Budget Trips

पावसाळ्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ…भंडारदरा

Trupti Paradkar  |  Jul 5, 2019
पावसाळ्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ…भंडारदरा

पावसाळ्यात भटकंती करण्यासाठी पर्यटकांना अनेक ठिकाणं खुणावत असतात. वास्तविक महाराष्ट्राला निसर्गरम्य ठिकाणांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रात पावसात फिरण्यासाठी उत्तम अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत. मात्र जर तुम्हाला निसर्गाचं सानिध्य जवळून अनुभवायचं असेल तर भंडारदरा सर्वोत्तम ठिकाण आहे. नाशिकपासून फक्त 70 किलोमीटरवर वसलेलं भंडारदरा हे निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात तर हे ठिकाण निसर्गप्रेमींना अक्षरशः भुरळ घालतं. इथल्या डोंगरदऱ्या, धबधबे, जलाशय, ओहोळ, धरणाच्या आजूबाजूचा भाग, वनसंपदा ,प्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी यंदा भंडारदऱ्याला जरूर जा.

भंडारदराला कसं जाल

भंडारदराला जाण्याचा खर्च

भंडारदराला जाण्याच्या आणि दोन दिवस राहण्याचा दोन माणसाचा खर्च अंदाजे पाच ते सात हजार रूपये आहे. शिवाय जर तुमच्याकडे तुमचे खाजगी वाहन असेल आणि तुमची जंगलातील आनंद घेत एखाद्या गावातील होम स्टेमध्ये राहण्याची तयारी असेल तर यापेक्षा कमी खर्चात तुम्ही या ठिकाणी राहू शकता. भंडारदरामध्ये सुखसुविधा असलेली अत्याधुनिक हॉटेल्स आहेत आणि निसर्गाचा आनंद लुटत मीठ-भाकरी खात होम स्टे अथवा टेन्टची व्यवस्था देखील तुमच्यासाठी नक्कीच होऊ शकते. तेव्हा नेमकं कोणत्या ठिकाणी राहायचं हा तुमचा प्रश्न आहे.

वाचामहाराष्ट्रातील पर्यटन स्थळे

भंडारदरामधील प्रेक्षणीय स्थळं

भंडारदरा धरणाच्या दोन्ही बाजून वळसा घालत तुम्ही भटंकती करू शकता. भंडारदरा अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडून प्रत्येक व्यक्ती आणि वाहनामागे वनविभागाकडून काही शुल्क आकारण्यात येतात. अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर दोन मार्गांनी तुम्ही धरणाच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकता. संपुर्ण जलाशयाला जंगल आणि गावागावातून प्रदक्षिणा धालण्यासाठी कमीत कमी सात ते आठ तास लागतात. तुम्ही तुमची राहण्याची व्यवस्था करून या विभागात नक्कीच फिरू शकता. या ठिकाणी राहण्यासाठी आणि खाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळच एम.टी.डी.सी आणि खाजगी हॉटेल्स, होम स्टेची व्यवस्था आहे. मात्र तुम्ही पावसाळ्यात या जंगलात फिरण्याचा विचार करत असाल तर एखाद्या गाईड अथवा वाटाड्याला तुमच्यासोबत जरूर घ्या.

भंडारदरा धरण

Instagram

भंडारदरामध्ये प्रवेश करताच समोर येतं ते भंडारदरा धरण आणि पांढरशुभ्र रंधा धबधबा. हे धरण आशिया खंडातील एक जुनं धरण आहे. इंग्रजांच्या काळात बांधलेल्या या धरणाची क्षमता 11 टी.एम.सी  आहे. या धरणाचं मुळ नाव विल्सन डॅम असून यातील जलाशयास आर्थर लेक असं म्हणतात. हे धरण प्रवरा नदीवर बांधलेले आहे. या नदीचा उगम रतनगडावर झालेला आहे. 1926 साली बांधलेलं भंडारदरा धरण महाराष्ट्रातील एक जुनं आणि नितांत सुंदर धरण आहे. धरणाच्या आजूबाजूचा परिसर अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. ज्याच्या डोंगरकडांमधून अनेक धबधबे वाहत असतात.

अम्ब्रेला फॉल

Instagram

पावसाच्या पाण्याने भंडादधरा धरण जेव्हा भरतं तेव्हा त्याचा उपसा करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतात. धरणाच्या भिंतीवरून पडणाऱ्या पाण्यामुळे जो धबधबा निर्माण होतो त्याला अब्रेला फॉल अथवा असं म्हणतात. या धबधब्याचा आकार छत्रीप्रमाणे दिसत  असल्यामुळे त्याला अम्ब्रेला फॉल असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे हा धबधबा जुलै ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाहता येतो.

रंधा धबधबा

Instagram

भंडारदरा धरणापासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. या धबधब्याचा आकार अतिशय विशाल असल्याने तो पावसाळ्यात पाहणं रोमांचकारक असतं.

न्हानी फॉल

वाटेत तुम्हाला न्हानी वॉटरफॉल लागेल. हा उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह पाहण्यास अगदी छान आहे. शिवाय या धबधब्याच्या बाजूने सुरक्षेसाठी लोंखडी पुल तयार केलेला आहे. ज्यामुळे अगदी जवळून पाण्याचे तूषार अंगावर घेत तुम्ही हा धबधबा पाहू शकता.

कळसूबाई शिखर

Instagram

शिवाय भंडारदऱ्याच्या जवळच अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत कळसूबाई शिखर आहे. हे शिखर समुद्रसपाटीपासून जवळजवळ 1646 किलोमीटर उंचीवर आहे. अहमदनगर जिल्हाच्या हद्दीत असलेलं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराची ओळख आहे. सह्याद्रीच्या या उंच शिखरावर कळसुबाईचं मंदिर आहे. या शिखरावरून दिसणारं पावसातलं निसर्गचित्र हे फारच मनोहर आणि नयनरम्य असतं.  शिवाय या जंगलातील अभयारण्यात अनेक वन्यप्राणी आणि विविध प्रकारचे पक्षी आढळतात. दरवर्षी अनेक गिर्यारोहक या ठिकाणी गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी कळसुबाई शिखराकडे कूच करतात.

अमृतेश्वर मंदिर रतनगड

Instagram

भंडारदरापासून काही किलोमीटरवर असलेल्या रतनवाडीत श्री अमृतेश्वर मंदिर आहे. हे मंदिर जवळजवळ 1200 वर्षांपूर्वी बांधलेलं आहे. हेमांडपथी शंकराचे हे मंदिर जितकं प्राचीन आहे तितकंच सुंदर आहे. या मंदिराशेजारी जुन्या बांधणीची विहीर आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात या मंदिरातील शिवलिंग संपूर्णपणे पाण्याखाली जातं. मंदिरातील फक्त गाभाऱ्यात जमा होणारं हे पाणी म्हणजे निसर्गाची एक अद्भूत किमया आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रतनवाडी पर्यंत जलाशयातून बोटीनेदेखील जाता येतं.

नेकलेस फॉल

Instagram

रतनवाडीमध्ये अनेक छोटे- मोठेधबधबे पाहता येतात. त्यातील सर्वात आकर्षक धबधबा म्हणजे नेकलेस क्वीन धबधबा. हा धबधबा एखाद्या राणीच्या गळ्यातील हाराप्रमाणे दिसतो. निसर्गाचा हा अविष्कार तुम्हाला अक्षरशः खिळवून ठेवतो.

घाटघर कोकणकडा

Instagram

शेंडी गावापासून 22 किलोमीटरवर घाटघर गाव आहे. घाटघरमधील कोकणकडा पाहण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात. या गावातील घाटन देवीच्या नावावरून या गावाला घाटघर हे नाव पडलं आहे. या ठिकाणी देखील तुम्हाला अनेक धबधबे पाहता येतात.

सांदन व्हॅली

डोंगरकपारीमध्ये निर्माण झालेली ही सांदन व्हॅली म्हणजे निसर्गाचा एक देखणा चमत्कारच आहे. सांदन व्हॅली जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.  एकतर तुम्ही शेंडी आणि घाटघर करत साम्रद गावात पोहचू शकता. अथवा तुम्हाला रतनवाडी मार्गे सांम्रद गावात पोहचावं लागेल. साम्रद गावात पोहचल्यावर एखाद्या वाटाड्याच्या मदतीने तुम्ही सांदण दरीत जाऊ शकता. पावसाळ्यात ही दरी पाहण्यासाठी गावागावातून पर्यटक येतात. धुक्याच्या दरीत लोटलेल्या गावात केवळ एखादा जाणकार वाटाडीच तुम्हाला सांदन व्हॅली नेऊ शकतो. सांदन व्हॅली खाली उतरण्यासाठी एक अंरूद वाट आहे. या दरीत खाली उतरल्यावर निसर्गाचं लोभस दृश्य पाहून तुमची तहान भुक नक्कीच हरपेल

रिवर्स वॉटरफॉल

साम्रद गावातच हा रिवर्स वॉटरफॉल आहे. हा धबधबा डोंगरकड्यांमधून कोसळताना वाऱ्यामुळे उलट दिशेला त्याच्या प्रवाह उडतो म्हणून त्याला रिवर्स वॉटरफॉल असं म्हणतात. मात्र या ठिकाणी जाताना स्वतःची आणि इतरांची नीट काळजी घ्या. कारण पावसाळ्यात धुकं आणि वाऱ्यामुळे हा भाग थोडासा धोकादायक आहे. धुक्यामुळे डोंगरकडा नेमकी कुठे संपते हे समजणं थोडंसं अवघड  आहे. या ठिकाणी जाताना पर्यटकांनी मद्यपान मुळीच करू नये. काही नियम पाळल्यास या ठिकाणी तुम्हाला निखळ आनंद लुटता येऊ शकतो.

तेव्हा या पावसाळ्यात एखाद्या विकऐंडला भंडारदराची सफर जरूर करा. या ठिकाणी पर्यटकांची येणारी संख्या मर्यादित असल्याने तुम्हाला निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येईल. शिवाय थोडी काळजी घेतल्यास ही तुमची पिकनिक नक्कीच अविस्मरणीय होऊ शकते. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि भंडारदराला गेल्यावर तुम्हाला काय अनुभव आला ते आम्हाला कंमेट करून जरूर कळवा.

अधिक वाचा-

पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं

पावसाळी पिकनिकला जाताय, मग करू नका या 5 चुका

पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From Budget Trips