Destination Weddings

डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही ’10’ ठिकाणं आहेत परफेक्ट (Destination Wedding Places In Maharashtra In Marathi)

Trupti Paradkar  |  May 3, 2019
डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही ’10’ ठिकाणं आहेत परफेक्ट (Destination Wedding Places In Maharashtra In Marathi)

लग्नसोहळा कसा असावा याबाबत प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. कुणाला अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचं असतं तर कुणाला लग्नसोहळा अगदी धुमधडाक्यात व्हावा अशी इच्छा असते. प्रत्येकाचं मत काहिही असलं तरी आपला लग्नाचा दिवस अविस्मरणीय व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. आजकाल ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा जमाना आहे. त्यामुळे अगदी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे स्वप्नवत लग्नसोहळा तुम्ही साजरा करू शकता. अनेक सेलिब्रेटीदेखील रोजच्या दगदगी पासून दूर जाऊन डेस्टिनेशन वेडिंगला पसंती दर्शवतात. डेस्टिनेशन वेडिंगमुळे तुम्हाला लग्न घाईघाईत उरकावं लागत नाही. मंगलकार्यालयातील वेळेची बंधनं अशा लग्नसोहळ्यात पाळावी लागत नाही. लग्नाच्या आधीचे मेंदी, हळद आणि संगीत या सारखे विधीदेखील मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत आरामात आणि आनंदात साजरे करता येतात. डेस्टिनेशन वेडिंगमुळे नववधू आणि नववर यांच्या कुटुंबाला एकत्र राहण्याची आणि एकमेंकांना समजून घेण्याची संधी मिळते. डेस्टिनेशन वेडिंगमुळे खऱ्या अर्थाने दोन कुटुंब जवळ येतात. भारत आणि भारताबाहेर डेस्टिनेशन वेडिंगसाठी अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. मात्र लग्नसोहळा शानदार आणि शाही थाटात करायचा असेल तर आपल्या महाराष्ट्रात देखील काही खास डेस्टिनशन वेडिंग ठिकाणं नक्कीच आहेत. जिथे दोन – चार दिवस राहून तुम्हाला तुमचा लग्नसोहळा आनंदात साजरा करता येतो. शिवाय महाराष्ट्रातील या डेस्टिनेशन वेडिंगचे पर्याय तुमच्या बजेटच्या बाहेर मुळीच नाहीत. तुमच्या घरात लग्नाच्या मंगलकार्याची बोलणी सुरू झाली असतील तर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या आणि कार्यक्रमाची रंगत वाढवणाऱ्या या ठिकाणांचा विचार जरूर करा. 

सगुणाबाग

कर्जत

महाबळेश्वर

जाधवगड

महाराष्ट्रात डेस्टिनेशन वेडिंगसाठी बेस्ट ठिकाणं (Best Destination Wedding Places In Maharashtra)

1. पुण्यातील ढेपेवाडा (Dhepewada In Pune)

डेस्टिनेशन वेडिंगसाठी पुण्यातील ‘ढेपेवाडा’ सध्या फारच लोकप्रिय होत आहे. अनेक सेलिब्रेटीजंनी या ठिकाणी आपली लग्नगाठ बांधली आहे. खरंतर महाराष्ट्राला ऐतिहासिक वाडासंस्कृतीचा परिसस्पर्श लाभलेला आहे. अनेकांना पिढ्यानपिढ्या भव्यदिव्य वाड्यात राहण्याचं सौभाग्य लाभलं असेल. मात्र वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा हव्यास यामुळे महाराष्ट्रातील अनेक वाडे आज जमिनदोस्त झाले आहेत. मात्र काही वास्तूप्रेमींनी आपले राजेशाही वाडे आजही त्याच दिमाखात उभे ठेवले आहेत. शहरीकरणाच्या गर्दीतून लांब आणि ऐश्वर्यात लग्नसोहळा साजरा करायचा असेल तर पुण्यातील ढेपेवाडा एक उत्तम ठिकाण ठरू शकतं. या वाड्यात तुम्हाला लग्नाप्रमाणेच इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करता येऊ शकतं. या वाड्यात तुमच्यासाठी सुसज्ज महाद्वार, नगारखाना, समारंभांसाठी पाचखणी चौक, पारंपरिक स्वयंपाकघर, माजघर, विहीर, बंब, घंगाळ असे पूर्वीचे न्हाणीघर, पारंपरिक लाकडी सजावटीचा दिवाणखाना अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यामुळे तुमच्या विवाहसोहळ्यातील अनेक विधींना एक ऐतिहासिक आणि पारंपरिक टच मिळू शकतो. काही महिन्यां पूर्वीच जय मल्हार फेम सुरभी हांडेचा विवाहसोहळा याच वाड्यात पार पडला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हा ठिकाणी लग्न करायचं असेल तर या ढेपेवाड्याच्या संकेतस्थळाला भेट अवश्य द्या. नितीन ढेपे दापत्यांचा हा वाडा तुमच्या विवाहसोहळ्यासाठी  नक्कीच सज्ज असेल.

2. सगुणाबाग (Sagunbagh)

नेरळपासून काही किलोमीटरच्या अंतरावर वसलेलं सगुणाबाग हे फार्म रिसॉर्ट देखील लग्नसोहळ्यासाठी लोकप्रिय होत आहे. अमेरिकेतील नोकरी सोडून शेखर भडसावळे या एका निसर्गवेड्या माणसाने आपल्या शेतीचं रूपांतर एका इकोफ्रेन्डली रिसॉर्टमध्ये केलं आहे. अनेक लोक या ठिकाणी वन डे अथवा स्टे पिकनिकसाठी येतात. इकोफ्रेन्डली निवास स्थान, मोठमोठे वृक्ष, झोपाळे, नदी, धबधबे, बैलगाडी सफर, शेती अशा अनेक गोष्टींमुळे या ठिकाणाला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. नुकताच सखी गोखले आणि सुव्रत जोशी या सेलिब्रेटी कपलचा  लग्नसोहळा सगुणाबागेत पार पडला. तुम्हाला देखील शहरापासून दूर गावरान स्पर्श असलेला लग्नसोहळा करायचा असेल तर सगुणाबागेला जरूर भेट द्या.

लग्नसोहळ्यासाठी आकर्षक मंडप डिझाईन्स

3. जी. पी. फार्म्स अॅन्ड रिसॉर्ट (G. P. Farms & Resorts)

नाशिक च्या गिरनारे सेक्टरमध्ये दूरवर पसरलेलं जी पी फार्म हाऊस देखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी सदैव सज्ज असतं. शहरापासून जवळ असूनही फार्म हाऊस निसर्गाच्या अगदी जवळ नेणारं आहे. द्राक्षांच्या बागांनी वेढलेल्या फार्म हाऊसमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या राहण्यासाठी उत्तम व्यवस्था केली जाते. शिवाय या ठिकाणी लग्नासाठी हॉल, बन्क्वेट, लॉन ची सजावट करून देण्यात येते. येणाऱ्या पाहुण्यांच्या करमणुकीसाठी निरनिराळे इनडोअर गेम्स, स्विमिंग पुल, फिश फिडींग , शेतीत फेरफटका अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. अभिनेत्री मृणाल दुसानिस हिचा विवाहससोहळा या फार्म हाऊसमध्ये पार पडला होता.

4. कर्जत (Karjat)

कर्जत गावात अनेक फार्म हाऊस आणि रिसॉर्ट आहेत. ज्यामुळे शहरापासून दूर आणि निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही तुमच्या लग्नसोहळ्याचा आनंंद लुटू शकता. कर्जत मध्ये वैजनाथ शहरात वसलेल्या जीवनविद्या ज्ञानपीठात देखील सुंदर पद्धतीने विवाहसोहळा करता येऊ शकतो. हे ज्ञानपीठ दहा एकरात बांधण्यात आलेलं आहे. सदगुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन या संस्थेने या ज्ञानपीठाची निर्मिती केलेली आहे. या ज्ञानपीठात वर्षभर जीवनविद्या तत्वज्ञानावर आधारित विविध कोर्सेस आयोजित केले जातात. मात्र आगावू बुकींग केल्यास लग्नसोहळ्याचं आयोजनदेखील या ठिकाणी करता येऊ शकतं. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे ठिकाण फार सुंदर आहे. मात्र या ठिकाणचे पावित्र्य सांभाळून या अध्यात्मिक ठिकाणाला कोणतंही गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. निसर्गरम्य ठिकाण आणि सकारात्मक उर्जेत तुम्हाला तुमच्या संसाराला सुरूवात करायची असेल तर जीवनविद्या ज्ञानपीठाच्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकर हिचा विवाहसोहळा या ज्ञानपीठातच पार पडला होता.

                                                                        वाचा- वधू वरांना देण्यासाठी शुभेच्छा संदेश

5. लोणावळा (Lonavala)

लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं उन्हाळ्यात फिरण्यासाठी लोकप्रिय आहेत. बरेच लग्नसोहळे एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये आयोजित केले जातात. जर तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी लग्नसोहळ्याचा आनंद लुटायचा असेल तर लोणावळा-खंडाळामधील एखादे रिसॉर्ट बुक करा. ज्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यातही लग्नसोहळ्याचा अगदी छान आनंद लुटता येऊ शकतो. या ठिकाणी गेल्यामुळे दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांना  एक छान ब्रेक मिळू शकतो. ज्यामुळे तुमचा विवाहसोहळा सर्वाच्या छान लक्षात राहू शकतो. दोन-चार दिवस आधीच गेल्यामुळे तुम्हाला लग्नाची दगदगदेखील जाणवणार नाही.

