आपल्याकडे सण असला की त्या निमित्ताने घरात मस्त वेगवेगळे पदार्थ बनतात. प्रत्येक सणाची एक वेगळी खासियत असते. होळी म्हटलं घराघरात वेगवेगळ्या पद्धतींची पुरणपोळी आवर्जून केली जाते. होळी सणाची माहिती आजच्या पिढीला व्हावी म्हणून तरी हा सण आनंदाने व उत्साहाने साजरा करायला हवा. उत्तरेत होळीला गुजीया हा करंजीसारखा गोड पदार्थ, मालपुवे , थंडाई , भांग के पकोडे, भांग की चटनी ही आणि अनेक पक्वान्ने आवर्जून करतात. होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्ताने आपण एकत्र येऊन मजा करतो. अशा वेळी तुमच्या होळीच्या पार्टीसाठी पारंपारिक पदार्थांबरोबर रंगेबेरंगी कॉन्टिनेन्टल पदार्थ फ्युजन म्हणून तुम्ही करू शकता. सादर आहेत कलरफुल कॉन्टिनेन्टल पदार्थ ,जे टेस्टी आणि हेल्दी सुद्धा आहेत.
ऑरेंज क्रीम्सिकल्स
सध्या तापमान फारच वाढले आहे. अशा वेळी आईस्क्रीम ऐवजी या गारेगार क्रीमसिकल्स करून बघा. सध्या संत्र्यांचा सिझन आहे त्यामुळे तुम्हाला ताजी संत्री भरपूर मिळतील. यासाठी २ कप संत्र्याचा रस आणि २कप ग्रीक योगर्ट एकत्र करून नीट फेटून घ्या. त्यात अर्धा कप मध घाला आणि १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि चिमुटभर मीठ घाला. हे सगळे एकत्र करून कुल्फीच्या साच्यात घाला आणि रात्रभर फ्रीजर मध्ये सेट करून घ्या. तुमचे ऑरेंज क्रीम्सिकल्स तयार आहेत.
रेनबो ग्रेप सालसा
सध्या द्राक्षांचा सिझन आहे. उन्हाळाही चांगलाच सुरु झाला आहे. अशा वेळी आंबटगोड द्राक्षे खावीशी वाटतात. मग हा द्राक्षांचा सोपा कॉन्टिनेन्टल पदार्थ करून बघा. यासाठी तुम्हाला २ कप द्राक्षं अर्धी चिरून , अर्धा कप कांदा लांब आकारात चिरून , अर्धा कप चेरी टोमॅटो अर्धी चिरून , २ टेबलस्पून पार्स्ले किंवा कोथिंबीर बारीक चिरून, २ टेबलस्पून लिंबाचा रस , १ टीस्पून फ्रेश किंवा ड्राय ओरेगॅनो, १ टीस्पून व्हिनेगर , मीठ आणि काळीमिरी पावडर आणि आवडत असल्यास चिली फ्लेक्स हे साहित्य लागेल. चेरी टोमॅटो सोडून इतर सगळ्या भाज्या एकत्र करून घ्या. त्यात लिंबाचा रस, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स ,मीठ व काळीमिरी पूड आणि व्हिनेगर घालून टॉस करून घ्या. सर्व्ह करण्याच्या आधी चेरी टोमॅटो घालून सगळ्या भाज्या नीट एकत्र करून सर्व्ह करा. सकाळी भरपेट पुरणपोळी खाऊन पोट जड झाले असेल तर संध्याकाळी हा हलकेफुलका सालसा खा! याने पचनासाठी सुद्धा मदत होईल.
चॉकलेट बनाना आईस्क्रीम
आपल्यापैकी काहींना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असते. किंवा काही लोक विगन डाएटवर असतात. किंवा काहींना कॅलरीजच्या चिंतेमुळे आईस्क्रीम खाता येत नाही. अशावेळी हे हेल्दी व्हेगन शुगरफ्री चॉकलेटी बनाना आईस्क्रीम डेझर्ट म्हणून चांगला पर्याय ठरेल. यासाठी ४ केळी सोलून घ्या आणि त्यांचे काप करून घ्या. हे काप एक ते दोन तासांसाठी फ्रीजर मध्ये ठेवून गार करून घ्या. हे काप फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडर मध्ये घालून त्यांची पेस्ट करून घ्या. ह्यात एक टेबलस्पून कोको पावडर घाला. ह्यात चॉकलेट चिप्स घाला आणि एयरटाईट कंटेनर मध्ये दोन तासांसाठी फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवा. तुमचे डेअरी फ्री, शुगर फ्री आईस्क्रीम तयार!
क्विनोआ सलाड विथ रोस्टेड बीट्स अँड पेअर
२ कप क्विनोआ शिजवून घ्या. एक मोठे किंवा दोन लहान बीट ऑलिव्ह ऑइल लावून भाजून घ्या. ते शिजले कि सोलून घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्या. मुठभर अक्रोड थोडे भाजून घ्या. अक्रोडाचे लहान लहान तुकडे करून घ्या. पेअर फळाचेही तुकडे करून घ्या. आता एका भांड्यात क्विनोआ, बीटाचे तुकडे, पेअरचे तुकडे, अक्रोड आणि अर्धा कप फेटा चीज एकत्र करून त्यावर ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगर घाला.त्यात चवीपुरते मीठ व काळीमिरी पावडर घालून एकत्र करा. तुमचे कलरफुल कॉन्टिनेन्टल सलाड तयार आहे. हे सलाड तुम्ही मेन कोर्स बरोबर किंवा स्टार्टर्स बरोबरही खाऊ शकता.
या सर्व रेसिपीज खूप सोप्या आणि टेस्टी आहेत त्या करून बघा आणि सर्वांबरोबर रंगांचा सण एन्जॉय करा. होळीच्या शुभेच्छा!
फोटो क्रेडिट- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक