा धुवू शकता. उन्हाळ्यात गुलाबपाण्याचा नियमित वापर करायला मुळीच विसरू  नका. कारण गुलाबपाण्यामुळे चेहरा स्वच्छ तर होतोच शिवाय त्वचेला थंडावा मिळतो ज्यामुळे तुम्ही फ्रेश दिसता.

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर  करण्यासाठी

नियमित गुलाबपाणी चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत हे तुम्हाला माहित आहे का ? धकाधकीच्या जीवनातील ताण-तणाव आणि वातावरणात होणाऱ्या बदलांचा तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ लागतो. ज्यामुळे त्वचेवर तरुणपणीच म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात. आजकाल अनेकींना चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येण्याची समस्या सतावत असते. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर चेहऱ्यावर नियमित गुलाबपाणी लावा. गुलाबपाण्याती अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. चेहरा फ्रेश आणि तजेलदार दिसण्यासाठी तुम्ही फेसपॅकमध्येही गुलाबपाणी मिसळू शकता.

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी

दैनंदिन जीवनातील वाढता तणाव आणि अपूरी झोप यामुळे डोळ्याच्या खाली काळी वर्तुळं निर्माण होतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी गुलाबपाणी अगदी जादूसारखं काम करू शकतं. गुलाबपाण्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बी चे गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेची रोगप्रतिकार शक्ती वाढते. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी कॉटन पॅडवर गुलाबपाणी लावून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डार्क सर्कल्स तर कमी होतीलच शिवाय डोळ्यांना थंडावा मिळाल्याने तुम्हाला फ्रेशही वाटू लागेल.

केसांचं सौदर्य वाढविण्यासाठी

गुलाबपाणी कोरड्या आणि निस्तेज केसांना सुंदर करण्यासाठीही फार उपयुक्त ठरेल. गुलाबपाण्यामुळे केसांमधील त्वचा मॉश्चराईझ होते. केसांंमधील त्वचा मऊ झाल्याने त्याचा चांगला परिणाम केसांवर होऊ लागतो. केसांची त्वचा हायड्रेट राहिल्याने केस चमकदार आणि मऊ दिसू लागतात.

डोळ्यांच्या सौदर्यासाठी

डोळ्यासाठी गुलाबपाणी फारच गुणकारी ठरेल. जर डोळ्यांमध्ये कचरा केला असेल अथवा इनफेक्शनमुळे डोळ्यांचा दाह होत असेल तर गुलाबपाण्याचा वापर अवश्य करा. यासाठी तुम्ही एखाद्या आय ड्रापरच्या मदतीने गुलाबपाण्याचे काही थेंब डोळ्यांमध्ये टाकू शकता.नियमित असे केल्यास तुमच्या डोळे स्वच्छ होतात शिवाय डोळ्यांमध्ये नैसर्गिक चमक देखील येते.

दातांच्या आरोग्यासाठी

गुलाबपाणी त्वचेप्रमाणेच दातांवरही चांगले फायदेशीर ठरते. कोणत्याही प्रकारच्या दातांच्या समस्या यामुळे कमी होऊ शकतात. गुलाबपाण्यामुळे दात मजबूत तर होतातच शिवाय दातांमधील सूज आणि हिरड्यांच्या समस्याही कमी करता येतात. नियमित गुलाबपाण्याचा वापर केल्यास तोंडाला येणारा दुर्गंध कमी होतो. यासाठी नियमित गुलाबपाण्याने चुळ भरा. असं केल्याने तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.

गुलाब पाण्याचा वापर आणखी कसा कराल?

फेस पॅक तयार करण्यासाठी

गुलाबपाण्याचा वापर फेसपॅक तयार करण्यासाठी करण्यात येतो. गुलाबपाण्याचा वापर केलेला फेसपॅक अथवा  फेसमास्क तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच चांगला परिणामकारक ठरू शकतो.