6. अलिबाग (Alibagh)

डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्हाला असं ठिकाण हवं असतं जे प्रेक्षणीय असेल आणि तुमच्या बजेटमध्येदेखील असेल. त्यामुळे तुमच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी अलिबागची निवड करू शकता. अलिबागला मिनी गोवा असंही म्हटलं जातं. गोव्यात अनेक लोक डेस्टिनेशन वेडिंगचा आनंद तुटतात. कारण तिथे अथांग समुद्रकिनारे आणि रिसॉर्ट आहेत. मात्र त्यामुळे लग्नाच्या सिजनमध्ये गोव्याला फार गर्दी असते. समुद्रकिनारी लग्नसोहळ्याचा आनंद तुम्ही महाराष्ट्रातील अलिबागमध्येदेखील नक्कीच लुटू शकता. एव्हरग्रीन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कोवर यांनी मागच्या वर्षी अलिबागमध्येच डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.

7. माथेरान (Matheran)

रायगड जिल्हातील माथेरान थंड हवेचं ठिकाण आहे. दरवर्षी पिकनिकसाठी अनेक पर्यटक माथेरानला भेट देतात. मात्र माथेरानला डेस्टिनेशन वेडिंग करणं नक्कीच हटके ठरेल. मुंबई आणि पुण्यापासून माथेरान अगदी जवळ असल्याने लग्नसोहळ्यासाठी हे ठिकाण अगदी बेस्ट ठरेल. माथेरानमध्ये अनेक हॉटेल्स आणि व्हिला आहेत जिथे एडवान्स बुकींग करून तुम्ही तुमच्या लग्नाचा वेन्यू ठरवू शकता.

8. महाबळेश्वर (Mahabaleshwar) 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन थंड हवेच्या ठिकाणांना भेट द्यायला कोणाला आवडणार नाही. त्यामुळे लग्नासाठी जर तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना महाबळेश्वरला येण्याचं आमंत्रण दिलं तर ते नक्कीच खुश होतील. नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत मजा मस्ती करत लग्नाचे विधी करण्यात एक वेगळीच मौज येऊ शकते. शिवाय यामुळे तुमचा विवाहसोहळा सर्वाच्या नेहमीच लक्षात राहू शकतो. या उन्हाळ्यात सर्वांना थंड हवेच्या ठिकाणी गेल्याचा आनंददेखील घेता येईल. संसाराची सुरूवात अशा मनमोहक आणि रम्य ठिकाणी सर्वांच्यासोबत करण्याची जर तुमची इच्छा असेल तर डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाबळेश्वरचा जरूर विचार करा.

9. येऊर (Yeyur)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेलं येऊरचं जंगल म्हणजे जणू ठाण्यातील हरित श्रीमंतीच. पर्यटनासाठी हे ठिकाण प्रसिद्ध असलं तरी तिथली शांतता मनाला प्रसन्न करणारी नक्कीच आहे. घनदाट जंगल आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे लग्नासाठी हे ठिकाण अगदी निराळं ठरेल. जंगलाचं सौंदर्य आणि प्राणीजीवनाला त्रास होणार नाही याची काळजी घेत या ठिकाणी लग्नसोहळा आयोजित करण्यास काहीच हरकत नाही. येऊरमध्ये अनेक बंगले आहेत त्यातील एखादा बंगला भाडेतत्वावर घेऊन तिथे तुम्ही लग्नसमारंभ आयोजित करू शकता. शहरापासून फार दूर नसलं तरी चांगला एकांत आणि निवांतपणा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो.

10. जाधवगड (Jadhavgadh)

पुण्यातील सासवड – नारायणपूर रस्त्यावर असलेलं जाधवगड रिसॉर्टदेखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी अगदी मस्त आहे. हॉटेलच्या महाद्वाराजवळ तुतारी आणि ढोल ताशांनी तुमचं स्वागत केलं जातं. आलिशान आणि शाही थाटात लग्नसोहळा करायचा असेल तर ही छोटेखानी गढी तुमच्या कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवेल. सध्या ही गढी विठ्ठल कामत यांनी लीजवर घेतलेली आह आणि तिथे एक हेरिटेज हॉटेल विकसित करण्यात आलं आहे. त्यामुळे पारंपरिक कार्यक्रमांसाठी हे ठिकाण भाडेतत्वावर नक्कीच मिळू शकते.

डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं आम्ही तुम्हाला सूचवली आहेत. या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग करणं फार खर्चिक नक्कीच नाही. लग्नात निमंत्रितांचा चांगला पाहुणचार करण्यासाठी, लग्नातील प्रत्येक विधी निवांतपणे करण्यासाठी, लग्नसोहळा लक्षात राहील असा करण्यासाठी, दोन कुटुंबांना जवळ आणण्यासाठी आणि नववर आणि नववधूच्या सुखी संसाराची अगदी शानदार सुरूवात करण्यासाठी ही ठिकाणं अगदी उत्तम ठरतील. आम्ही सूचवलेले पर्याय तुम्हाला कसे वाटले आणि त्यामधील तुम्ही कोणता पर्याय निवडू इच्छिता हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुमचा लग्नसोहळा अविस्मरणीय होण्यासाठी POPxo मराठीकडून मनापासून शुभेच्छा.

आणखी वाचा

कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी ’25’ पर्यटन स्थळं

नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या

लग्नसराईमध्ये या 15 गाण्यांनी मोहरेल नववधूचे मन (Marathi Wedding Songs)

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक 

Read More From Destination Weddings