लाईफस्टाईल

छत्रपती शासन चित्रपटाची जवानांना अनोखी मानवंदना

Aaditi Datar  |  Mar 13, 2019
छत्रपती शासन चित्रपटाची जवानांना अनोखी मानवंदना

अंधार होत चाललाय दिवा पाहिजे, या देशाला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे
मराठे झाले राजकारणी भक्त, मराठ्यांच्याच तलवारीला मराठ्यांचे रक्त
पुन्हा एकदा रायगडावर धावा पाहिजे, माझा हरहर महादेव हवा पाहिजे
या देशाला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे…एक जवान

आगामी ‘छत्रपती शासन’ चित्रपटातील या शिवाजी महाराजांना समर्पित या ओळी. नुकताच छत्रपती शासन सिनेमाचा खास प्रिमियर शो जवानांसाठी बेळगावमधील मराठा लाईट इंफट्रींच्या शार्कत हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कर्नल पी. एल. जयराम, सुभेदार मेजर के.हरेकर, चंद्रकांत टिकुर्ले आणि छत्रपती शासन सिनेमाच्या निर्मात्या प्रियांका कागले तसंच रेजिमेंटमधील जवळपास ३०० ते ३५०  जवान उपस्थित होते. जवानांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या कामाचे विशेष कौतुक करण्यासाठी आयोजित केलेला सिनेमाचा खास खेळ जवानांनीदेखील मनापासून अनुभवला.

छत्रपती महाराजांची खरी ताकद म्हणजे त्यांचे मावळे. स्वराज्यासाठी प्राण तळहातावर घेऊन जगणारे महाराजांचे मावळे आणि आताचे आपले जवान यांच्या कार्याला नुसतीच ही कलाकृती फक्त अर्पण केली नसून सिनेमाच्या नफ्यातील १० टक्के भाग हा जवानांच्या हितार्थ देण्यात येणार असल्याचं कळतंय. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना कर्नल पी. एल. जयराम म्हणाले की, चित्रपट क्षेत्रातील नामांकित व्यक्तींसोबत सिनेमाचा प्रीमियर करण्याच्या परंपरेला बगल देत आर्मी जवानांसोबत या सिनेमाचा प्रीमियर करण्यात आला. ही खरंच वेगळी संकल्पना आहे. तसंच सुभेदार मेजर के. हरेकर सिनेमाबाबत एक विशेष गोष्ट नमूद केली. ती म्हणजे, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेमक्या विचारांबद्दल अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्याचा सगळ्यांनी सखोल विचार केला तर समाजात नक्की चांगल्याप्रकारे बदल होईल. आमच्या जवानांनाही हुरूप देणारा हा सिनेमा आहे. १५ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या छत्रपती शासन सिनेमाला आमच्या शुभेच्छा.’ या प्रसंगी छत्रपती शासन सिनेमाच्या टीम मधील श्रेयस गायकवाड, रवी सोनावणे, गणेश बिच्छेवार, प्रथमेश मांढरे, गौरव सुभेदार उपस्थित होते.  

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरूणांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर लाँच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराज भोसले यांनी केला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन खुशाल म्हेत्रे करत असून कथा आणि संवाददेखील त्यांचेच आहेत. या चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडे, किशोर कदम, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंड निर्मित आणि खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित छत्रपती शासन हा सिनेमा येत्या १५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा – 

छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला

पंच प्रवीण तरडे करणार ‘सूर सपाटा’चा निवाडा

नव्या वर्षात ५ चित्रपट उलगडणार देशाचा इतिहास

 

Read More From लाईफस्टाईल