गुलाबपाण्याचा वापर कसा कराल-

गुलाबपाणी आणि दूध एकत्र करून एक पेस्ट तयार करा. आता या पेस्टने तुमच्या चेहऱ्यावर कमीतकमी पाच मिनीटे मसाज करा. चेहऱ्यावर हे मिश्रण थोड्यावेळ तसेच ठेवा आणि काही मिनीटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. शिवाय गुलाबपाणी, लिंबूरस आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. दहा मिनीटे चेहऱ्यावर मसाज करा. वीस मिनीटांनी ठंड पाण्याने चेहरा धुवा.

हेअरमास्क साठी

केसांवरही गुलाबपाण्याचा चांगला फायदा होतो. कोरडे आणि फ्रिझी केस गुलाबपाण्याच्या वापराने चमकदार होऊ शकतात. शिवाय गुलाबपाणी नैसर्गिक असल्याने त्यामध्ये केमिकल्स नसतात ज्यामुळे केसांवर दुष्परिणाम होत नाहीत.

कसा वापर कराल

ग्लिसरीन आणि गुलाबपाणी समप्रमाणात घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा. या मिश्रणाने केसांच्या मुळांवर हलक्या हाताने मसाज करा. पंधरा मिनीटांनी केसांना शॅम्पू करा. केस कोरडे  आणि निस्तेज झाले असतील तर आठवड्यातून एकदा केसांवर हा प्रयोग करा.

घरीच कसे तयार कराल गुलाबपाणी?

खरंतर बाजारात गुलाबपाणी सहज मिळू शकतं पण घरीच स्वतःच्या हाताने गुलाबपाणी तयार करण्यात एक वेगळंच समाधान आहे. शिवाय कधीकधी बाजारामधील गुलाबपाणी भेसळयुक्त असण्याची शक्यता असते.

साहित्य-

भरपूर गुलाबाच्या पाकळ्या आणि डिस्टिल्ड वॉटर

कृती-

गुलाबाच्या फुलांपासून पाकळ्या वेगळ्या करा आणि कोमट पाण्यामध्ये त्या स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे या पाकळ्यांवर धुळ आणि प्रदूषण राहणार नाही. त्यानंतर एका मोठ्या भाड्यांमध्ये या पाकळ्या ठेवा आणि पाकळ्या बुडतील एवढंच डिस्टिल्ड वॉटर वरुन टाका. या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांना काही वेळ बुडवून ठेवा. नंतर ते भाडं झाकण ठेऊन मध्यम आचेवर गरम करा. 20 ते 30 मिनीटे म्हणजे पाकळ्यांचा रंग उडेपर्यंत ते मिश्रण उकळू द्या. या मिश्रणाला थंड झाल्यावर एका बंद झाकणाच्या डब्बात झाकून ठेवा. गरजेनुसार तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता.

गुलाबपाणी वापरण्याचे तोटे (Side Effects of Rose Water)

खरंतर गुलाबपाणी नैसर्गिक असल्याने त्याचे खूप कमी तोटे असतात. मात्र जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तर गुलाबपाण्याचा वापर न केलेलाच बरा. कारण अशा त्वचेवर गुलाबपाण्याने खाज येऊ लागते.

याचसोबत बाजारातून गुलाबपाणी खरेदी करताना त्याच्यावरील शुद्धता आणि गुणवत्तेची अवश्य खात्री करुन घ्या. कारण जर भेसळयुक्त गुलाबपाण्यानेही तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकतं. तुमची त्वचा संवेदनशील नसेल तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे गुलाबपाणी वापरू शकता. त्यामुळे नियमित गुलाबपाण्याचा वापर करा  आणि तुमचे सौदर्य अधिक खुलवा.

अधिक वाचाः

‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या

कोरड्या त्वचेला मऊ आणि मुलायम करण्यासाठी वापरा ‘हे’ ब्रॅंडेड आणि होममेड मॉश्चराईझर

म्हणून येथील त्वचा काळवंडते, जाणून घ्या या मागील कारणे आणि उपाय

फोटोसौजन्य – Shutter Stock

 

 

Read More From Age Care