‘भांडणाने प्रेम वाढतं’ असं आपल्याकडे म्हटलं जातं. कोणत्याही जोडीमध्ये भांडण होणं हे साहजिक आहे. लहानमोठ्या कुरबुरी तक्रारी, भांडण हे नात्यामध्ये स्वाभाविक आहे. मात्र तुमच्या नात्यामध्ये सतत भांडणं होत असतील तर तुम्हाला यावर नक्कीच विचार करणे भाग आहे. नातं हे दोन्ही बाजूंनी टिकायला हवं. केवळ एकाने प्रयत्न करून चालत नाही. भांडण होत असेल तर नक्की कोणत्या विषयावर ती होत आहेत आणि ती कशी टाळता येतील याचे प्रयत्न व्हायला हवेत. जर तुमच्या नात्याला काही वर्ष झाली असतील आणि तुमच्याही नात्यात सतत भांडणं होत असतील तर तुम्ही या काही सोप्या टिप्स वापरा आणि आपले नाते वाचविण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण कोणतंही नातं हे बोलून आणि एकमेकांशी चर्चा करूनच टिकत असतं. नात्यात एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांकडून काय अपेक्षित आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचे आहे. जर दोघांपैकी एकच व्यक्ती सतत नातं निभावत असेल आणि दुसऱ्याकडून काहीच होत नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ राहात नाही आणि या अपेक्षांमधूनच भांडणं अधिक निर्माण होत असतात हे आधी लक्षात घ्या.
एकमेकांशी बोलणे आहे आवश्यक
कोणतेही भांडण हे चर्चा करूनच सुटते. आपल्या रागावर नियंत्रण ठेवत नक्की कुठे चुकतंय आणि आपल्याला काय अपेक्षित आहे किंवा आपल्याकडून समोरच्या आपल्या जोडीदाराला काय अपेक्षित आहे याबाबत एकमेकांनी शांततेने बोलणे गरजेचे आहे. भांडणं करून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करून भांडण अधिक वाढेल. त्यापेक्षा नक्की काय अपेक्षा आहे आणि त्यावर काय तोडगा निघू शकतो हे एकमेकांशी बोलून तुम्ही मार्ग काढल्यास, नेहमीची भांडणं थांबण्यास मदत होईल. तुम्हाला घरात बसून बोलणं शक्य नसेल तर तुम्ही बाहेर लाँग वॉक (Long Walk) करायला जा अथवा एक दिवसासाठी कुठेतरी बाहेर अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला कोणीही मध्ये लुडबूड करायला नसेल.
बोलणं टाळू नका
कितीही मोठं भांडण झालं असेल तर एकमेकांशी न बोलणं हा पर्याय असूच शकत नाही. भांडण झाल्यावर लवकरात लवकर शक्य होईल त्याप्रमाणे तुमचा अहंकार अथवा राग बाजूला ठेऊन बोलण्याचा प्रयत्न करा. भांडण लवकर मिटविण्यासाठी बोलणं आवश्यक आहे. त्यामुळे राग ठेऊन न बोलता राहू नका. एकमेकांशी बोलणं टाळू नका. गोष्टी मनात ठेऊन तुम्ही अधिक त्रास करून घेता. त्यापेक्षा आपल्या मनातील गोष्टी आपल्या जोडीदाराला स्पष्ट सांगा. मात्र भांडणाचा सूर न ठेवता मुद्देसूद तुमचा मुद्दा त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करा. बोलणं टाळल्याने मनात या गोष्टी साठून राहतात आणि मग त्यानंतर नात्यात अजून दुरावा निर्माण होतो. त्यामुळे शक्यतो असं करू नका.
रागात उत्तरे देणे टाळा
भांडणानंतर बऱ्याचदा मनात राग खदखदत असतो. त्यामुळे जोडीदाराने प्रयत्न करूनही अनेकदा रागात उत्तरं दिली जातात. मात्र हे योग्य नाही. तुम्ही जर भांडण केले असेल तर रागात उत्तरे देणे टाळा. कारण रागात तोंडातून निघालेला शब्द आपल्या जोडीदाराच्याही वर्मी बसण्याची शक्यता असते. त्यामुळे कितीही राग आला तरीही विचार करून आपल्या जोडीदाराला उत्तरे द्या. उचलली जीभ लावली टाळ्याला असं अजिबात करू नका. अशा रागाने दिलेल्या उत्तरामुळे नात्यात अजून फट पडून दुरावा निर्माण होऊ शकतो हे लक्षात घ्या. त्यामुळे भांडण झाल्यावर तुम्ही शांत झाल्यावरच तुमच्या जोडीदाराशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि मग दुरावा मिटविण्याचा प्रयत्न करा. अशावेळी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण असते हे जरी खरे असले तरीही तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की अशावेळी तुमच्या सहनशक्तीमध्ये असेल तितके शांत राहा.
वागण्यात बदल करू नका
भांडण झाल्यावर बरेचदा एकमेकांशी न बोलणं, जेवणावर राग काढणं अथवा एकत्र जेवायला न बसणं, एकमेकांबरोबर कुठेही न जाणं असं बरेचदा जोड्यांदरम्यान पाहायला मिळतं. मात्र आपल्या वागण्यात बदल करून आपल्या जोडीदाराला अधिक त्रास देऊ नका. लवकरात लवकर भांडण मिटविण्याचा प्रयत्न करा. मुळात जेवण हा एकच असा मार्ग आहे जिथे एकमेकांना तुम्ही समजून घेऊ शकता. एकमेकांना भरवून आणि प्रेम दाखवून तुम्ही भांडण मिटविण्याचा अशावेळी प्रयत्न करा. जेवणावर राग काढून अथवा अशा पद्धतीने वागणूक बदलून आपल्या जोडीदारांना वेगळी वागणूक देऊ नका. अहंकार ठेऊ नका. कारण यामुळे गोष्टी बिघडण्याची अधिक शक्यता असते.
थोडं जास्त प्रेम दाखवा
भांडण झाल्यावर रागावून न बसता आपल्या जोडीदाराला वेगवेगळे गिफ्ट्स देऊन मनविण्याचा प्रयत्न करा अथवा आपल्या जोडीदारावर असणारे प्रेम व्यक्त करा आणि थोडं जास्त प्रेम दाखवा जेणेकरून भांडण लवकर मिटू शकते. भांडण झाल्यावर आपल्या नात्यात गोडवा आणण्यासाठी आपल्या जोडीदाराला आवडणाऱ्या लहानसहान गोष्टी करूनही तुम्ही हे भांडण मिटवू शकता. या लहान सहान गोष्टीच तुम्हाला सतत भांडण होत असेल तर पुन्हा एकदा प्रेम व्यक्त करण्यासाठी मदत करतात. आपल्या जोडीदाराचे आवडते फूल देणे अथवा आवडते चॉकलेट वा एखादे लहानसे गिफ्ट देणे अथवा आपल्या जोडीदारासाठी सरप्राईज डेट प्लॅन करणे यामुळेही तुमच्या नात्यातील कडवटपणा दूर होण्यास मदत होते आणि अशा थोड्याशा वेगळ्या वातावरणात तुमचा भांडणाचा मुद्दा सोडविण्यासाठीही मदत मिळते. नात्यातील रोमान्स कमी झाल्यास याची मदत मिळते.
नातं सांभाळण्याची जबाबदारी ही दोघांचीही आहे. त्यामुळे भांडणं होत असतील तर दोन्हीकडून प्रयत्न व्हायला हवेत. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि वेळीच आपल्या नात्यातील कडवटपणा दूर करून एकत्र या!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक